मतं नाही, मुंबईचा विचार करा

    दिनांक  02-Nov-2017   


 

एलफिन्सटन रोड रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्देवी चेंगराचेंगरीनंतर फेरीवाल्यांविरुद्ध उसळलेला ‘राज’कीय संघर्ष अजूनही काही शमण्याची चिन्हं नाहीत. कारण, बुधवारी दादरमध्ये कॉंग्रेसचे आणि मनसेचे कार्यकर्ते पुनश्च रस्त्यावर भिडले. त्यापूर्वीही मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपमयांनी चक्क फेरीवाल्यांसाठी ‘सन्मान यात्रे’च्या नावाखाली चिथावणीखोर भाषा करत या संघर्षाला प्रादेशिक रंग दिला. ‘मराठी माणूस विरुद्ध उत्तर भारतीय’ या काहीशा सुप्तवादाची परिणिती मग तोडफोड आणि मारझोडीत झाली. त्यामुळे या प्रश्नाकडे राजकीय पक्षांचा बघण्याचा आणि त्याचे भांडवल करण्याचा दृष्टिकोन म्हणावा तसा अगदी स्वच्छ. मनसेचा मराठी माणूस आणि अस्मितेचा मुद्दा, तर मुंबईतील उत्तर भारतीयांच्या मतासाठी कॉंग्रेसला फेरीवाल्यांचा कळवळा. पालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि एरवी ‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही’चा निवडणुका आल्या की, कानीकपाळी नुसता गजर करणारे मात्र यावर अगदी सावध भूमिका घेऊन बर्फासारखे थंड. मग या सगळ्या राजकीय कृती आणि राजकीय निष्क्रियतेचा सामान्य मुंबईकरांनी नेमका काय अर्थ लावायचा? हफ्तेखोरीमध्ये पालिका प्रशासनाबरोबरच मग सत्ताधा-यांचे साटंलोटं असल्याच्या आरोपात तथ्य आहे, हेच मानायचे का?

त्यामुळे सद्यपरिस्थितीत भाजपखेरीज कुठलाही पक्ष या गंभीर विषयाकडे कृतिशीलतेच्या नजरेतून पाहतोय असे वाटत नाही. कारण, सत्ताधारी भाजप सरकारने फेरीवाल्यांच्या धोरणाचीअंमलबजावणी करण्याचे आदेश पालिका व पोलीस प्रशासनाला तर दिले आहेतच, पण शिवाय एलफिन्सटनचा नवीन पूल ३१ जानेवारी २०१८ पर्यंत लष्कराच्या मदतीने पूर्ण करण्याचानिश्चयही केला आहे. त्यामुळे जेव्हा इतर सर्वच राजकीय पक्ष आरोप-प्रत्यारोप आणि राडेबाजीमध्ये व्यग्र असताना, भाजपने मात्र मुंबईकरांच्या हितासाठी थेट कृती करत मुंबईच्या सर्वांगीणविकासाचा शब्द पाळला आहे. कारण, हल्ली नुसती तोंडाची वाफ दवडत, नकला करत भाषणबाजी करुन मतांच्या तुंबड्याही भरता येत नाही. जनतेला काही तरी ठोस काम आपल्या प्रत्यक्षकृतीतून दाखवावेच लागते, त्याशिवाय जनता साळसुदपणे कुणावरही आंधळा विश्वास ठेवून मतदान करत नाही. त्यामुळे अस्मिता आणि आपुलकीने विचार करणाया मतदात्या मुंबईकरांचाआता कडेलोट झाला आहे. तेव्हा, राजकीय पक्षांनी मतं सोडून आता फक्त मुंबईचाच विचार केला, तरच मतदार तुमचा विचार करतील, ही खुणगाठ पक्की बांधावी!

 

 कुपोषणाच्या देशा...

कुपोषण म्हणताच डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते, भूकेने व्याकूळ बालकांचे... त्यांच्या अंगांची झालेली काडी आणि पोटाचा प्रकर्षाने फुलून बाहेर पडलेला नगारा... आईच्या खांद्यावर अगदी निपचित, निरागस पडलेल्या त्या बालकांच्या चेह-यावर झळकतो तो केवळ एक लाचार...उदासीचा निर्विकार भाव... मुंबईसारख्या शहरांमध्ये जरी कुपोषणाची समस्या नसली तरी साधारण सिग्नलवर भीक मागणा-या किंवा रस्त्यावरच बस्तान मांडलेल्या कुटुंबांच्या किडुकमिडुक संसारात डोकावले तरी अंगावर काटा आणणारे हे विदारक दृश्य मन हेलावून टाकते अन् मनात विचार येतो की, दुर्गम, दूरस्थ अशा मेळघाटातील परिस्थिती यापेक्षा किती पटीने भयंकर आणि आपल्या कल्पनेपलीकडची असेल...

त्यामुळे एकीकडे अति अन्नसेवन करुन मधुमेह, हृदयरोगाला आमंत्रण देणारे शहरवासीय अन् दुसरीकडे साधा एक घासही नशिबात नसणारी मृत्यूच्याच जणू घटका मोजणारी कुपोषित बालकं... भारतातील कुपोषणाची आकडेवारी सांगणारा एक जागतिक अहवाल नुकताच उजेडात आला आहे. त्या अहवालानुसार, एकीकडे भारतात कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक असून लठ्ठपणाच्या बाबतीतही अमेरिका आणि चीननंतर आपला तिसरा क्रमांक लागतो. म्हणजे, एकीकडे गिळायला अन्नाचा साधा कण नाही, तर दुसरीकडे काय खाऊ आणि किती खाऊ, अशा सधन जीवनशैलीत सगळं ओरबाडून गिळणारा समाजातील एक वर्ग... दोन्हीही आपल्याच भारतात. दोघंही याच देशाचे कायदेशीर नागरिक, पण त्यांच्या स्तराची तुलनाच करवत नाही...

‘असोचेम’ आणि ‘ईव्हाय’च्या संयुक्त अभ्यास अहवालानुसार, ‘‘२००५ ते २०१५ या दशकभराच्या काळात बालक मृत्यूदर भारतात कमी झाला असला तरी जगभरातली ५० टक्के कुपोषितबालकांची संख्या मात्र एकट्या भारतात सापडते.” भारतात अशा कुपोषित बालकांचे प्रमाण तब्बल ४० टक्के असल्याचेही अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे, तर दुसरीकडे, जागतिकआरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २०१५ पर्यंत देशातील ६९.२ टक्के नागरिकांना मधुमेहाने ग्रासले आहे. या अहवालामध्ये केंद्र व राज्य सरकारने गरीब आणि वनवासी बांधवांसाठीशासनाच्या योजना पोहोचण्यासाठी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पोषण आहारअधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचविणे, मातांना स्तनपान आणि मुलांच्या आहाराबद्दल जागृत केल्यास निश्चितच कुपोषणाच्या या भीषण समस्येला आळा बसू शकेल.

 

-विजय कुलकर्णी