लागलेल्या पैजा आणि निवळलेले वातावरण...

    दिनांक  18-Dec-2017   

 
अपेक्षित निकाल न मिळाल्याने दोन्ही बाजू पडल्या थंड

नागपूर (निमेश वहाळकर) : संपूर्ण देशाला प्रतीक्षा असलेल्या गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. त्यातही विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शाह यांचे ‘होम पीच’ असलेल्या गुजरातवर लोकांचे अधिक लक्ष लागले होते. नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यानही स्वाभाविकपणे या निकालांचीच जोरदार चर्चा होती. मात्र, जसेजसे निकाल जाहीर होऊ लागले तसे कॉंग्रेस व भाजप, दोन्ही बाजूंना सुरुवातीला असलेला उत्साह हळूहळू आटत जाऊ लागला व दुपारनंतर त्याची जागा मरगळलेपणाने घेतली.
 
गेल्या दोन-तीन दिवसांपासून विधानभवन परिसरात सभागृह कामकाजाव्यतिरिक्त चालणाऱ्या गप्पांमध्ये ‘गुजरातमध्ये काय होणार?’ हा मुद्दा आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. उघडपणे आणि खासगीत निरनिराळी मते व्यक्त होत होती. प्रचाराच्या निमित्ताने गुजरातमध्ये जाऊन आलेल्या भाजप, कॉंग्रेसच्या, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना गाठून गुजरातमधील परिस्थितीबाबत विचारणा होत होती, कोणाला किती जागा मिळणार याबाबत अंदाज व्यक्त केले जात होते. मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार अॅड. आशिष शेलार, मुख्य प्रतोद राज पुरोहित, आमदार योगेश सागर, पराग आळवणी, अतुल भातखळकर आदी काही आमदार तर पत्रकारांच्या ‘हिटलिस्ट’वरच होते. काहींनी पत्रकार व आमदारांनी तर आपापसांत चक्क पैजाही लावल्या होत्या. भाजपला किती जागा मिळणार यावर काहींना थेट दीडशेहून अधिकची अपेक्षा होती, काही ११० ते १२५ अशा सावध पवित्र्यात होते तर काहींना ९० ते १०० अशी माफक अपेक्षा होती. कित्येक मंडळी भाजपला सत्ता येणार नाही आणि ७५ च्या वर जागाही मिळणार नाहीत, असे छातीठोकपणे सांगत होती. मात्र, दुसरीकडे खुद्द कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधील वरिष्ठ मंडळीच पत्रकारांशी खासगीत बोलताना भाजपला १०० हून अधिक जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करत होती.
 
सोमवारी सकाळपासून जसेजसे निकाल हाती येऊ लागले तसेतसे मंडळींच्या मनातील धाकधूक वाढू लागली. अखेरीस, दुपारी बारा-एकच्या सुमारास जेव्हा चित्र स्पष्ट होऊ लागले, तेव्हा अनेकांना हायसे वाटले तर अनेकांचं भ्रमनिरास झाला. कॉंग्रेसने तुलनेने उत्तम कामगिरी करूनही कॉंग्रेसच्या आमदारांमध्ये तितका उत्साह दिसला नाही. दुसरीकडे भाजपच्या आमदारांनी विधानभवन परिसरात दोन राज्यांतील विजय साजरा केला. राज पुरोहित यामध्ये सर्वात जास्त आघाडीवर होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मग सभागृहाबाहेर येऊन माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मात्र, कॉंग्रेसला अपेक्षित ‘धमाका’ न झाल्याने कॉंग्रेसची चांगली कामगिरी होऊनही दुपारनंतर सभागृहात आणि सभागृहाबाहेर एक वेगळेच मरगळलेपण निर्माण झाले. दुपारनंतर एकेक आमदार कंटाळलेल्या चेहऱ्याने सभागृहाबाहेर पडू लागले. अनेकांनी तर गुजरातबाबत प्रतिक्रिया विचारली असता ‘त्यात काय बोलायचं’ अशी प्रतिक्रिया दिली. काही ‘पत्रकार-फ्रेंडली’ आमदारांनी ‘जागा १०० पर्यंत येणे हे भाजपचे अपयशच’ हे ठसवून देण्याचा प्रयत्न केला खरा. पण असे दोन-तीन आमदार वगळता कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांना निकालाबद्दल बोलण्यात फारसे स्वारस्य दिसले नाही.
 
निकालाबाबतची उत्सुकताही संपून गेली आणि हळूहळू ‘डुलक्यांचे’ प्रमाण वाढू लागले. वातावरणात अपेक्षित ‘तापमान’ न निर्माण झाल्याने मग कितीतरी आमदार आणि पत्रकारांनीही विधानभवनातून काढता पाय घेणे पसंत केले.