परभणी ग्रंथोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

    दिनांक  20-Nov-2017

भविष्य निर्माण करण्यासाठी ग्रंथवाचन मोलाचे : भालेराव

 

परभणी : आपला इतिहास व भविष्य उज्वल करण्यासाठी ग्रंथवाचनाशिवाय पर्याय नाही. ग्रंथामुळे आपण अधिक प्रगल्भ होऊ शकतो यासाठी ग्रंथवाचन मोलाचे ठरते असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित भालेराव यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने २० व २१ नोव्हेंबर या कालावधीत परभणी येथील जिल्हा ग्रंथालयाच्या नवीन इमारतीच्या प्रांगणात जिल्हा ग्रंथोत्सव-२०१७ चे आयोजन करण्यात आले. यावेळी उदघाटनपर भाषणात प्रा.भालेराव बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ.राहूल पाटील आणि महापौर मिना वरपूडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रा.भालेराव यांनी त्यांच्या लोकप्रिय ‘ग्रंथ हेच गुरु’ या कवितेने भाषणास सुरुवात केली. ते पुढे म्हणाले की, ग्रंथ हेच गुरु आणि वाचाल तर वाचाल या शुभ संदेशाप्रमाणे प्रत्येकाने आपल्या जीवनात ग्रंथाच्या वाचनाची गोडी निर्माण केली पाहिजे. ग्रंथ वाचनाने माणूस घडतो याची प्रचिती इतिहासातील अनेक थोर माणसांच्यामुळे आपल्याला आली आहे. माणूस घडण्यासाठी ग्रंथ हेच मोठी भूमिका बजावू शकतात असेही ते म्हणाले. लोकचळवळीतून होणारे ग्रंथोत्सव अधिक लोकप्रिय होत असल्याचे सांगून प्रा.भालेराव यांनी शासनाच्या पुढाकाराने जिल्ह्या जिल्ह्यात होणारे ग्रंथोत्सव अधिक लोकाभिमूख व वाचनसंस्कृती वाढीस लागण्यासाठी पोषक ठरत आहेत. ग्रंथालयाच्या माध्यमातूनही वाचकांची ज्ञानाची भूक भागविली जात आहे असेही ते म्हणाले. त्यांनी यावेळी ‘बाप’ ही ग्रामीण पार्श्वभूमीचे वर्णन करणारी कविता आणि ‘एकुलती एक’ ही लोकप्रिय कविता सादर केली. रसिकांनी जोरदार टाळ्याच्या गजरात त्यांना प्रतिसाद दिला.

 

ग्रंथदिडीस प्रतिसाद

सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयापासून ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी दिंडीमध्ये जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रंथालयाचे कर्मचारी, नागरिक व मुले मुली सहभागी झाले होते. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज आणि साहित्यिक बी.रघुनाथ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. ही दिंडी ग्रंथालयाच्या नवीन इमारतीच्या ठिकाणी विसर्जित करण्यात आली. यामुळे शहरातून ग्रंथोत्सवाबाबत जनजागृती करण्यात आली. हा ग्रंथोत्सव मंगळवार २१ नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार असून ग्रंथप्रेमीनी विविध कार्यक्रमास उपस्थित राहून तसेच ग्रंथप्रदर्शनास भेट देवून लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.आमदार डॉ.राहुल पाटील यांनी ग्रंथोत्सवाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून अधिकाधिक वाचनाच्या व ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. ग्रंथाशिवाय आणि वाचनाशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. या उद्देशातून परभणी येथे सुसज्ज अशी शासकीय ग्रंथालयाची इमारत उभारण्यात आली असून या ग्रंथालयातून भविष्यात दर्जेदार असे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले. परभणी येथील शैक्षणिक सुविधा वाढविण्यावर आपला भर राहिला असून शासकीय तंत्रनिकेतन परभणीला मंजूर करण्यात आले आहे. कृषी विद्यापीठाच्या माध्यमातूनही महत्वाचे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले. स्पर्धेच्या व तंत्रज्ञानाच्य युगात ई-ग्रंथालय सुरु करण्याची प्रतिपादन करुन त्यांनी यासाठी निधी उपलब्‍ध करुन देण्याची ग्वाही दिली.


 

प्रारंभी रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलनाने ग्रंथोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. या ठिकाणी ग्रंथ विक्रेत्यांच्या ग्रंथविक्री व प्रदर्शनाच्या दालनांना मान्यवरांनी भेट देवून पाहणी केली. प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे यांनी ग्रंथोत्सव आयोजनाबद्दल भूमिका स्पष्ट केली. महापौर मिना वरपुडकर, सहाय्यक ग्रंथालय संचालक अ.मा.गाडेकर, ग्रंथमित्र डॉ.रामेश्वर पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर, ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ, ग्रंथनिवड समितीचे सदस्य सुरेश जंपनगिरे, प्रकाशक पवन गिलबिले, परभणी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष भास्कर पिंपळकर, विजय बाविस्कर आदि मान्यवर तसेच ग्रंथरसिक, साहित्यिक, ग्रंथपाल आणि शालेय विद्यार्थी-विद्यार्थिंनी उपस्थित होते.