स्वतंत्र भारतातील प्रथम मतदार श्याम शरण नेगींनी वयाच्या १००व्या वर्षी मतदान केले

09 Nov 2017 19:23:51

 

हिमाचल प्रदेश निवडणूकीत ७४ टक्के मतदान - उप निवडणूक आयुक्त संदीप सक्सेना


 

हिमाचल प्रदेश : स्वतंत्र भारताचे प्रथम मतदार श्याम शरण नेगी यांनी हिमाचल प्रदेश निवडणूकीत आज मतदानाचा हक्क बजावला. याबाबतच्या माहितीला हिमाचल प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. योगायोग म्हणजे नेगी यांनी यावर्षी १००व्या वर्षांत पदार्पण केले आहे. तसेच भारतीय मतदान प्रक्रियेतील सर्वांत आधुनिक पद्धत व्हीव्हीपीटीए किंवा व्हीव्हीपॅट या प्रणालीद्वारे त्यांनी आपले मत दिले आहे. ही भारतीय मतदानाच्या इतिहासातील ऐतिहासिक घटना असून अधिकाधिक नागरीकांनी मतदान करावे यासाठी प्रेरणादायी घटना म्हणून नेटकरी या घटनेविषयी विशेष उत्सुकतेचे माहिती घेत आहेत. आज झालेल्या या निवडणूकीत ६८ मतदार संघात मिळून ५ वाजेपर्यंत सुमारे ७४ टक्के मतदान झाल्याची नोंद हिमाचल प्रदेश उप निवडणूक आयुक्त संदीप सक्सेना यांनी दिली आहे.

 

 

श्याम शरण नेगी यांनी पहिल्यांदा २५ ऑक्टोबर १९५१ रोजी मतदान केले होते. आज झालेल्या मतदानात ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षणीय असल्याचे निरीक्षण राज्य निवडणूक विभागाने नोंदवले आहे. हिमाचल प्रदेशात २ वाजेपर्यंत ५५ टक्के मतदान झाले होते. तेव्हापासूनच अधिक मतदानाची शक्यता वर्तवण्यात येत होती.

 


 

हिमाचल प्रदेशात १ लाख १२ हजार प्रथम मतदार असून त्यातील अनेकांनी मतदानात सहभाग घेतल्याची शक्यता शासकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे. आज झालेल्या मतदानात ६८ मतदार संघातून ७ हजार ४७९ केंद्रांवर मतदानासाठी दिवसभर उत्साह दिसून आला.

Powered By Sangraha 9.0