लोक काय म्हणतील ?

14 Dec 2017 16:09:58

 
 
 
प्रसंग १ :
 
“ आज तरी वेळेवर येणार आहेस का? ”
 
“ झालं का सुरु तुझं पुन्हा आई! अगं स्पर्धा जवळ आलीये. practice नको का व्हायला? आणि झाला उशीर तर येतं ना कोणीतरी सोडायला घरी? “
 
“ रोज वेगळ्या कोणत्यातरी मुलाच्या गाडीवरून येतेस घरी. लोक काय म्हणतील? “
 
 
प्रसंग २ :
 
“ मग काय ठरलं तुमचं? उद्या मुलाकडच्यांना उत्तर द्यायचंय मला! पसंत आहे ना स्थळ तुम्हाला? मुलाचा होकार आहे.”
 
“तशी आमची काही हरकत नव्हती पण लोक नावं ठेवतील आम्हाला. डबल graduate मुलीला कमी शिकलेला जावई कसा आणला म्हणून! नाहीतर छानच होतं तुम्ही आणलेलं स्थळ.”
 
 
प्रसंग ३ :
 
“ काल मालुताई पायऱ्यांवरून पडल्या म्हणे! किती लागलंय ? उतारवयात हाडं ठिसूळ होतात. जपलं पाहिजे. ”
 
 
“ काकू तुम्हीतरी समजावून सांगा तिला. साडीच्या निऱ्यांमध्ये पाय अडकून पडली ती. चांगलाच मुरगळला आहे पाय. bandage बांधून ठेवलंय. किती वेळा सांगितलं तिला की आता साडी नको नेसूस. तुला सावरता येत नाही. पंजाबी ड्रेस शिवूया दोन चार. पण ऐकतच नाही. म्हणते की आता या वयात मी अशी fashion करायला लागले तर लोक काय म्हणतील? आता तुम्हीच सांगा सोय महत्त्वाची की लोक महत्वाचे?”
 
अगदी आपल्या आसपास घडल्यासारखे वाटतात ना हे प्रसंग! तपशील, घटना, स्थान, व्यक्ती वेगवेगळ्या असतील पण सर्व ठिकाणी एक समान सूत्र आहे ते म्हणजे लोक काय म्हणतील?
 
 
हे “ लोक ” इतके बलाढ्य होतात कधी कधी की आपले वागणे, बोलणे, चालणे, निर्णय घेणे अशा अनंत मुद्द्यांवर त्यांची अदृश्य छाया पडलेली असते. आपली इच्छा, आकांक्षा, विचारधारा, स्वप्ने, सोय – गैरसोय, आयुष्याचे ध्येय, अशा कोणत्याही विचाराआधी लोकांचा विचार केला जातो.
 
मुलीने / मुलाने जातीबाहेर केलेल्या लग्नाला होणारा विरोध, आवड किंवा कुवत नसताना विशिष्ट अभ्यासक्रमासाठी मुलाला/मुलीला घ्यायला लावलेला प्रवेश या आणि अशा तत्सम घटनांमध्ये जेव्हा प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पना कारणीभूत असतात त्या कल्पना ह्या लोकांनीच ठरवलेल्या असतात.
 
कोण असतात हे लोक? आपल्या आजूबाजूची अशी असंख्य माणसं ज्यांची आपली साधी ओळखही नसते. त्यांची नावेही माहिती नसतात. कधी कधी नातेवाईक सुद्धा असतात लांबचे. पण ज्यांची हरघडी आपण इतकी पर्वा करतो, आपल्या गरजेच्या वेळेला ते कुठे असतात? आपल्या गरजेला जे पाठीशी उभे असतात ते आपल्या कोणत्याही निर्णयात नेहमीच आपल्या साथीला असतात. ते “लोक” नसतात. ‘ ऐकावे जनाचे पण करावे मनाचे ‘ या सारखी सु-वचने लहानपणापासून आपण ऐकत आलो आहे. मुलगा, बाप आणि गाढव ह्या गोष्टीचे हे तात्पर्य. पण व्यवहारात वागताना आपण उलटे वागतो. आपल्या आयुष्याचा हा अद्दृष्य रिमोट cantrol दुतोंडी नाही तर हजार तोंडी असतो. नोकरी केली तर, व्यवसाय कसा चांगला आणि व्यवसाय केला तर तो कसा बेभरवशी असतो असे तितक्याच ठामपणाने हे ‘ लोक ‘ बोलू शकतात. गृहिणी असाल तर स्त्रीने आर्थिकदृष्ट्या सक्षम असलंच पाहिजे असं सांगतात आणि नोकरी करत असाल तर नोकरदार स्त्रीमुळे घराकडे आणि मुलांकडे कसं दुर्लक्ष होतं हे तुम्हाला पदोपदी ऐकवतात.
 
