उत्तर भारतीयांचे उपनगरीय बस्तान

    दिनांक  31-Oct-2017   

 
 
 
सध्या ‘मनसे विरुद्ध फेरीवाला’ संघर्षामुळे पुन्हा एकदा मुंबईतील उत्तर भारतीयांचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यातही मुंबईकरांच्या सुरक्षेच्या नावाखाली मनसे जुनाच ‘परप्रांतीय हटाव’ अजेंडा राबवत असल्याचीही चौफेर टीका झाली. मुंबईतील उत्तर भारतीयांचा कैवार वाहणारे कॉंग्रेसचे संजय निरुपमही मग फेरीवाल्यांच्या हक्कासाठी आणि आपल्या बांधवांसाठी रस्त्यावर उतरले. फेरीवाल्यांना निरुपमांच्या पाठबळाचा इतका चेव आला की, मालाडमध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदेंवरच त्यांनी हल्ला चढविला. ‘इट का जवाब पत्थर सें’ या उक्तीनुसार फेरीवाल्यांनीही मग अरेरावीच्या भाषेत राडा घातलाच. खरं तर अशाप्रकारे दादर स्थानकही मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवालामुक्त केले होते. पण तेव्हा मनसैनिकांवर असे जीवघेणे हल्ले झाले नाहीत. कारण, केवळ दादर हा मनसेचा बालेकिल्ला आहे म्हणून नव्हे, तर दादरमधील बहुंताशी फेरीवालेही मराठी भाषिक असल्यामुळे त्यांनी आपले बस्तान गुंडाळणेच अधिक पसंत केले. पण उत्तर मुंबईत अशी परिस्थिती मात्र अजिबात नाही. मालाड, गोरेगाव, जोगेश्र्वरी आणि इतरत्रही चाळींमध्ये, झोपड्यांमध्ये बेदरकारपणे बकाल वस्त्या दिवसेंदिवस वाढत गेल्या. मुंबईमध्ये कुणी उपाशीपोटी झोपत नाही म्हणून या मायानगरीत परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे आदळत गेले. किती आले, किती गेले याचा साधा हिशेबही नाही. मालाड पश्चिम स्थानकाबाहेर सकाळी ९-१० च्या सुमारास एक साधा फेरफटका मारला तरी या उत्तर भारतीय कंत्राटी कामगारांची संख्या सहज डोळ्यात भरते. मार्वे किनार्‍यावर नुकतेच छटपूजेसाठी जमलेल्या उत्तर भारतीय समाजाची गर्दीही तशी बोलकीच! तेव्हा, तुटपुंजी मजुरी, त्यातून शहरी आयुष्याचं आकर्षण, व्यसनाधीनता आणि इतर आर्थिक गरजा भागविण्यासाठी मग हीच हातावर पोट वाहणारी पावलं गुन्हेगारीकडे आपसुक वळतात. अर्थात, शहराची लोकसंख्या ओसंडून वाहत राहते, झोपडीमाफियांच्या आशीर्वादाने वस्त्यांच्या इमलेचे इमले उभे राहतात अन् हफ्ताखोरीत फेरीवाल्यांनाही मिळालेले अभय मुंबईला मग कधी तरी एलफिन्सटन रोड दुर्घटनेसारखा अर्धांगवायूचा एकच जोरदार झटका देऊन जाते. त्यानंतर मग मनसेसारखे प्रादेशिक राजकीय पक्ष मुंबईकरांच्याच ‘कीडा-मुंगीसारखे जगणार का’ याचे भांडवल करुन मराठी माणसाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतात आणि खळ्ळ खट्याक्‌ची ठिणगी रस्तेही पेटवूनही देते.
 
 
मुंबईचा वाली कोण?
 
मुंबईच नाही, तर महाराष्ट्रातील इतरही महानगरे अशीच अंदाधुंद पसरत चालली आहेत. कोणाचा कशाचा पत्ता नाही. कारण, साहजिकच पडद्याआड पालिका आणि स्थानिक प्रशासनाचे भ्रष्टाचाराने बरबटलेले साटंलोटं. यामुळे अख्खी शहरंच्या शहरं परप्रांतीयांच्या विळख्यात पुरती जखडली गेली आहेत. मग त्यातून निर्माण होणारा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण, ट्राफिकची समस्या, कचर्‍याचे वाढते प्रमाण, शौचालयांची कमतरता, अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य. मालाडच्या मालवणीसारख्या भागात गेल्यावर तर आपण नक्की मुंबईतच आहोत ना, असा प्रश्न पडावा इतपत गंभीर परिस्थिती. दुर्गंधी आणि कचर्‍याच्या ढिगार्‍याने वेढलेल्या कोंदट गलिच्छ वस्त्या... उघडीनागडी उनाड फिरणारी पोरं... उघड्यावरच जागोजागी तयार झालेले मानवी विष्ठेचे थर आणि पुढे अजून कीळस येईल, कल्पनाही करवणार नाही अशी वस्तीची दुरवस्था. आधी फक्त धारावीच्या एका कोपर्‍यात लपलेला हा बकालपणा आता मुंबईच्या चौकाचौकांत फुटपाथवर सगळीकडे यथेच्छ लोळताना दिसतो. मळलेला...काळपट्ट...निराधार अन् दिशाहीन... मुंबईचे देखणे रुपडेही आता अशीच अजागळ ओळख परिधान करु पाहतेय. पण मराठी असो वा बिगर मराठी, त्यावर ठोस उपाययोजना करायला राजकीय पक्ष वा पालिका नाममात्र सरसवतात. कारण, शेवटी सगळा मतांचा मामला! म्हणून, चिरीमिरी देऊन कारवाया करायच्याच नाहीत किंवा मुद्दामतात्कळत ठेवायच्या. टेबलाखालच्या याच व्यवहारांनी आज मुंबईची अवस्था अतिशय दयनीय आणि बिकट करुन ठेवली आहे. पण पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांनाही यामध्ये फारसा रस नाहीच. वर्षानुवर्षे त्याच समस्या, तिचं आश्वासनं अन् निवडणुकांनंतर मतदारांच्या तोंडाला पानं पुसणारे नेते आणि भ्रष्टाचाराचे मोकळे रान.... मूळ मुंबईकर सोडला तर सगळ्यांचा फायदाच फायदा. मग तुमचा-आमच्या या मुंबापुरीचा वाली कोण? कुठला राजकीय पक्ष? कुणाला आहे या मुंबईसाठी वेळ? कुणाला आहे तुमचा इतका कळवळा? त्यामुळे केवळ फुकटचे रेशन साहित्य वाटप, रुग्णवाहिकेची त्वरित सोय, रक्तादान शिबीर ही सामान्य मदत आता पुरे झाली. आता खरी मदत हवीय आपल्या मुंबापुरीला. कारण, तिचा श्वास गुदमरतोय, दररोज ती तीळ तीळ मरतेय... तिच्या भरवसे जगणारा मुंबईकर पोटाची खळगी भरतोय खरा, पण मुंबईचं पोटंच पोखरलं जातंय. तेव्हा, मुंबईकरांनो, वेळीच मुंबईला सावरुया... कारण, आपल्याला जगवणार्‍या या मुंबानगरीचे आता आपणच वाली... 
 
- विजय कुलकर्णी