भुकेमुळे राज्यात एकही माणूस मरणार नाही - गिरीश बापट

    दिनांक  27-Oct-2017शेगांव येथे राज्यस्तरीय स्वस्त धान्य दुकानदार मेळावा व कार्यशाळा

बुलडाणा : 'रेशन दुकानदार हा संपूर्ण राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे स्वस्त धान्य वितरण दुकानदारांच्या समस्या सोडविण्याचे काम राज्य शासन करीत आहे. या दुकानादारांना अधिक सक्षम करून राज्यातील प्रत्येक व्यक्तीला अन्न उपलब्ध करून देणे हा आमचा उद्देश आहे. त्यामुळे भविष्यात राज्यातील एकही माणूस भुकेमुळे मरणार नाही' असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी केले.


शेगांव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात अन्न व नागरी पुरवठा विभाग, बुलडाणा जिल्हा प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ते बोलत होते.


राज्यात दीड कोटी धान्य वितरणाचे व्यवहार ई पॉस मशीनद्वारे करण्याचे उद्दिष्ट सरकार समोर आहे. सद्यस्थितीत हे काम १ कोटीपर्यंत पेाहोचले आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल. संपूर्ण रेशनिंग व्यवस्थेचे संगणकीकरण करून ई पॉस मशीनच्या माध्यमातून संपूर्ण धान्य वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या व्यवस्थतेतील काळाबाजार संपूर्णपणे थांबून भ्रष्टाचार संपविण्यात यश येईल, असे ते म्हणाले.
याच बरोबर दुकानदारांचे कमीशन थेट ८० रूपयांनी वाढवून १५० रूपये करण्यात आले आहे. याचा लाभ रेशनिंग

व्यवस्थेचा कणा असलेल्या दुकानदारांना निश्चितच होत आहे. शासनाने स्वस्त धान्य दुकानदाराला वारसा हक्काने दुकान चालविण्याचा अधिकार दिला. तो आधी नव्हता. मृत दुकानदाराचा मुलगा आता दुकान चालवू शकणार आहे. भविष्यात रेशनिंगच्या पॉस मशिनच्या माध्यमातून गॅस सिलेंडर रेशन दुकानावर विक्री करण्याचे नियोजन आहे, असे त्यांनी सांगितले.


रेशनिंग व्यवस्था म्हणजे गरीबांच्या पोटात अन्न टाकण्याची व्यवस्था आहे. या व्यवस्थेत प्रामाणिक काम करणाऱ्यांच्या पाठीशी शासन आहे. प्रतिबंधीत गुटखा विक्रेत्यांवर करण्यात येणाऱ्या शिक्षेच्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात येणार असून तशी संमती केंद्र शासनाने दिली आहे. त्यानुसार लवकरच या कायद्यात सुधारणा करण्यात येवून ६ महिन्याची शिक्षा तीन वर्षापर्यंत करण्यात येणार आहे.