सोलापूर महापालिकेवर राष्ट्रवादीचा 'जवाब दो' मोर्चा

    दिनांक  22-Nov-2017सोलापूर : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून भाजप सरकारच्या निषेधार्थ काल सोलापूर महानगरपालिकेवर 'जवाब दो' मोर्चा काढण्यात आला. केंद्रात, राज्यात आणि आता महानगरपालिकेमध्ये देखील भाजपची सत्ता असताना सोलापूरचा विकास का होत नाही ? या प्रश्नावर उत्तर मिळवण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हजोरांच्या संख्याने कॉंग्रेस कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.


विस्कळीत पाणीपुरवठा, डेंग्यू-स्वाईन फ्ल्यूचे थैमान, खराब रस्ते, स्मार्ट सिटीचा उडालेला बोजवारा, कचऱ्याची समस्या, मोकाट जनावरे, भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर, मनपातील महत्वाची रिक्त पदे, परिवहन कामगारांच्या तीन महिन्यांपासून रखडलेल्या पगार, गाळे भाडेवाढीचा लटकलेला निर्णय, शौचालयांअभावी महिलांची होणारी कुचंबणा अशा विविध प्रश्नांकडे यावेळी महापालिकेचे लक्ष वेधण्यात आले.


'केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे, सोलापूर महापालिकेतही भाजपाचीच सत्ता आहे, दोन मंत्री, एक खासदार , ४९ नगरसेवक, महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती व सभागृह नेतासुद्धा भाजपचाच असताना सोलापूरचा विकास होत नाही ही शोकांतिका आहे. दोन देशमुखांच्या गटबाजीत सोलापूरचा विकास खुंटला आहे. यांच्याकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नाही. या दोघांच्या भांडणामुळे सोलापूरचा विकास होत नाही आणि निधीही आणला जात नाही त्यामुळे आता सोलापूरच्या विकासासाठी दोन्ही देशमुखांच्या छाताडावर बसण्याची वेळ आली आहे,' असे वक्तव्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी यावेळी केले.