प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज करावेत : परभणी जिल्हा प्रशासन

    दिनांक  23-Nov-2017

 

परभणी : प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०१७ मध्ये राबविण्यास १७ नोव्हेंबर २०१७ च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली असून जिल्ह्यात योजनेची अंमलबजावणी नॅशनल इन्शुरन्स कंपनीमार्फत केली जाणार आहे. नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे पीकाचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळांनी अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. जिल्ह्यातील अधिसूचित महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी गहू प्रति हेक्टरी ३५९.७० रुपये, ज्वारी प्रति हेक्टरी ३६० रुपये, हरभरा प्रति हेक्टरी ३६० रुपये, करडई प्रति हेक्टरी ३३० रुपये, भुईमूग प्रति हेक्टरी ५४० रुपये याप्रमाणे पिकांचा विमा हप्ता १ जानेवारी २०१८ पूर्वी भरुन पीक संरक्षित करावे असे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी कळवले आहे.

 

पीक विम्यासाठी अर्ज दाखल करण्याची सुविधा राष्ट्रीयीकृत, व्यापारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे उपलब्ध आहे. तसेच बिगर कर्जदार शेतकरी वैयक्तिकरीत्या किंवा पोस्टाने त्यांचा विमा प्रस्ताव विमा हप्त्यासह विमा कंपनीस पाठवून योजनेत सहभागी होऊ शकतात. तसेच शासनाने प्राधिकृत केलेल्या पिक विमा संकेतस्थळाद्वारे किंवा विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारे सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, संबंधित तालुका कृषि अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयकृत बँकेशी संपर्क साधावा असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.