सोलापूर विद्यापीठ नामांतर : लिंगायत समाजाकडून 'सोलापूर बंद'ची हाक

    दिनांक  13-Nov-2017

बंदाला काही ठिकाणी हिंसक वळण, जिल्ह्याजिल्ह्यात बंद करण्याचे आवाहन

धनगर समाजाकडून जल्लोष मागे

 

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरावरून पुन्हा एकदा वाद सुरु झाला आहे. सोलापूर विद्यापीठाला शिवयोगी सिद्धरामेश्वर (महात्मा बसवेश्वर) यांचे नाव न दिल्याच्या निषेधार्थ लिंगायत समाजाकडून आज 'सोलापूर बंद'ची हाक देण्यात आली आहे. तसेच सोलापूर रेल्वे स्थानकाजवळ काही तरुणांनी रिक्षाला आग लावल्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


सोलापूरमधील शिवा संघटना, सिद्धेश्वर भक्त आणि वीरशैव समाजातील इतर संघटनांकडून आज सोलापूर बंदची हक्क देण्यात आली आहे. या बंदला शहरातील विविध संस्था, व्यापारी संघटना, शैक्षणिक संघटनांनी आपला पाठींबा दर्शवला आहे. त्यामुळे शहरातील लिंगायत समाजातील दुकाने, वाहने, शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. बंदाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तणाव निर्माण झाल्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परंतु काही हुल्लड तरुणांनी सोलापूर रेल्वे स्थानकासमोर उभ्या असलेल्या रिक्षाला आग लावल्यामुळे पोलिसांनी काही तरुणांना अटक केली असून शहरात निषेध मोर्चे काढण्यास बंदी घातली आहे. तसेच अतिरिक्त पोलीस देखील शहरात तैनात करण्याचा आदेश दिला आहे.

 

शिवा संघटनेचे अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे सर यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध करत सरकारने लिंगायत समाजाची फसवणूक करून हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. गेल्या १५ वर्षांपासून या विद्यापीठाला महात्मा बसवेश्वर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली जात होती. परंतु सरकारने महाराष्ट्रातील ८५ लाख वीरशैव समाजाची फसवणूक करत, विद्यापीठाला होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सरकारला त्यांचा निर्णय बदलण्यास आम्ही भाग पाडू, असे प्रतिपादन धोंडे यांनी केले आहे. तसेच हा बंद प्रथम सोलापूर शहर, नंतर जिल्ह्यातील सर्व तालुके आणि त्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये देखील पाळला जाईल, असेही ते म्हणाले. 

 

 

दरम्यान या बंदाच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाने आज जिल्ह्यात आयोजित केलेला आपला आनंदोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर विद्यापीठाला 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर' यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर धनगर समाजाने या निर्णयासाठी आज संपूर्ण जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु लिंगायत समाजाने 'सोलापूर बंद'चा निर्णय घेतल्यानंतर धनगर समाजाने आनंदोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.


सोलापूर विद्यापीठाला महात्मा बसवेश्वर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून लिंगायत समाजाकडून केली जात होती. त्याच बरोबर या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची मागणी धनगर समाजाने लावून धरली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठला 'होळकर' यांचे नाव देण्यात येणार असलायची घोषणा नागपूर येथील धनगर मेळाव्यात केली होती. यावर लिंगायत समाजाने आपली नाराजी व्यक्त करत, सरकारविरोधात निषेध व्यक्त केला होता.