गीताच्या मातापित्यांना शोधण्यासाठी सुषमा स्वराज यांची हाक

20 Dec 2017 21:34:11

 
२ वर्षापूर्वी पाकिस्तानातून भारतात परराष्ट्र मंत्रालयाच्या सहाय्याने आलेल्या गीताच्या आई-वडिलांना शोधण्यासाठी स्वत: परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी जनतेला हाक दिली आहे. गीता दिव्यांग असल्यामुळे ऐकू आणि बोलू शकत नाही. त्यामुळे तिच्या आई-वडिलांना शोधणे कठीण होत आहे, त्यामुळे आई-वडिलांनी पुढे यावे, तसेच लोकांनी यात मदत करावी, असे आवाहन व्हिडीओच्या माध्यमातून स्वराज यांनी केले आहे.
 
 
पाकिस्तानच्या इदी नामक संस्थेने गीताचा अनेक वर्षे सांभाळ केला होता. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कातून तिला भारतात आणले गेले. तिचे आई-वडील म्हणून १२ कुटुंब पुढे देखील आले होते, मात्र गीताला त्यांची ओळख पटली नाही, त्यामुळे खऱ्या आई-वडिलांना शोधून देण्यासाठी जनतेने मदत करावी, असे आवाहन स्वराज यांनी आज केले. गीताचे आई-वडील शोधून देणाऱ्याला १ लाखाचे बक्षीस देखील जाहीर केले आहे.
 
 
गीता सध्या इंदौर येथील एका सामाजिक संस्थेत राहते, तेथे शिवणकाम, कम्प्युटर, सांकेतिक भाषा ती शिकली आहे. मात्र आई-वडिलांच्या आठवणीत ती भावनाविवश झाली आहे, त्यांच्या भेटीची ओढ तिला लागली आहे, असे देखील स्वराज यांनी सांगितले आहे. गीताचे आई-वडीलांची ओळख लवकर पटावी व ती आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहावी, गीताच्या लग्नाची, तसेच शिक्षणाची जबाबदारी परराष्ट्र मंत्रालय घेईल, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
 
Powered By Sangraha 9.0