एका कबुलीजबाबाची कथा...

    दिनांक  28-Nov-2017   

 
 
 
हल्ली ‘क्राईम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ आणि दूरचित्रवाणीवरील तत्सम गुन्हेगारीविश्वाचा पर्दाफाश करणार्‍या कार्यक्रमांना प्रेक्षकांचीही पसंती मिळताना दिसते. कारण काय तर, असले कार्यक्रम पाहून आपणही अधिक सतर्क होतो, जास्त सावधानता बाळगतो. तेव्हा, अशा या गुन्हेगारीजगताचे आणि त्यामागे शिजणार्‍या कटकारस्थानांचे भारतीयांना नेहमीच आकर्षण राहिले आहे. त्यामुळे दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम असोत, वृत्तपत्रांतील यासंदर्भातील बातम्या किंवा कादंबर्‍या-पुस्तकं, ‘गुन्हेगारी’ किंवा ‘क्राईम’ हक्कानं वाचणारा-बघणारा एक वर्ग निश्चितच आहे. पण, बहुतांश गुन्हेगारीसंदर्भातला मजकूर हा चोरी, लुटमार, दरोडे, फसवणूक, बलात्कारापर्यंत काहीसा मर्यादित असतो. त्यामध्ये देशविरोधी दहशतवादी कटकारस्थाने आणि अंडरवर्ल्डमधील काळ्या जगताचे चित्रण-लेखन क्वचितच आढळते. कारण, साहजिकच ही आतल्या गोटातील ‘सिक्रेट’ माहिती, संवेदनशील रहस्य माध्यमांपर्यंत, पत्रकारांच्या कानी पोहोचणार नाहीत, याचीही देशाची सुरक्षितता ध्यानात घेता सुरक्षा यंत्रणांकडून काळजी घेतली जाते. कारण, माध्यमांमध्ये अशी एखादी खळबळजनक माहितीही लगेचच ‘ब्रेकिंग न्यूज’ ठरते आणि मग त्याचा कसा, कोण, कुठे वापर करेल, याचा प्रत्यय २६/११च्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या उथळपणामुळे अख्ख्या जगासमोर आलाच. त्यामुळे अशा विषयांची हाताळणी अधिक जबाबदारीने करणे क्रमप्राप्त ठरते आणि नेमकी हीच बाब हेरुन अनुभवी पत्रकार आणि लेखक दिनेश कानजी यांचे ‘थरार एका दहशतवादी टोळीच्या खातम्याचा - उसबा’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. ‘त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा- माणिक सरकार’ या पुस्तकाच्या यशानंतर एका वेगळ्याच पठडीतील कथा कानजींनी कादंबरीरुपातून वाचकांसमोर रंगवली आहे.
 
 
‘इंडियन मुजाहिदीन’ या भटकळ बंधूंच्या दहशतवादी कारवायांचा काळा चेहरा ‘उसबा’ या कादंबरीच्या स्वरुपात मांडण्याचा काहीसा आगळावेगळा प्रयत्न कानजींनी केला आहे आणि या वेगळ्या प्रयत्नाची सुरुवातच कादंबरीच्या नावापासून होते. ‘उसबा’ म्हणजे काय? हाच प्रथम प्रश्न वाचकाला कादंबरीची पाने उलगडण्यास प्रवृत्त करतो. लेखकाने लिहिलेल्या प्रस्तावनेतच त्याचा व्यवस्थित उलगडा होतो. ‘उसबा’ हा ऊर्दू शब्द असून त्याचा अर्थ होतो दहापेक्षा जास्त तरुणांचा गट आणि असाच एक भारताविरोधी युद्ध पुकारणार्‍या दहशतवाद्यांचा गट म्हणजे इंडियन मुजाहिदीन. ‘जिहाद’चे हिरवे कफन माथी बांधून धर्मांधळे झालेले आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाऊन हजारोंचे रक्त सांडणारे दहशतवादी आणि त्यांच्या कृष्णकृत्यांचे चित्रण लेखकाने या कादंबरीत केले आहे.
 
