भरड धान्याची खरेदी हमीभावानेच करा: नवल किशोर राम

    दिनांक  09-Nov-2017


औरंगाबाद : शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमीभावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये. तसेच शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीचा लाभ मिळावा यासाठी पणन हंगाम किमान आधारभूत किंमत खरेदी योजना राबविण्यात येते. म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ज्वारी, बाजरी, मक्याची विक्री हमीभावाने करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

 


जिल्हाधिकारी कार्यालयात पणन हंगाम २०१७-१८ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेच्या आढावा बैठकीत राम बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम, जिल्हा उपनिबंधक एस. बी. खरे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे आदींसह सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांची उपस्थिती होती.

 


हमीभावापेक्षा कमी दराने भरडधान्यांची शेतकऱ्यांकडून खरेदी होणार नाही याची दक्षता पथकांनी घ्यावी. असा प्रकार आढळून आल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही राम यांनी केले. जिल्हा उपनिबंधक कार्यालयानेही सतर्कता बाळगून अचानक भेटी देऊन पाहणी करावी. तालुकास्तरावरील समितीनेही दक्ष राहून कार्यवाही पार पाडावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधितांना केल्या.

 


जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी यंदा शेतकऱ्यांकडील भरडधान्य खरेदी करताना ऑनलाइन पद्धतीने खरेदी करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी, आधार क्रमांक व बचत खाते क्रमांक नोंदणी करण्यात येत आहे. सदर ऑनलाइन खरेदी करीता NEML NCDEX Group Company यांचे platform वर नोंदणी करावयाची आहे, असे सांगितले. त्याचबरोबर जिल्ह्यात १० ठिकाणी खरेदी विक्री संघांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये करमाड, पैठण, फुलंब्री, वैजापूर, गंगापूर, लासूर स्टेशन, सोयगाव, सिल्लोड, कन्नड आणि खुलताबाद खरेदी विक्री संघाचा समावेश असल्याचेही खाडे यांनी सांगितले. बैठकीचे प्रास्ताविक डॉ. कदम यांनी केले.