नव्या पिढीला काय देणार?

    दिनांक  17-Dec-2017   
 
 
राहुल गांधी यांची कॉंग्रेसच्या पक्षाध्यक्षपदी निवड होणे, ही आता काळ्या दगडावरची रेघच होती. फक्त औपचारिक घोषणा होणेच बाकी होते. सर्व प्रथम राहुल गांधी यांचे मनापासून अभिनंदन करूया. १२५ वर्षांची परंपरा असलेल्या भारतातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाचे राहुल गांधी अध्यक्ष होत आहेत. काही संस्थांचे अध्यक्ष होणे, ही सन्मानाची जागा असते, परंतु राजकीय पक्षाचा अध्यक्ष होणे, मोठ्या जबाबदारीची जागा असते. राजकीय पक्षांमध्ये नेतृत्त्वासाठी प्रचंड चढाओढ असते. आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून लोकशाही मार्गाने क्रमांक एकचे स्थान मिळवावे लागते. कॉंग्रेसमध्ये मात्र क्रमांक एकच्या जागेसाठी स्पर्धा नसते. स्पर्धा असते ती फक्त क्रमांक दोन किंवा तीनच्या जागेसाठी. राहुल गांधीसाठी पक्षांतर्गत कुणी स्पर्धक नाहीत. ते नेहरू-गांधी घराण्यातील असल्यामुळे पक्षाचे नेतृत्त्व त्यांच्याकडे वारसा हक्काने आले आहे.
 
वारसा हक्काने येणार्‍या नेतृत्त्वाचे जसे काही फायदे असतात तसे काही तोटेदेखील असतात. सगळ्यात मोठा फायदा हा असतो की, क्रमांक एकच्या नेतृत्त्वासाठी कुणीही स्पर्धेत नसतो. एकमुखी नेतृत्त्व असते. त्यामुळे निर्णय पटापट होतात. उदाहणार्थ आता मणिशंकर अय्यर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊन त्यांचे पक्ष सदस्यत्त्व रद्द करण्यात आले आहे. अन्य पक्षांत अशी कारवाई इतक्या तातडीने होणे कठीण असते. दुसरा फायदा असा असतो की, अन्य सर्व नेते आपल्या राजकीय निष्ठा क्रमांक एकच्या नेत्याला अर्पण करतात आणि पक्ष म्हणून सामूहिकरित्या काम करू लागतात. या घराणेशाहीच्या नेतृत्त्वाचा तोटा असा आहे की, निर्णयाला आणि त्याच्या परिणामाला क्रमांक एकचाच नेता जबाबदार असतो. यश मिळाले तर त्याचे आणि अपयश मिळाले तरीही त्याचेच असते. यशापयशात अन्यांचे श्रेय नगण्य असते. घराण्याचा वारसा कर्तृत्त्वसंपन्न निघाल्यास, भरभराट होते आणि दुर्बळ निघाल्यास वाताहात होते. स्वातंत्र्यानंतरच्या कॉंग्रेसची सर्वच जडणघडण घराणेशाहीच्या आधारावर झालेली आहे. पं. नेहरू ते सोनिया गांधी असा हा नेतृत्त्वाचा दीर्घ प्रवास आहे. आता ही जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर आलेली आहे.
 
ही जबाबदारी सोपी जबाबदारी नाही. २०१४ च्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला दारूण अपयशाला सामोरे जावे लागले. कधी काळी ३८५च्या आसपास खासदार असणारा हा पक्ष फक्त ४४ खासदारांचा पक्ष झाला. कॉंग्रेसचे अपयश म्हणजे नेहरू-गांधी घराण्याचे अपयश असे समीकरण असल्यामुळे, या अपयशाचे रूपांतर घवघवीत यशात करण्याची जबाबदारी राहुल गांधी यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे. गेली सात-आठ वर्षे ते जनतेमध्ये मिसळत आहेत, भारतीय लोकमानस समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, समाजातील तळागाळातील माणसांशी ते संवाद साधत आहेत, त्यांच्या घरी जात आहेत आणि त्याच्या झोपडीत जेवणही घेत आहेत. राहुल गांधींवर राजकीय टीका करणार्‍यांचे म्हणणे असे असते की, ही सर्व ‘स्टंटबाजी’ आहे. राजकीय टीकेला फार गंभीरतेने घ्यायचे नसते. कारण त्यात दुसरा प्रश्न असा असतो की, टीका करणारे जेव्हा याच गोष्टी करतात तेव्हा त्या मनापासून केल्या आहेत, प्रमाणिकपणे केल्या आहेत, असे समजायचे का? तेव्हा राहुल गांधींच्या प्रमाणिकपणावर आपल्याला संशय घेण्याचा काही एक अधिकार नाही.
 
