बिहारमधील कापाकापी

    दिनांक  22-Nov-2017   


राजकारणामध्ये विरोधकांवरील टीका, टोले आणि टिप्पण्या तशा नवीन नाहीत. त्यातच ऐन निवडणूक रंगात असताना तर या राजकीय नाट्यामधील एक-एक संवाद कायमस्वरूपी स्मरणीय होतात. गुजरातच्या रणधुमाळीतही म्हणूनच राहुल गांधींनाही पंतप्रधानांवर वैयक्तिक टीका नको म्हणून कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला देण्याची उपरती झाली. पण म्हणतात ना,टाळी दोन हातांनी वाजते. क्रियेवर प्रतिक्रिया मिळते. तसाच काहीसा प्रकार बिहारच्या वाक्‌युद्धात पाहायला मिळाला. बिहारचे भाजपचे नेते नित्यानंद राय यांनी थेट मोदी विरोधकांचे हात आणि बोटं कापण्याची भाषा केली आणि त्यांच्यावर साहजिकच टीकेचा एकच वर्षाव झाला. मग काय, विरोधकांनीही आणि खासकरून चाराखाऊ राजदच्या लालूंच्या श्रीमती आणि बिहारच्या नामधारी माजी मुख्यमंत्री म्हणून राबडी देवींनीही कापाकापीचीच भाषा केली. राबडीदेवी म्हणाल्या, ‘‘भाजपचे काही नेते म्हणतात की, मोदींवर टीका केली तरी हात तोडले जातील आणि बोटं छाटली जातील. मी अशा नेत्यांना आव्हान करते की, बिहारच्या लोकांचे हात आणि बोटं त्यांनी तोडूनच दाखवावीत. त्यांनी असे काही केले तर बिहारची जनता शांत बसणार नाही. त्यांचे हात तोडायलाही लोकं मागे-पुढे बघणार नाहीत. 

 

बिहारमध्ये असे अनेक ‘हिरो’ आहेत, जे नरेंद्र मोदींचा गळा कापायला आणि हात तोडायलाही कमी करणार नाहीत. ’’राबडीदेवी किंवा यादवांकडून मोदीं विषयी मधुर बोल ऐकण्याची अपेक्षा नाहीच मुळी, पण थेट पंतप्रधानपदी विराजमान मोदींचा गळा कापण्यापर्यंतची अश्लाघ्य आणि गुंडगिरीची भाषा करेपर्यंत या भ्रष्टाचाराने हात बरबटलेल्यांची जीभ धजावते, यावरून त्यांच्या गेंड्याच्या कातडीच्या राजकीय कुसंस्कारांची प्रचिती यावी. सीबीआय आणि ईडीच्या कचाट्यात अडकलेल्या यादवांना मोदीद्वेषाचा ज्वर इतका चढला आहे की, थेट देशाच्या पंतप्रधानांचाच गळा कापण्याची भाषा ते ओकू लागले आहेत. त्यामुळे राबडीदेवी असो वा त्यांचे पती-पुत्र, यादवांना मोदी-शाह यांनी नितीशकुमारांना पुन्हा रालोआच्या छत्रछायेत घेऊन बिहारची सत्ता हस्तगत केल्याची जखम अजूनही भळभळती आहे, पण त्याला इलाज नाही. त्यामुळे बिहारच्या यादव कुळावर खरं तर कलंक ठरलेल्या लालू कुटुंबीयांनी मोदींचा मृत्यू चिंतू नये. उलट, आपण जेवढे दिवस बाहेर मोकळेपणाने वावरतोय, ते सुख-समाधानाने घालवावेत, कारण तुरुंगातील अंधाराकडे त्यांची कधी रवानगी होईल, याची शाश्वती नाहीच.

 

- विजय कुलकर्णी