तुलनेत खरोखर जग जगते ...

09 Nov 2017 15:35:36


 

‘दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, औरों का गम देखा तो मै अपना गम भूल गया.’ कधी कधी काही गाणी सारखी ऐकून ऐकून लक्षात राहतात त्यातलंच हे एक गाणं. फार काही क्लासिक वगैरे नाहीये हे गाणं, पण गीतकाराचा मानवी मनाचा फार उत्तम अभ्यास असावा असं वाटून जातं याची शब्दरचना पाहून.

 

सुःख हे मानण्यावर असतं असं आपण नेहमीच ऐकतो. टू व्हीलरवाला, चार चाकीवाल्याकडे पाहून दुःखी होत असेल तर सायकल वाल्याकडे पाहून त्याला आपल्या स्थितीबद्दल बरं वाटत असेल. दुःखाचं पण असंच आहे. आपल्यापेक्षा दुःखी माणूस पाहिला कि आपलं दुःख सुसह्य वाटायला लागतं.

 

या मनोव्यापाराचा व. पु. काळ्यांनी त्यांच्या एका कथेत खूप चांगला वापर केलेला मला आठवतो. त्या गोष्टीत एक माणूस होता जो त्याला भेटलेल्या प्रत्येक दुःखी माणसाला, त्या माणसाच्या दुःखापेक्षा मोठ्या वाटणाऱ्या आपल्या दुःखाची गोष्ट सांगायचा. जी खोटी असायची. आपलं दुःख ऐकून त्या माणसाला स्वतःचं दुःख कमी वाटावं असा त्याचा उद्देश असायचा. आपली स्थिती फारच चांगली आहे असं वाटून समोरचा दुःखातही जरा सुखावायचा.

 

मानवी मनाच्या ह्या तुलना - शरण प्रवृत्तीचा जाहिरातींमध्ये फार छान वापर केलेला दिसतो. “ भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे? ”, “ भला उसकी साडी मेरी साडीसे सफेद कैसे? “. ही आणि ह्याच सारख्या अनेक जाहिरातीत आपल्या product ची दुसऱ्या product बरोबर तुलना करूनच त्याचं महत्व किंवा श्रेष्ठत्त्व मनावर बिंबवलं जातं. एवढंच कशाला दोन सरकारांच्या यशस्वितेचे मोजमाप सुद्धा तुलानात्मकच असतं.

 

आपण सुद्धा एखादी मोठी वस्तू विकत घेताना तशाच पण वेगवेगळ्या कंपनी किंवा brand च्या वस्तूशी तुलना करूनच खरेदीचा निर्णय घेतो. आता तर साईट वरच अशी विविध वस्तूंची तुलना करायची सोय असते. खूपच सोपं झालंय तुलना करणं आता त्यामुळे.

 

आपल्या जीवनातल्या जवळ जवळ प्रत्येक क्षेत्रात तुलनेचा अंतर्भाव झालेला दिसतो. साहित्याच्या क्षेत्रात तर ‘ अ आणि ब यांचा तौलनिक अभ्यास ‘ या विषयावर असंख्य लोकांच्या पीएचडी. असतील.

 

गणितात तर समीकरणे आणि असमीकरणे म्हणजे परत तुलनाच की! विज्ञानातल्या रसायनशास्त्रात, रासायनिक समीकरण संतुलित करणं म्हणजे पुन्हा तुलना आहेच! वर्तमानपत्रात येणारी साधी लहान मुलांची पुरवणी बघितलीत तर तिथेही – दोन चित्रांमधील फरक ओळखा – म्हणजे तुलना करायला शिकवणारे आणि त्यातून निरीक्षणशक्ती विकसित करणारे सदर असते. लहानपणीची अजून एक गम्मत आठवली. सर्व भावंडाना खाऊचे वाटे दिल्यावर प्रत्येकजण दुसऱ्याच्या हातातला खाऊ पाहून आपल्याला लहान तुकडा मिळाला आहे की काय ? हे हळूच पारखून घेत असे. बालपणातच मिळालेला, तुलनेच्या सवयीचा, हा प्रत्यक्ष व्यवहारातला धडा. सध्याच्या – हम दो, हमारा एक – जमान्यात ह्या अनुभवाची गंम्मत दुर्मिळच !

