लोकसेवा हमी विधेयकाची प्रभावी अंमलबजावणी करावी : नीलम गोऱ्हे

    दिनांक  13-Nov-2017


औरंगाबाद : माहिती अधिकाराच्या अर्जावर ज्या पद्धतीने त्वरित माहिती दिली जाते, त्याच धर्तीवर शासन यंत्रणेकडून आमदार - खासदारांच्या पत्रांचीही तातडीने दखल घेण्यात यावी. या पत्रांची लागलीच पोच घेऊन त्यांना त्वरित माहिती उपलब्ध करुन देण्यात यावी जेणेकरून जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम लोकाभिमुखपणे करून लोकसेवा हमी विधेयकाची प्रभावी अंमलबजावणी होईल याकडे लक्ष देण्यात यावे, असे निर्देश आमदार तथा विधानपरिषद विशेषाधिकार समिती प्रमुख डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे दिले.


 

गोऱ्हे यांनी आज विधानपरिषद सदस्य रामराव वडकुते, डॉ. सुधीर तांबे आणि खा. चंद्रकांत खैरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अनौपचारीक चर्चा केली त्यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हे निर्देश दिले. डॉ. गोऱ्हे यावेळी म्हणाल्या की, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी हे दोन्ही घटक जनसामान्यांसाठी विकासकामे करत असतात त्यामुळे यांच्यात सातत्यपूर्ण सकारात्मक संवाद असणे महत्वाचे आहे. हे लक्षात घेऊन सर्व अधिकाऱ्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देताना लोकप्रतिनिधींद्वारे करण्यात येणाऱ्या सूचनांनूसार तप्तरतेने काम करावे. तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची मासिक बैठक घेऊन तक्रारींबाबत, करण्यात येत असलेल्या कामांबाबत वेळोवेळी लोकप्रतिनिधींना माहिती द्यावी, असे निर्देश देऊन त्या पुढे म्हणाल्या, जिल्हा नियोजन अधिकारी यांनी अमदार खासदार निधीतून गेल्या वर्षभरात केलेल्या कामाची माहिती, निधीचा विनीयोग यासंदर्भाचा अहवाल महिन्याभरात समितीकडे पाठवावा. सर्व शासकीय कार्यालयातील प्रामुख्याने सार्वजनिक बांधाकाम विभाग, म्हाडा, कृषी, सहकार, आरोग्य, महिला बालविकास, सामाजिक न्याय विभाग या व इतर सातत्याने लोकांशी निगडीत विभागांच्या कार्यालयातील दुरध्वनी सेवा ही विनाखंडीत सुव्यवस्थित सुरू असणे हे कटाक्षाने पहावे. जिल्हाधिकारी यांनी या बाबींची वेळोवेळी तपासणी करावी. कार्यालय प्रमूखांनी आपल्या दैनंदिन कामातून लोकप्रतीनिधी तसेच नागरिकांच्या भेटीसाठी योग्य तो वेळ उपलब्ध ठेवावा. कार्यालयातील दुरध्वनीवर शिष्टाचार पूर्णरित्या संवाद साधावा असे गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

 

या अनौपचारीक चर्चेला विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, विशेष पोलिस महानिरीक्षक मिलींद भारंबे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड, पोलीस उपायुक्त दिपाली घाडगे यांच्यासह संबंधित इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.