कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर...

    दिनांक  17-Nov-2017   
 

 
 
नारायण राणेंचं विधान परिषदेवर निवडून येणं या सगळ्या परिस्थितीतही शक्य आहे, पण ते भाजपने मनावर घेतलं तरच! भाजपला प्रतीक्षा आहे ती 'योग्य वेळे'ची. एव्हाना भाजपच्या धक्कातंत्राशी सर्वांचाच चांगलाच परिचय झालेला असल्याने कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं हे सगळेच जाणून आहेत. पण या 'योग्य वेळे'ची प्रतीक्षा करत करत वेळच टळून जाईल की काय, याची चिंता आता राणेंना लागली आहे..
 
 
नारायण राणे यांनी ’महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नावाने नवा पक्ष स्थापन करून आता जवळपास दोन महिने झाले. ज्या वेगाने, आक्रमकपणे राणे शिवसेनेत एकेक पायर्‍या चढत थेट मुख्यमंत्रिपदावर पोहोचले, त्याच वेगाने मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. ज्या वेगाने, आक्रमकपणे कॉंग्रेसमध्ये दाखल होऊन महसूल, उद्योगादी खात्यांचे ते मंत्री झाले, त्याच वेगाने कॉंग्रेसमधूनही बाहेर पडले. राणेंना साजेशा वेगातच त्यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ नावाचा पक्ष स्थापनही केला. सत्तेच्या अनिवार ओढीतूनच निर्माण झालेला राणेंचा अनिर्बंध वेग आणि आक्रमकपणा आता कालमानापरत्वे मंदावला असला तरी सत्तेची ओढ मात्र कायमआहे. त्यामुळेच महाराष्ट्राचा हा तथाकथित ‘स्वाभिमान’ अखेर भाजपप्रणीत रालोआमध्ये जाऊन विसावला आहे. प्रतीक्षा आहे ती मंत्रिपदाची. राजकारणाच्या मैदानात एव्हाना इतरांच्या फार पुढे निघून गेलेल्या भाजपने गेल्या २५-३० वर्षांतील एक मुरब्बी खेळाडू म्हणून नावाजलेल्या राणेंना बहुधा चांगलंच तावूनसुलाखून काढण्याचं मनोमन ठरवलं आहे. त्यामुळेच मंत्रिपदाचं चांदणं काही केल्या राणेंपर्यंत पोहोचताना दिसत नाही. याच तावूनसुलाखून पाहण्याचा पुढचा अंक पाहायला मिळणार आहे तो राणेंनी राजीनामा दिलेल्या विधान परिषद सदस्यत्वाच्या पोटनिवडणुकीत.
 
 
राज्य विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी ही निवडणूक होत आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुकाही याच दरम्यान होतील. राज्यातील काही नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकाही याच काळात व्हायच्या आहेत. या सगळ्या परिस्थितीत राज्यातील चार प्रमुख पक्षांमध्ये कोण किती पाण्यामध्ये आहे, हे सिद्ध होण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनासारखं उत्तम ठिकाण दुसरं सापडायचं नाही. त्यामुळेच गेली दोन वर्षं विरोधी बाकांवर बसलेले राणे आता या अधिवेशनात सत्ताधारी बाकावर (त्यातही पुन्हा पहिल्या रांगेत?) बसलेले दिसू नयेत यासाठी राणेंचे आधीचे दोन पक्ष- शिवसेना आणि कॉंग्रेसने जोरदार प्रयत्न करणं स्वाभाविकच. त्यामुळे या विधान परिषदेच्या या पोटनिवडणुकीला भलतीच प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. राणेंचं परिषदेवर पुन्हा निवडून येणं सर्वस्वी भाजपवर अवलंबून आहे. मात्र, याच भाजपने अद्याप या निवडणुकीबाबत कोणतेच स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. अगदी भाजप आपला उमेदवार उतरवणार नाही, इतकेही नाहीत. या सगळ्या गोष्टी ठरणार आहेत, त्या राणेंनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतरच. यामुळे स्वतः राणेंसकट सर्वांचीच धाकधूक आणि गोंधळ वाढला आहे. कारण राणे निवडून येऊ नयेत यासाठी इच्छुक असलेला क्रमांक एकचा पक्ष म्हणजे अर्थातच शिवसेना आणि दुसरा म्हणजे कॉंग्रेस. त्यात पुन्हा या निवडणुकीद्वारे शिवसेनेला भाजपला पाण्यात पाहण्यासाठी आयतंच निमित्त मिळालं असल्याने सेनेला या प्रकरणात अधिकच जोश आला आहे. यातूनच राणेंच्या पराभवासाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी असे तिघेही पक्ष एकत्र येणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असून दुसरीकडे भाजप नेतृत्व शांतपणे या सगळ्यावर ‘वॉच’ ठेऊन आहे. मात्र, मुळात एकट्या राणेंच्या विरोधासाठी म्हणून शिवसेना कॉंग्रेससोबत जाण्याचा धोका पत्करणार का, हा प्रश्न आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादीची भूमिका नेहमीप्रमाणे अधांतरी आहे आणि ती ‘मोठ्या साहेबां’च्या आदेशानंतरच स्पष्ट होईल, हे नक्की. मात्र, या सगळ्या विचित्र परिस्थितीमुळे आता खुद्द राणेच ही निवडणूक लढवावी की नाही, याबाबत साशंक झाले असल्याची चर्चा आहे.
 