ज्याला देशाचे नेतृत्त्व करायचे आहे त्याला देश समजून घेणे फार आवश्यक आहे. १९१५ साली महात्मा गांधी दक्षिण अफ्रिकेतून भारतात आले. नामदार गोखले यांनी त्यांना एक वर्ष भारताचा प्रवास करण्याची सूचना केली. महात्मा गांधींनी एक वर्ष भारताचा प्रवास केला. भारत समजून घेतला. राहुल गांधीदेखील भारत समजून घेण्यासाठी खेडोपाडी जात असतील, वंचित माणसाशी संवाद साधत असतील तर ते चांगलेच आहे. स्वामी विवेकानंद म्हणत की, खरा भारत झोपड्यात राहतो आणि तोच उद्याच्या भारताचा तारणहार आहे. कॉंग्रेसची प्रतिमा, या देशात बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजाच्या मनात विपरीत होत गेली. आपल्या हिताला बळी देणारा हा पक्ष आहे, अशी सर्वसामान्य हिंदूंची भावना बनत चालली. या भावनेचा लाभ भारतीय जनता पक्षाने उठविला. कॉंग्रेसची ही प्रतिमा बदलणे राहुल गांधींपुढचे फार मोठे आव्हान आहे.
 
हे आव्हान त्यांनी गुजरातच्या निवडणुकीचा प्रचार करीत असताना स्वीकारल्याचे दिसते. गुजरातमधील अनेक मंदिरांना राहुल गांधींनी भेटी दिल्या. २००२च्या गुजरात दंगलीसंबंधी एक अक्षरही उच्चारले नाही, मुसलमानांना बरे वाटेल असेही कोणतेही भाषण केले नाही, मुसलमान म्हणून त्यांच्या कोणत्याही प्रश्नाला राहुल गांधी यांनी स्पर्श केला नाही, राहुल गांधी यांचे हे ‘सॉफ्ट हिंदुत्त्व’ आहे, अशी चर्चा सुरू झाली. त्यांना उत्तर देताना काही जण म्हणाले की, मोदींचे प्रखर हिंदुत्त्व असताना सॉफ्ट म्हणजे मवाळ हिंदुत्त्वाची गरज काय? ही चर्चादेखील राजकीयच आहे. राजकीय चर्चेच्या पलीकडे जाऊन विचार करायचा तर देशातील कोणत्याही राजकीय पक्षाला, बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजाच्या भावभावनांचा विचार आणि आदर केल्याशिवाय यश मिळणे कठीण आहे. असे यश मिळविण्यासाठी सातत्याने हिंदू, हिंदुत्त्व इत्यादींचा गजर करत राहण्याची गरज नसते. राजकीय पक्षाचा नेता कसा राहतो, कसा जगतो, कोणती जीवनमूल्ये तो महत्त्वाची मानतो, यावरून तो आपला आहे की परका आहे हे जनता ठरवीत असते. कुडता-पायजम्यातील नेता आपला वाटतो, सूटा-बूटातील नेता दूरचा वाटतो. राहुल गांधी या वाटेने चालले आहेत, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
 
राहुल गांधी यांच्यापुढील दुसरे आव्हान-कॉंग्रेसची पक्ष संघटना बांधण्याचे आहे. त्यांनी व्यक्तीशः कितीही मेहनत घेतली आणि आपली नेतृत्त्व क्षमता सिद्ध केली तरीही, तेवढ्याने पक्षाला यश मिळत नाही. नेत्याचा आणि पक्षाचा संदेश घरोघर घेऊन जाण्यासाठी पक्ष संघटना लागते. संघटनेत काम करणारे कार्यकर्ते निष्ठावान आणि विचाराला समर्पित असावे लागतात. देश स्वतंत्र होत असताना कॉंग्रेसजवळ अशा कार्यकर्त्यांची देशव्यापी प्रचंड फौज होती. या फौजेतील कार्यकर्त्यांची संख्या हळूहळू कमी होत गेली. पक्षनिष्ठा, सिद्धांतनिष्ठा बाजूला पडली आणि ‘साहेबनिष्ठा’ आणि ‘मॅडमनिष्ठा’ याला अग्रक्रममिळाला. पक्षाचे कामकाहीतरी मिळविण्यासाठी करायचे, पक्षाचे नेते आमदार, खासदार, मंत्री बनून प्रचंड संपत्ती गोळा करतात. मग मी अर्धपोटी राहून पक्षाचे काम कशाला करू? असा प्रश्न कार्यकर्त्यांपुढे उभा राहिला. कार्यकर्त्यांचा हा प्रश्न केवळ कॉंग्रेसपुरताच मर्यादित आहे असे समजण्याचे कारण नाही, तो सर्व पक्षांना लागू होतो. आज कॉंग्रेसची स्थिती कार्यकर्त्यांच्या संदर्भात दुष्काळाची आहे. राहुल गांधी यांना ही परिस्थिती सुकाळाची करावी लागेल.
 
