विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यातील विशाखापट्टणम येथे आज झालेला तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना देखील भारताने जिंकला आहे. भारताचा शिखर धवन याच्या शतकी खेळीच्या बळावर श्रीलंकेने दिलेले २१६ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने अवघ्या ३२ षटकांमध्येच पूर्ण केले व तब्बल ८ गडी राखून सामना जिंकला. या विजयाबरोबरच भारत-श्रीलंका एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका देखील भारताने २-१ अशा गुणांनी आपल्या खिशात घातली आहे.
उपुल थरंगा याच्या ९५ धावांच्या खेळीच्या बळावर श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी २१६ धावांचे आव्हान ठेवले होते. श्रीलंकेच्या डावानंतर भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन ही जोडी मैदानात सलामीसाठी उतरली होती. परंतु थोड्याच वेळात श्रीलंकेच्या धनंजया याने रोहितचा त्रिफळा उडवत त्याला माघारी धाडले. यानंतर मैदानात आलेल्या शिखर धवन याने तुफान फटकेबाजी करत श्रेयस अय्यरच्या जोडीने दुसऱ्या क्रमांकासाठी १३५ धावांची भागिदारी रचली. अय्यरने देखील धवनला उत्तम साथ देत ६५ धावांची दमदार खेळी केली. परंतु लकमल याने पेरेरा याच्या चेंडूवर अय्यरला बाद करत, त्याला देखील तंबूत धाडले. यानंतर दिनेश कार्तिकच्या जोडीने शिखर धवनने ८५ चेंडूमध्ये १३ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद १०० धावा करत संघाला विजय मिळवून दिला. याच बरोबर आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील १२ वे शतक आणि ४ हजार धावांचा टप्पा देखील त्याने पार केला.
विशाखापट्टणम् येथील डी.एस. राजाशेखरा रेड्डी मैदनावर सुरु झालेल्या या सामन्याच्या सुरुवातीला भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर श्रीलंकेकडून धनुष्का गुणतिलका आणि उपुल थरंगा हे दोघे सलामीसाठी मैदानात उरले होते. श्रीलंका संघाला चांगली सुरुवात करून देत असतानाच गुणतलिकाला १३ धावांवर माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाजाना यश आले. परंतु यानंतर उपुल थरंगा (९५) याने सदीरा समरविक्रमाच्या (४२) जोडीने दुसऱ्या क्रमांकासाठी १२१ धावांची भागीदारी रचून श्रीलंकेचा पाया मजबूत करून दिला. परंतु समरविक्रमा आणि थरंगानंतर आलेल्या एकाही खेळाडूला कोणतीही चमकदार कामगिरी करता आली नाही. अँजेलो मॅथ्यूज (१७) आणि असेला गुणरत्ने (१७) वगळता श्रीलंकेच्या एकाही खेळाडूला साधी दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही.
या बदल्यात भारताकडून कुलदीप यादव आणि युझवेन्द्र चहल या दोघांनी सर्वाधिक प्रत्येकी तीन-तीन बळी घेतले व त्यापाठोपाठ हार्दिक पंड्या याने दोन तर भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह याने प्रत्येकी एक बळी घेतला.
श्रीलंकेचा डाव :

भारताचा डाव :