शेगांवात दोन घोड्यांमध्ये आढळले ग्लॅंडर्संचे जिवाणू

    दिनांक  05-Oct-2017बुलडाणा : जिल्ह्यात शेगाव येथील दोन घोड्यांच्या रक्तजल नमुन्यांमध्ये ग्लॅंडर रोगासाठी पॉझीटीव्ह असणारे जिवाणू आढळून आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ग्लॅंडर्सं प्रसार होऊन मानवी आरोग्याला नुकसान पोहचू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे. आपले अश्ववर्गीय प्राण्यांची नागरिकांनी योग्य निगा राखून त्यांचे आरोग्य सांभाळावे, असे आवाहनही प्रशासनाकडून केले जात आहे.


हरियाणामधील हिस्सार येथे असलेल्या नॅशनल ईक्वॉइन रिसर्च सेंटर, (राष्ट्रीय अश्व संशोधन संस्था) यांच्याकडे पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यातील घोड्यांचे २६ नमुने पाठविण्यात आले होते. त्यापेकी दोन नमुने पॉझीटीव्ह आढळले आहेत. ग्लॅंडर हा रोग अश्ववर्गीय प्राण्यांमध्ये असतो. या रोगाचा प्रादुर्भाव घोड्यांमधून मनुष्यामध्ये होतो. हा रोग २००९ च्या प्रीव्हेंशन अँण्ड कन्ट्रोल ऑफ इन्फेक्शन अँण्ड कॉन्टॅजीयस डिसीजेस इन ॲनीमल या कायद्यातंर्गत अधिसूचीत देखील करण्यात आलेला आहे. हा रोग मानवासाठी प्राणघातक असल्यामुळे याची गंभीरता लक्षात घेऊन रोग पसरणार नाही, यासाठी सदर कायद्याच्या कलम ७ नुसार जिल्ह्यातील अश्ववर्गीय जनावरांची वाहतुक करण्यास प्रतिबंध देखील करण्यात आले आहे.


जिल्ह्यात अश्ववर्गीय जनावरांची वाहतूक करणे व जिल्ह्याबाहेरील अश्ववर्गीय प्राणी जसे घोडा, खेचरे व गाढव प्राणी जिल्ह्यात येणार नाहीत, याबाबत मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या फौजदारी प्रक्रिया संहीता १९७३ च्या कलम १४४ अन्वये जिल्ह्यात संपूर्णपणे अश्ववर्गीय जनावरांच्या होणाऱ्या वाहतूकीस जिल्हाधिकारी यांनी निर्बंध घातले आहे.