राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द

    दिनांक  24-Nov-2017

सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी १ महिन्याची मुदत


 

औरंगाबाद : शिवसेना नेते तसेच दुग्धविकास व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. दरम्यान न्यायालयाच्या या आदेशाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत अशी प्रतिक्रिया खोतकर यांनी दिल्यामुळे न्यायालयाने आपल्या निर्णयाला ४ आठवड्यांची स्थगिती दिली आहे. मात्र यानंतर खोतकर यांची आमदारकी रद्द केली जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.


खोतकर यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्जाची तारीख ओलांडल्यानंतर आपला अर्ज गैरमार्गाने दाखल केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. कॉंग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी या संबंधी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत खोतकर हे निवडणुकीसाठीच अपात्र होते, त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यावर सुनावणी केली. खंडपीठाचे न्यायाधीश नलावडे यांनी यासंबंधी सर्व पुरावे तपासून पहिले. यामध्ये खोतकर हे दोषी आढळल्यानंतर त्यांनी त्यांची आमदारकी अवैध ठरवत त्यांचे पद रद्द करण्याचे आदेश दिले.


दरम्यान यावर खोतकर यांनी हे सर्व आरोप खोटे असून उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात दाद मागण्यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयात जाऊ अशी प्रतिक्रिया न्यायालयात दिली. खोतकर यांच्या या वक्तव्यानंतर न्यायालयाने खोतकर यांना सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्यासाठी ४ आठवड्यांची मुद्दत दिली. तसेच या चार आठवड्यात न्यायालयाकडून कसलेही आदेश न आल्यास त्यांचे हे पद रद्द केले जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.