 
मुळात या निवडणुकीसाठी मतदान करणार्‍या विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहिल्यास कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊनही भाजपच्या पाठिंब्यावर राणेंचं निवडून येणं शक्य असल्याचं लक्षात येतं. विधानसभेच्या एकूण २८८ पैकी भाजपची १२२, बहुजन विकास आघाडीचे ३, रासपचे १ आणि ७ अपक्ष अशी भाजपची हक्काची १३३ मतं होतात. या विषयात काहीच देणंघेणं नसलेले एमआयएमचे २, मनसेचे १ आणि समाजवादीचे १ वगैरेंनी पाठिंबा दिल्यास ही मतं १३७ होतात आणि न दिल्यासही आयत्या वेळी तटस्थ राहून ते आपली उपयुक्तता निभावू शकतात. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूने मतदान करण्याची शक्यता असलेल्या शेकापचे ३, भारिप बहुजन महासंघाचे १ आणि कम्युनिस्टांचे १ अशी ५ मतंही थोडीफार याच वर्गात मोडतात. यामुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडे हक्काची उरली ८३ मतं. त्यात शिवसेनेची धरली तरी एकूण होतात १४६. अगदीच काठोकाठ भरणार्‍या बहुमतापर्यंत जाणार्‍या या संख्याबळात राष्ट्रवादी हा सगळ्यात बेभरवशी घटक आहे. पुन्हा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फुटू शकणारे १०-१२ सदस्य आहेत हे तर यापूर्वीच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सिद्ध झालेलं आहे. त्यात पुन्हा अद्याप कॉंग्रेसमध्येच असलेले आमदार नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर ही राणेंची हक्काची मतं. त्यामुळे राणेंचं निवडून येणं या सगळ्या परिस्थितीतही शक्य आहे, पण ते भाजपने मनावर घेतलं तरच! भाजपला प्रतीक्षा आहे ती ‘योग्य वेळे’ची. एव्हाना भाजपच्या धक्कातंत्राशी सर्वांचाच चांगलाच परिचय झालेला असल्याने कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं हे सगळेच जाणून आहेत. पण या ‘योग्य वेळे’ची प्रतीक्षा करत करत वेळच टळून जाईल की काय, याची चिंता आता राणेंना असल्याची सूचक टिप्पणी भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने केली. कारण आमदारकी लांबली की मंत्रिपदही लांबलं. एकतर ‘दिवाळी आधी’, मग ‘दिवाळी नंतर’, ‘नागपूर अधिवेशनापूर्वी’ मग ‘नागपूर अधिवेशनानंतर’ अशा ‘तारीख पे तारीख’मुळे राणेंची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. मात्र, यामुळे राणेंनी निवडणूकच न लढवल्यास त्यांच्या नव्या पक्षाचं भवितव्यच पणाला लागू शकतं.
 
 
स्थापना होऊन दोन महिने झाले तरी कॉंग्रेस काय, शिवसेना काय, कोणत्याच पक्षातून एकही आमदार वा बडा नेता राणेंच्या पक्षात आलेला नाही. अगदी स्वतःचा मुलगादेखील. गेल्या तीन वर्षांत निवडणुकांत इतकी मोठी पडझड होऊनही संघटनात्मक पातळीवर कॉंग्रेस पक्ष बराच उत्तमप्रकारे तग धरून आहे. कॉंग्रेसचा जेमतेमकाही टक्के का होईना, पारंपरिक वगैरे मतदार अद्याप शाबूत आहे. मात्र, पक्षाचं वरिष्ठ नेतृत्व पुरतं विस्कळीत झालेलं आहे. गटबाजी, जिल्ह्याजिल्ह्यातील वर्चस्वाच्या कुरघोड्या यामुळे पक्ष बेजार झाला आहे. सद्यस्थितीत काहीतरी आशा बाळगावी असे दोनच नेते कॉंग्रेसमध्ये होते. एक म्हणजे अशोक चव्हाण आणि दुसरे स्वतः नारायण राणे. यातील राणेंना कॉंग्रेस पक्षाबाहेर काढून भाजपने राजकीय डावपेचांत मोठी बाजी मारली. राणे बाहेर आले खरे, पण म्हणून लगेच सत्तेच्या सोपानापर्यंत चढण्यासाठीची रसद भाजप त्यांना देईल याची दोन महिन्यानंतरही शाश्वती देता येत नाही. नजीकचा काळ पाहता भाजप किंवा रालोआ हेच आता राणेंचे ‘फायनल डेस्टिनेशन’ असणार हे स्पष्टच आहे. ’गोरा कुंभार’ नाटकातील ’कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ या पदाच्या ओळी या अवस्थेचे चपखल वर्णन करणार्‍या आहेत. जन्म-मरणही नको आहे, येरझारही नको आहे. ऐहिकांचा व्यर्थ बडिवार तर कॉंग्रेसमध्ये जवळपास एक तप जवळून पाहिलेला आहे. त्यामुळे सत्तेच्या चांदण्याला भुकेलेला हा चकोर ’मन करा थोर’ म्हणत पांडुरंगाला मनोमन विनवतो आहे. आता ‘मलबार हिल’वर राहणारा विठ्ठल मन थोर करून या चकोराला सत्तेच्या चांदण्यात न्हावू घालतो का? हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे... 
 
 
- निमेश वहाळकर