२० - २१ नोव्हेंबरला परभणीत ग्रंथोत्सवाचे आयोजन

    दिनांक  02-Nov-2017

 

परभणी : येत्या २० व २१ नोव्हेंबर रोजी परभणी येथील जिल्हा ग्रंथालयामार्फत नवीन इमारतीच्या प्रांगणात ग्रंथोत्सव - २०१७ चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी समिती गठीत करण्यात आली असून समितीची बैठक जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. ग्रंथालयाच्या नवीन ईमारतीच्या प्रांगणात हा ग्रंथोत्सव होणार आहे. याच ठिकाणी ग्रंथविक्रीची दालने उभारण्यात येणार आहेत. विविध प्रकाशन संस्था, पुस्तक विक्रेते प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.


२० नोव्हेंबर रोजी सकाळी ग्रंथोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी जिल्हा ग्रंथालयापासून सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येईल. दुपारी २ वाजता 'प्रभावी वाचन माध्यमे' या विषयावर साहित्यिक, लेखक, पत्रकार, विद्यार्थी, शिक्षक, नागरीक व अधिकारी यांच्यामध्ये परिसंवाद व चर्चासत्र होईल. तर दुपारी ४ वाजता कथाकथनाचा कार्यक्रम होणार आहे असे ग्रंथालयामार्फत कळवण्यात आले आहे.


तर २१ नोव्हेंबर रोजी 'ग्रंथाने मला काय दिले?' या विषयावर परिसंवाद सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. दुपारी अडिच वाजता काव्य वाचन आणि दुपारी साडेचार समारोप कार्यक्रम आणि सहभाग प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. या ग्रंथोत्सवाला साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी केले आहे.


या बैठकीस समन्वय समिती सदस्य माध्यमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब कुंडगीर, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष भास्करराव पिंपळकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य आसाराम लोमटे, प्रकाशक संघटनेचे सदस्य केशवराव वसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.