सतरंगी वन्यजीवन

    दिनांक  12-Dec-2017   

 
आपल्याला अवतीभवती निसर्ग, झाडे, वेली, फुले, प्राणी, पक्षी, नद्या-नाले दिसतात. सृष्टीच्या निर्मितीपासून पृथ्वीवर जशी जीवांची उत्पत्ती-उत्क्रांती झाली, तशी या अफाट अशा विश्वातील प्रत्येक घटकाचे जीवन एका लयीत-तालात सुरु आहे. कधी यात आपत्ती-संकटांमुळे खंड पडला. पण निसर्गातील सर्वच घटकांचे जीवंत संगीत आजही आपल्याला ऐकू येते, आपल्या कानांत हिंस्त्र पशुंचे भयानक ध्वनी कानठळ्या बसवतात तर पक्ष्यांचे मंजुळ आवाज-संगीत गुंजते. चिमणीचा चिवचिवाट, कोकीळेची कुहू-कुहू, कावळ्याची काव-काव ही तर आपल्या ओळखीचीच. निरनिराळे पक्षी, त्यांचे रंग, त्यांची शरीररचना, त्यांची पिसे, पंख आकर्षित करणारी, डोळ्यांना सुखावणारी अशीच असते.
 
मात्र, माणूस जसजसा हिंसक होत गेला, आपल्या फायद्यासाठी या मुक्या जीवांचा जीव घेऊ लागला, त्यांच्या निवार्‍यांचा, वसतीस्थानाचा घास घेत गेला, तसतशी या प्राणी-पक्ष्यांची संख्या कमी होऊ लागली. कित्येकांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. पण आता यासंदर्भातही जनजागृती होत आहे. निरनिराळे गट, संस्था, संघटना वन्यजीवांच्या हक्कांसाठी, त्यांच्या संरक्षणासाठी, निवार्‍यासाठी, वसतीस्थानासाठी संघर्ष, आंदोलने करत आहेत. याच माळेत आपला खारीचा वाटा असावा, असा विचार करुन आपणही काहीतरी करु शकतो, असा विश्वास ठेऊन ’ती’ने काम करण्याचे ठरवले आणि बघता बघता वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी ‘वाइल्ड लाईफ आर्टीस्ट ऑफ द इयर’ (२०१७-१८) हा पुरस्कार मिळवणारी भारताची पहिली कलाकार ठरली.
 

 
 
श्वेता देसाई तिचे नाव. मूळची सिंधुदुर्गातील असलेली आणि आता गोव्याच्या मातीत वन्यजीवांच्या संरक्षण-संवर्धनासाठी काम करणारी श्वेता एक वाइल्ड लाईफ आर्टीस्ट आहे. आपल्या चित्रकारीच्या माध्यमातून वन्यजीवांसाठी आपण काहीतरी करु शकतो, या विचाराने प्रेरित होऊन तिने पूर्णवेळ वाइल्ड लाईफ आर्टीस्ट होण्याचे ठरवले आणि ते सत्यातही उतरवले. श्वेता पेन्सिलच्या माध्यमातून कॅनव्हासवर प्राणी-पक्षी जिवंत करते. तिने पेन्सिलद्वारे साकारलेली पक्षी, प्राण्यांची चित्रे पाहून तिचा निसर्गाविषयी असलेला जिव्हाळा लक्षात येतो. कला आणि ती कलाही पर्यावरण संरक्षणासाठी समर्पित केलेली, हे श्वेताच्या चित्रांकडे पाहून लगेच कळते.
 
बॅचलर इन फाइन आर्टस्‌चे शिक्षण घेऊन प्रथम एक शिक्षिका म्हणून काम करणार्‍या श्वेताने नंतर नोकरी सोडत पूर्णवेळ केवळ चित्रकलेसाठी वाहून घेतले. ती मुक्त चित्रकार असून तिला नृत्य, एकपात्री प्रयोग, कविता-लेख लिहिण्याचाही छंद आहे. एवढेच नव्हे तर भरतनाट्यमची आवड असलेल्या श्वेताने त्याचे प्रशिक्षणही घेतले आहे. पण चित्रकला हीच तिची प्रथम आवड असून याची प्रेरणा तिला तिचे वडील आणि कला-जाहिरातक्षेत्रात कार्यरत असलेल्या दिलीप देसाई यांच्याकडून मिळाली. त्यांनी तिला मार्गदर्शन केले, दोघा बापलेकीचे स्वप्न होते की, श्वेताने वाइल्ड लाईफ आर्टीस्ट व्हावे.
 

 
 
यामागची गोष्टही मजेशीर आहे. तिच्या घरी गॅलरीत श्वेताची आई रोजच दाणे, पाणी आणि काही खाद्यपदार्थ ठेवत असे. याचवेळी श्वेताला तिच्या भावाने कॅमेरा घेऊन दिला. ज्यातून तिला रोज गॅलरीत येणार्‍या पक्ष्यांना क्लिक करता येऊ लागले. पक्ष्यांचे फोटो क्लिक करता करता सहा महिन्यांच्या काळात सुमारे १०० पक्षी आपल्या गॅलरीत येऊन गेल्याचे तिच्या लक्षात आले, हे खरे तर आश्चर्य होते. नंतर तिला वाइल्ड लाईफ आर्टीस्ट असलेल्या कार्ल डी सिल्वा यांच्याकडून वाइल्ड लाईफ आर्टीस्ट म्हणजे काय याची माहिती मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाने प्रभावित होऊन श्वेता आणि तिच्या वडीलांनी कलेच्या माध्यमातून पर्यावरण, निसर्ग रक्षण-संवर्धनाचे कार्य करण्याचे ठरवले.
 
श्वेताने आपली पेन्सिल आणि रंगाच्या साह्याने मग चित्रे काढायला सुरुवात केली. तिचे पहिले चित्र होते किंग फिशर या सागरी पक्ष्याचे. नंतर चित्रांची संख्या वाढत गेली आणि तिला प्रसिद्धीही मिळत गेली. दरम्यानच्या काळात तिला आर्टीस्ट फॉर वाइल्ड लाईफची माहिती मिळाली. यातूनच तिला ऑल इंडिया वाइल्ड लाईफ पेंटिंग कॉन्टेस्ट असल्याचे समजले. बंगळुरुला असलेल्या या स्पर्धेत तिने आपली ५ चित्रे पाठवली. या पाचही चित्रांची या स्पर्धेत निवड झाली. काही दिवसांनी आर्टीस्ट फॉर वाइल्ड लाईफने स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा केली, ज्यात श्वेता अव्वल आली आणि ती भारताची पहिली वाइल्ड लाईफ आर्टीस्ट ऑफ द इयर (२०१७-१८) बनली. आता श्वेताच्या चित्रांचे १९ ते २४ डिसेंबर दरम्यान, ठाण्याच्या काबुरबावडी येथील कालाभवनात प्रदर्शन आहे, तरी सर्वांनी या प्रदर्शनाला भेट देऊन तिला शुभेच्छा देऊया.
 
- महेश पुराणिक