एक मात्र नक्की की लोकांची पर्वा करणारे कधीच समाजात काही बदल घडवून आणू शकत नाहीत. सुधारणा घडवून आणणारे, दुर्लक्षित समाज घटकांसाठी आयुष्य अर्पण करणारे, व्यवसायाच्या वेगळ्या वाटा धुंडाळणारे, शालेय शिक्षणात अयशस्वी होऊनही स्वतःच्या हिम्मतीवर, अंगभूत गुणाच्या आधारे विविध कला क्षेत्रांत उच्च स्थान मिळवणारे अशी कितीतरी माणसे डोळ्यापुढे उभी राहतील ज्यांनी कधीच लोकांची पर्वा केली नाही आणि समाजात आदर्श म्हणून स्थान प्राप्त केले. लोकांनीच ठरवून दिलेल्या स्त्रीत्वाच्या तथाकथित बंधनं आणि मर्यादा सांभाळत बसली असती तर रिक्षा चालक, लोकल मोटारमन, बस कंडक्टर या चाकोरी बाहेरच्या व्यवसायांपासून ते अंतराळवीर होण्यापर्यंतची उत्तुंग भरारी स्त्री कधी घेऊ शकलीच नसती. कुस्ती आणि वेटलिफ्टिंग सारखे ‘रांगडे‘ समजले दालन स्त्रीसाठी कधी खुले झालेच नसते. नृत्यासारख्या ‘ बायकी ‘ समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात नैपुण्य मिळवण्याची धडपड पुरुष कलावंताने केलीच नसती. अशी आणि या सारखी असंख्य उदाहरणे देता येतील.
 
‘ लोकांना ‘ नावे ठेवणं सोपं आहे पण आपण स्वतः त्यामध्ये सामील होणार नाही हे पाहणं अधिक कठीण आणि गरजेचं आहे. दुसऱ्याच्या घरात घडणाऱ्या घटनांमध्ये दाखवलेली जास्त उत्सुकता, बाहेर उभे राहून किंवा बाकावर बसून नकळत केलेली टेहळणी, नीट समजून न घेता एखाद्याच्या वर्तणुकीवर किंवा स्वभावावर मारलेला शिक्का आणि हे सर्व मुद्दे ‘ सहज ‘ म्हणून मारलेल्या गप्पांमधून आपल्या आसपास पसरवणं एवढं आपल्याला ‘ लोक ‘ बनवायला पुरेसं आहे.
 
आपल्याला प्रगती करायची असेल, चाकोरी बाहेर पडण्याची हिंम्मत दाखवायची असेल, जीवनात काहीतरी साध्य करून दाखवायचं असेल तर या ‘ लोक ‘ नावाच्या बागुलबुवाची भीती मनातून झिडकारून दिली पाहिजे. नाहीतर उद्वेगाने असेच म्हणायची वेळ येईल की –
 
लोकांना आम्ही फारच भितो
घराबाहेर पडताना हाच विचार येतो,
ही वेळ odd तर नाही?
गुपचूप जावं नाहीतर लोकं काय म्हणतील?
भुकेने जीव कासावीस झाला तरी
आम्ही जेवायच्याच वेळी जेवू.
आमच्याच पैशाचं आमचं अन्न,
भलत्या वेळी खाल्लं तर
लोक काय म्हणतील?
ह्या लोकांचा इतका जबरदस्त पगडा कि
मरताना देखील आम्ही हेच ठरवू,
केंव्हा मेलं, कसं मेलं तर कोणी काही म्हणणार नाही?
असा कसा मेला म्हणून संशय कोणी घेणार नाही?
मेल्यावर तरी आम्ही घाबरायचे सोडू का?
आत्मे आमचे येतील आणि घरच्यांना सांगतील –
“ चार दिवस तरी रडा, नाहीतर
लोक काय म्हणतील? “
 
 
 
- शुभांगी पुरोहित
 
Powered By Sangraha 9.0