त्यासाठी त्यांना पक्षाला आजच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणाच्या युगाला सामोरे जाईल, असे पक्षाचे तत्त्वज्ञान सांगावे लागेल. सत्तेच्या लालसेने असंख्य लोक गोळा होतात, सत्ता गेली की ते पाठ फिरवितात. तत्त्वज्ञानाशी निष्ठा असणारे मात्र ‘आता हरलो, उद्या जिंकू’ अशा भावनेने पुन्हा कामाला लागतात. १२५ वर्षांचा कॉंग्रेसचा वारसा खूप समृद्ध आहे, तो राष्ट्रीय चळवळीचा आहे, राष्ट्रीय विचाराचा आहे, सर्वसमावेशकतेचा आहे, सर्वांना सामावून घेण्याचा आहे, सर्व उपासनांचा आदर करणारा आहे, दुसर्‍या भाषेत हिंदूमानसाचा हा वारसा आहे. तो स्वीकारून त्यात कालोचित नवीन भर टाकून राहुल गांधी यांना पक्ष उभा करावा लागेल.
 
राहुल गांधी हे करू शकतील का? या प्रश्नाचे नकारार्थी उत्तर दिले तर त्यांच्या क्षमतांवर आपला विश्र्वास नाही असा त्याचा अर्थ होईल आणि होकारार्थी उत्तर दिले तर त्यांच्या क्षमता खूप ताणल्या आहेत असा त्याचा अर्थ होईल. अशा वेळी ‘क़ाळच या प्रश्नाचे उत्तर देईल’ असे म्हणणे सोयीचे आणि सोपे असते. राहुल गांधी यांचा हिंदुत्त्वाकडे जाण्याचा प्रवास ठामविश्र्वासातून झाला असेल तर त्यांना काही काळानंतर यश मिळेल, परंतु ठामविश्र्वासाऐवजी निवडणूक जिंकण्याची एक रणनिती म्हणून जर हा प्रवास होत असेल तर त्यांना यश मिळणे महाकठीण गोष्ट आहे. कॉंग्रेसचे आकर्षण ४७ नंतर पुढे तीस वर्षे तरी ‘देशाला गुलामीतून मुक्त करणारा पक्ष’, या एका कारणाने राहिले. नंतर पिढ्या बदलतात. प्रत्येक पिढी ही स्वतंत्र विचार करणारी आणि देशाच्या राजकीय रचनेत स्वतःचे स्थान शोधणारी असते. स्वातंत्र्य या पिढीच्या दृष्टीने रोजच्या जगण्याचा आणि अनुभवण्याचा विषय आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे या पिढीला फार मोठे आकर्षण नसते.
 
या पिढीच्या आकर्षणाचा विषय स्वातंत्र्याचे सार्थक करण्यासाठी काय केले गेले? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा असतो. या पिढीला रोजगाराची शाश्र्वती हवी, रस्ते, रेल्वे वाहतूक उत्तमहवी, राहयला बर्‍यापैकी घर हवे, आरोग्यसेवा हवी, योग्य दरात माफक शिक्षण मिळण्याची व्यवस्था हवी आणि हे सर्व करत असताना आपला भारत देश जागतिक मंचावर सर्व देशांनी दखल घ्यावी असा देश व्हावा, अशी या पिढीची अपेक्षा आहे. या पिढीला नको तो तुमचा समाजवाद किंवा सेक्यूलरवाद किंवा आरक्षणाचा जातवाद, या पिढीला कोणत्याही कृत्रिमबंधनांच्या बेड्या नको आहेत, ती मुक्त होऊ पाहत आहे. तिला अनंत आकाशात झेप घ्यायची आहे. असे एक वातावरण आणि सामाजिक व राजकीय पर्यावरण राहुल गांधी यांना उभे करावे लागेल. त्यांना हे लक्षात घ्यावे लागेल की, जातीय आरक्षणाचे राजकारण आणि त्या मुद्द्यांवर निवडणुका हा या पुढच्या काळातील घाट्याचा राजकीय धंदा आहे. ज्यांच्यासाठी आरक्षण मागितले जाते त्यांच्याही हे लक्षात यायला लागले आहे की, सत्तेसाठी आपला उपयोग चुलीतल्या लाकडाप्रमाणे होत आहे. राहुल गांधी यांना आजच्या तरूणांसमोर त्याच्या उज्ज्वल भवितव्याचा एखादा ब्ल्यू प्रिंट ठेवावा लागेल. पक्षाध्यक्ष म्हणून त्यांचे यशापयश या गोष्टीवरच अवलंबून राहील असे मला वाटते.
 
- रमेश पतंगे