 

प्रेमगीतं लिहिणाऱ्यांचे तर तुलनेशिवाय पानचं नाही हलणार. जुन्या जमान्यातील गीतांमध्ये चंद्राची आणि प्रेयसीच्या मुखकमलाची केलेली तुलना तर चंद्रालाही लाजवते. हल्लीच्या गाण्यामध्ये, “ सुनो न संगेमरमर की ये मिनारे, कुछ भी नही हैं आगे तुम्हारे “ असं म्हणून ताजमहालाला लाजवले आहे. त्यामुळेच बहुदा तो काळा पडायला लागलाय बहुतेक!

 

समीक्षकांची आणि रसिकांचीही सर्वात आवडती आणि जिला चिरंजीवी म्हणता येईल अशी तुलना आहे दोन गान हिऱ्यांची. अगदी बरोबर ओळखलंत! लता आणि आशा. एकीने संगीताचा वेलू गगनावर चढवला तर दुसरीने सर्वसामान्य गान रसिकांच्या मनात संगीताचे अमरत्त्व आशांकित केले. मनाच्या पारड्यात त्यांची विविध गाणी टाकली तर पारडे एकाच बाजूला झुकलेले राहणे अशक्यच आहे. मोगरा आवडतो असे म्हणले तर त्याचा अर्थ सोनचाफा आवडत नाही असा होत नाही. नाही का? नवजीवनाचा संदेश घेऊन आलेले उगवतीचे रंग आणि श्रांत क्लांत जीवाला विश्राम देणाऱ्या निशेच्या आगमनाची सूचना घेऊन आलेली मावळतीची रंग उधळण यांपैकी कोण अधिक हवंसं हे कसं सांगता येईल ? संगीत समीक्षक भलेही कोणाही एकीला श्रेष्ठ मानोत माझ्या सारख्या सामान्य रसिकाला दोन्हीही सारख्याच प्रिय राहतील.

 


तुलनेची सर्वच रूपं अशी साधी सुधी आणि निरुपद्रवी नसतात. विशेषतः दोन भावंडांची, आपल्या पाल्याची दुसऱ्या पाल्याशी, वर्गातल्या हुशार विद्यार्थ्याची सामान्य विद्यार्थ्याशी, ही तुलना न्यूनगंड निर्माण करण्यापासून गुन्हेगार तयार करण्यापर्यंत काहीही घडवू शकते. अनेक शिक्षणतज्ञ आणि मानसोपचार तज्ञ आपल्या लेखांमधून अशी तुलना न करण्यासंबंधी इशारे देत असतात ते याचं कारणामुळे. अशी तुलना टाळलेलीच बरी.

 

खरं म्हणजे काही काही गोष्टी ह्या तुलनेच्या पलीकडच्या असतात. कारण मनात त्या गोष्टींना मिळालेलं अढळ स्थान! मनात त्या बद्दल असलेलं ओतप्रोत प्रेम आणि त्यामुळे दिलं गेलेलं एकमेवा द्वितियत्व. मातृभूमी ‘ स्वर्ग से महान ‘ होते ती याच भावनेमुळे. जगाच्या पाठीवर कितीही सुंदर देश असले तरी मातृभूमीचे मनातले स्थान कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. या न त्या कारणाने परदेशात स्थिरावलेले आपले बांधव आपले भारतीयत्त्व प्रयत्नपूर्वक जपताना दिसतात. आपल्या देशातील घडामोडींचा कानोसा घेताना दिसतात. इथल्या भल्या - बुऱ्या घटनांवर व्यक्त होतात. त्यानाही इथल्या मातीचे वेध लागतात. आपल्या पुढील पीढीला भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून ते धडपडतात. तुलनेने अधिक संपन्न, अधिक प्रगत देशात राहतानासुद्धा मातुभूमीशी आपली नाळ तुटू नये अशीच त्यांची इच्छा दिसते. प्रेमाची ही उत्कट भावना तुलनेला मनात थाराच देत नाही. ‘ अतुल्य भारत ‘ वाचताना, म्हणताना ऊर अभिमानाने भरून येतो. एका गीताच्या ओळींमध्ये थोडासा बदल करून म्हणावसं वाटतं, ‘ प्रेमाला तुलना नाही हे देवाघरचे देणे, हे देवाघरचे देणे.’

 

- शुभांगी पुरोहित

 

Powered By Sangraha 9.0