जलयुक्त शिवार अभियानातील पुरस्कारांचे ८ नोव्हेंबर रोजी वितरण

    दिनांक  07-Nov-2017

जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते होणार वितरण


बुलढाणा : महाराष्ट्र राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार पुरस्कारांचे उद्या अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात वितरण करण्यात येणार आहे. मृदा आणि जल संधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.


उद्या दुपारी ३.३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुरस्कारांमध्ये बुलढाणा जिल्ह्यात येऊलखेड ता. शेगांव या गावाने प्रथम क्रमांक पटकाविला असून साखरखेर्डा ता. सिं.राजा गावाने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तसेच आंबेटाकळी, अटाळी व फत्तेपूर ता. खामगांव गावांना अनुक्रमे तृतीय, चतुर्थ व पाचव्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.


तसेच तालुक्यांमध्ये खामगांव तालुक्याला प्रथम आणि दे.राजा तालुक्याला द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. सदर पुरस्कार स्वीकारण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक व जलयुक्त शिवार अभियानात सक्रीय सहभाग असलेली एक महिला प्रतिनिधी यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. तसेच तालुका स्तरावरील पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपविभागीय अधिकारी (महसूल), तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांना निमंत्रीत करण्यात आले आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.