निर्णय चांगला, पण...

    दिनांक  14-Dec-2017   

 
रूप तेरा मस्ताना
प्यार मेरा दिवाना
भूल कोई हमसे ना हो जाए
 
आणि
 
ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ
 
 
या दोन ओळी. सध्या केंद्र सरकारने दूरचित्रवाणीवर दाखवल्या जाणार्‍या गर्भनिरोधकांच्या जाहिरातींवर बंदी घातल्याने सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे वर्णन ’उद्देश चांगला पण निर्णय योग्य की अयोग्य’ हा प्रश्न पडावा अशा स्वरूपात करावे लागेल. याचे विश्लेषण करताना प्रथमतः निरोधच्या जाहिरातींबद्दल बोलले पाहिजे. भारतात निरोधच्या जाहिराती दाखवण्याची वेळ का आली? याचा विचार करता यामागे जनतेत प्रबोधन होऊन गर्भनिरोधकांच्या वापराने पती-पत्नींनी कुटुंबनियोजन करावे, हा उद्देश असल्याचे लक्षात येते. यासोबतच असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होणारे एडस्, गुप्तरोग आणि लैंगिक आजार पसरू नये, हा एक हेतू होता. पण गेल्या काही वर्षांत निरोधच्या जाहिरातीतल्या मूळ उद्देशाला हरताळ फासत स्त्रियांचे घाणेरड्या पद्धतीने अंगप्रत्यंग दाखविण्याचे उद्योग या क्षेत्रातील कंपन्यांनी केल्याचे ठळकपणे दिसते.
 
आहार, निद्रा, मैथुन, शौच या मनुष्याच्या खासगी बाबी असल्याचे सर्वच मान्य करतात. प्रणय ही तर यापैकी सर्वात नैसर्गिक, सहज-सुंदर आणि आनंददायक गोष्ट. पण सध्या दूरचित्रवाणीवर दाखवल्या जाणार्‍या जाहिरातीतून स्त्रियांचे अधिकाधिक उत्तान आणि हिडीस दर्शन घडवून त्यांचा वापर एका कमोडिटीसारखा, वस्तू म्हणून केल्याचेच सर्रासपणे दिसते. ’वुमन ऑब्जेक्टीफिकेशन’ यालाच म्हणतात. निरोधच्या जाहिरातीमागे असलेला प्रबोधनाचा मार्ग सोडून स्त्रियांना कामातूर, लैंगिक संबंधांसाठी हपापलेल्या, साडी-कपडे काढणार्‍या अशाच स्वरूपात सादर केले जाते. निरोधची आवश्यकता, उपयुक्तता सांगणार्‍या एकाही शब्दाचा वा ओळीचा या जाहिरातीत वापर केल्याचे कुठेच दिसत नाही. उलट स्त्रियांच्या मुखात स्ट्रॉबेरी, चॉकलेट दाखवून पुरुषांच्या जननेंद्रियाच्या अनुभूतीचा आभास निर्माण करणारी थेरेच केली जातात. निरनिराळ्या फ्लेवर्समध्ये उपलब्ध होणारे निरोध दाखवत या जाहिरातींचा प्रवास कॉन्ट्रासेप्टीव प्रॉडक्टकडून रोमँटिक प्रॉडक्टकडे झाल्याचे यातून स्पष्ट होते. शिवाय सकाळ, दुपार, संध्याकाळ अगदी कधीही ज्याप्रमाणे भाद्रपद महिन्यात नर श्वान मादी श्वानांच्या मागे घुटमळतात, तशा प्रकारच्या उघड्या नागड्या जाहिराती दाखवत त्यातून केवळ आपले प्रॉडक्ट खपविण्याचा गल्लाभरू उद्योग या क्षेत्रांतील कंपन्या करतात. त्यामागे असलेल्या प्रबोधनाच्या मुद्द्याला फाट्यावर मारत सॉफ्ट पोर्नसारख्या या जाहिराती दाखवल्या जातात. साहजिकच या जाहिरातींमुळे कोणते लैंगिक शिक्षण, प्रबोधन वा जनजागृती होते? हा प्रश्न विचारलाच पाहिजे.
 
वर सुरुवातीला दोन गीतांच्या ओळी लिहिल्या आहेत. या ओळी म्हणजे फक्त चित्रपटातील गाणी नाहीत तर काही वर्षांपूर्वी दाखवल्या जाणार्‍या निरोधच्या जाहिरातीतील या ओळी आहेत. या जाहिराती आजही कित्येकांना आठवत असतील पण त्यात अश्लीलतेचा किंवा स्वैराचाराचा भाग असल्याचे कुठेही जाणवत नाही. या जाहिराती संपूर्ण कुटुंबाने बसून पाहिल्या तरी अवघडल्यासारखे होत नसे. पण आता परिस्थिती बदलली अन निरोधच्या जाहिरातींचा वेगळा काही उद्देश आहे का? हा प्रश्न विचारण्याची वेळ आली. कारण या जाहिराती सुरू झाल्या की घरोघरी चॅनेल बदलण्याचे काम तत्परतेने केले जाते. निरोधला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. पण त्या जाहिराती ज्याप्रकारे सादर केल्या जातात, त्यातून बालकांच्या मनावर नक्कीच विपरित परिणाम होण्याची शक्यता असते.
 
मानवी मनात कुतूहलाची भावना उपजतच असते. जे माहिती नाही, ते काय, का, कसे हे जाणून घेण्याची उत्सुकता तर बालवयात खूपच असते. अशावेळी निरोधच्या (की सॉफ्ट पोर्नच्या) जाहिराती दाखवल्यास अन् मुलांनी प्रश्न विचारल्यास पालकांना नेमके काय उत्तर द्यावे हेच कळत नाही. वयात आलेल्या मुलांना लिंग, योनी, प्रजनन याविषयी शास्त्रीय माहिती देऊन त्याला वाममार्गाने मिळणार्‍या चुकीच्या माहितीपासून वाचवणे, हे पालकांचे कर्तव्यच पण ही माहिती घेण्याची उत्सुकता या जाहिरातींच्या माध्यमातून चाळवली जाणे कितपत योग्य?
 
आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, या जाहिरातींवर सरसकट सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत घातलेली बंदी योग्य की अयोग्य? ही बंदी समर्थनीय म्हणावी अथवा नाही? कारण कोणत्याही विषयाची जनजागृती प्रबोधन करण्याचे जाहिरात हेच आताच्या काळातील प्रभावी माध्यमआहे. त्यावर बंदी आणून काही साध्य होण्याची शक्यता नाहीच. उलट या जाहिरातींच्या सादरीकरणासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे, नियम आखून दिले असते तर ते चांगले झाले असते. आता जाहिरातीच बंद झाल्याने लोकांमध्ये जनजागृती कशी होणार? यामुळे दुसराच कोणतातरी धोका निर्माण होण्याचा संभव आहे. नुकत्याच ’लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकाने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी एक कोटी सात लाख गर्भपात होतात तर देशात जन्माला येणार्‍या मुलांपैकी ५० टक्के बाळे ही योग्य कुटुंबनियोजनाअभावी जन्माला येत असल्याचेही यात म्हटले आहे. याचाच अर्थ देशातील नागरिकांना कुटुंबनियोजनाचे महत्त्व अधिक ठळकपणे समजावून सांगणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत कुटुंबनियोजनाचे महत्त्वाचे साधन असलेल्या निरोधच्या जाहिरातींवर घातलेली वेळमर्यादा बरोबर कशी म्हणता येईल?
 
- महेश पुराणिक