 
‘इंडियन मुजाहिदीन’चा कुख्यात दहशतवादी आणि मास्टरमाईंड यासिन भटकळला २०१३ मध्ये भारतीय सुरक्षा यंत्रणांनी अटक केली. अटकेनंतर भटकळने दीडशे पानांचा जबाब एनआयएकडे नोंदवला. या जबाबातून अनेक धक्कादायक गोष्टी सुरक्षा यंत्रणांच्या समोर आल्या आणि दहशतवादाचे हे जाळे पाकिस्तान आणि आयएसआयशी किती घठ्ठपणे जोडले गेले आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. भटकळचा जबाब, दहशतवादी कारस्थाने यावर आधारित हे पुस्तक असले तरी लेखकाने त्याला ‘फिक्शन’चे स्वरुप देऊन ‘कादंबरी’ म्हणून ती वाचकांसमोर मांडली आहे. कारण, या प्रकरणातील अशीही बरीच संवेदनशील तथ्य आणि सत्य उजेडात येणे लेखकाच्या दृष्टिकोनातून सर्वांसमोर मांडणे उचित ठरले नसते. त्यामुळे यासिन भटकळ या मुख्य पात्राचे नावही परवेज मुसा असे वापरण्यात आले असून इतरही पात्रांची नावे बदलली असून काही व्यक्तिरेखाही काल्पनिक आहेत. कादंबरीला एकूणच भटकळच्या जबाबाचे स्वरुप असले तरी लेखकाने प्रत्येक माहितीची गुंफण अतिशय पद्धतशीरपणे केल्याचे पुस्तक वाचताना प्रकर्षाने जाणवते. ‘आयएम’ एक दहशतवादी संघटना असल्यामुळे साहजिकच अनेक पात्रांची संख्याही या कथानकाच्या नाट्यात अधिकच भर घालते. ‘उसबा’ या कादंबरीतील कालखंडही लेखकाने विचारपूर्वक निवडलेला दिसतो. १९९९ ते २०१४. म्हणजे, एअर इंडियाच्या ‘आयसी-८१४’च्या अपहरणनाट्यानंतर अपरिहार्यता लक्षात घेऊन भारत सरकारला दहशतवादी मौलाना मसूद अजहरची करावी लागलेली सुटका आणि २०१४च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘आयएम’ने परिस्थिती चिघळवण्याचा केलेला प्रयत्न. तेव्हा, तारखा, कालखंड आणि संदर्भांच्या बाबतीत लेखकाने योग्य समतोल साधला आहे.
 
 
कादंबरी वाचताना वाचकांची भावनिक गुंतवणूक सर्वात महत्त्वाची. म्हणजे, एकदा कादंबरी हातात घेतली की, ती खाली न ठेवता एका खेपेत (अधिक मोठी नसल्यास) वाचून संपविण्याचा सहसा कल असतो. ‘उसबा’ वाचतानाही वाचकांना पुढे काय? परवेज मुसा पकडला जाईल का? कबुलीजबाबात काय धक्कादायक माहिती समोर येईल? अमूक एका ठिकाणाचा कट असा रचला गेला होता तर....किंवा को कट असा फसला तर... यांसारख्या बर्‍याच गोष्टी वाचकांना कादंबरीशी खिळवून ठेवतात. त्याचबरोबर भारतीय सुरक्षा यंत्रणा, त्यांचे आपापसातले संपर्क आणि गुप्त मोहीम राबविण्याचे, त्याची अंमलबजावणी करण्याचे कौशल्यही ‘उसबा’ वाचताना वेळोवेळी अधोरेखित होते.
 
 
दहशतवाद हा सध्या जगाला भेडसावणारा मोठा प्रश्न असून भारतासह सर्व देश या दहशतवादाची पाळेमुळे खणून काढण्याच्या पूर्ण तयारीत आहेत. पण, आपला शेजारी देश पाकिस्तान मात्र आयएसआयच्या माध्यमातून भारताविरोधी ‘आयएम’सारख्या दहशतवादी संघटना आणि जिहादींची फौज उभारण्यात धन्यता मानतो. तेव्हा, पाकिस्तानचा भारतीय दहशतावादी घटनांतील सहभाग, दहशतवाद्यांना दिले जाणारे प्रशिक्षण याची मुसाच्या कबुलीजबाबातून बाहेर आलेली माहिती खरंच धक्कदायक आणि संतापजनक आहे. दहशतवाद्यांची कडवी जिहादी मानसिकता, पराकोटीचा हिंदूद्वेष आणि भारताला उद्ध्वस्त करण्यासाठी चक्क अणुबॉम्बही टाकण्याची तयारी या संघटनांचे काळे मनसुबे स्पष्ट करते.
 
 
 
एकूणच मुसाच्या अटकेपूर्वी आणि अटकेनंतरही कादंबरी वाचकांना गुंतवून ठेवतेच. पुस्तकाचे मुखपृष्ठ, ‘उसबा’ या शब्दासाठी वापरलेला हिरवा रंग, त्यावरील रक्तपाताचे सूचक लाल ठिपके आणि धारदार तलवार अगदी सूचक भाष्य करते. कादंबरीत रेखाचित्रांचा किंवा त्या त्या घटनांशी संबंधित छायाचित्रांचा वापर करण्यात आला असता तरी नक्कीच ही कादंबरी अधिकच खुलली असती, यात शंका नाही. पण, एकूणच जर तुम्हाला गुन्हेगारी, दहशतवाद आणि जिहादी मानसिकता नीट समजावून घ्यायची असेल तर ‘उसबा’ ही कादंबरी वाचायला हरकत नाही.
 
 
पुस्तकाचे नाव : थरार एका जिहादी टोळीच्या खातम्याचा - उसबा
लेखक : दिनेश कानजी
प्रकाशन : चंद्रकला प्रकाशन
मूल्य : २२० रु
पृष्ठसंख्या : १९२
 
 
- विजय कुलकर्णी