सिंचन प्रकल्प पूर्ण करून विदर्भाचा करणार कायापालट : मुख्यमंत्री

    दिनांक  17-Dec-2017


बुलडाण्यामध्ये विविध सिंचन प्रकल्पांचे उद्घाटन

१० हजार १७२ कोटी रूपयांचा निधी सिंचनासाठी मंजूर


 
बुलडाणा : राज्यामध्ये आतापर्यंत अपूर्ण राहिलेल्या सर्व सिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण करून संपूर्ण राज्य सुजलाम् सुफलाम् करण्याचे ध्येय राज्य शासनाने समोर ठेवले आहे. त्यामुळे लवकरच विदर्भात देखील सर्व सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करून विदर्भाचा कायापालट होणार आहे' असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. बुलडाण्यातील नांदुरा येथील कोठारी विद्यालयाच्या प्रांगणात बळीराजा जलसंजीवनी योजने उद्घाटन व राष्ट्रीय महामार्ग भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
 
यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, बुलडाणा जि.प. अध्यक्षा उमा तायडे, महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव चहल, आणि जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे उपस्थित होते.
 
मागील काही काळामध्ये निधी तसेच भूसंपादना अभावी जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्पांची कामे अडकून पडलेली आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा आणि परिणामी विदर्भाचा विकास मोठ्या प्रमाणात खुंटलेला आहे. परंतु आता शासन बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या माध्यमातून हे राहिलेले सर्व प्रकल्प लवकरच पूर्ण करणार आहे, असे ते यावेळी म्हणाले. यासाठी जिल्ह्याला प्रथमच १० हजार कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर झाला असून या माध्यमातून जिल्ह्यातील जिगांव या मोठ्या प्रकल्पासह ८ लघु प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रकल्प पूर्ण करून जिल्ह्याचा निश्चितच कायापालट होईल, असा विश्वास देखील यांनी यावेळी व्यक्त केला. 
 
शेतकऱ्यांनी जैविक इंधनचा वापर करावा - नितीन गडकरी
 
केंद्र सरकारने उडीद, हरभरा, सोयाबीनवरील आयात शुल्क वाढविले. तसेच निर्यात बंदी उठविली. त्यामुळे शेती उत्पदनांना वाढीव भाव मिळत आहे. मात्र मुबलक पाणी, सुक्ष्म सिंचन व नवीन पीक पद्धती अवलंबल्यास शेती फायद्याची ठरते. यासाठी शेतकऱ्यांना आता जैविक इंधन निर्मितीचा पर्यायही निवडावा लागणार आहे. शेतातील काडी कचरा, कणीस, कुटार यापासून जैव इंधन निर्माण करता येणे शक्य आहे. तसेच बायो सीएनजी यांची निर्मिती या कचऱ्यापासून करणे शक्य असून शेतकऱ्यांनी त्याचा अधिकाधिक वापर करावा, असे मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केले.
 
तसेच दळणावळणाची गतीमान साधने निर्माण केल्यास जिल्ह्याचा आणि राज्याचा विकास अधिक गतीने होतो. बुलडाणा जिल्ह्यात सध्या रस्ते विकास कामासाठी ४ हजार १११ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून आला आहे. त्यामुळे जिल्हात राष्ट्रीय महामार्गांची सुरु असलेली व सुरू होणारी सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याच बरोबर जिल्ह्यातील शेगांव येथे सी प्लेनची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असून गिरगांवच्या समुद्रावरून सी प्लेन शेगांव येथे आनंद सागरमध्ये उतरेल. त्यामुळे भाविकांचा वेळ वाचेल आणि येथे येणाऱ्या भाविकांना सुविधा मिळेल, असे त्यांनी यावेळी म्हटले.