मेहकर व लोणार तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये भूजल अधिनियम लागू

    दिनांक  26-Oct-2017बुलडाणा : अपुऱ्या पावसामुळे यंदा जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ही पाणी टंचाई भविष्यात आणखीन वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने मेहकर आणि लोणार तालुक्यातील गावांमध्ये भूजल अधिनियम लागू केला आहे. त्यामुळे पिण्याच्या स्त्रोतापासून ५०० मी.च्या अंतरापर्यंत कोणालाही कसल्याही प्रकारचे खोदकाम करता येणार, असे केल्यास त्यावर कायदेशीरपणे कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.


मेहकर तालुक्यातील १७ व लोणार तालुक्यातील ६ गावांमध्ये ३० जूननंतर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच दिवसेंदिवस ती वाढतच चालली आहे. जलस्त्रोतांमध्ये अपुरा पाणीसाठा असल्यामुळे भविष्यात ही पाणीटंचाई आणखीन भीषण होऊ शकतो. यावर उपाय करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या अगोदरच पाण्याच्या अवैध्या उपसा करण्यावर बंदी घातली आहे. परंतु भूजल स्त्रोतांजवळ होत असलेल्या खोदकामांना रोखण्यासाठी महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ लागू करण्याचा निर्णय प्रशासनांकडून घेण्यात आला आहे. यानुसार सार्वजनिक पिण्याच्या स्त्रोताच्या ५०० मीटर अंतरामध्ये कोणतीही व्यक्ती, कोणत्याही प्रयोजनासाठी कोणत्याही विहीरीचे खोदकाम करणार नाही. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताभोवती निश्चित व अधिसूचीत केलेल्या प्रभाव क्षेत्रात कोणतीही व्यक्ती खोदकाम करणार नाही.


तसेच प्रभाव क्षेत्रामधील किंवा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासून एक किलोमीटर अंतरामध्ये यापैकी जे अधिक असेल अशा क्षेत्रातील विहीर तात्पुरती बंद करणे भूजल काढण्यासाठी विहीत करण्यात येईल, अशा रितीने विनियमन करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत दूषित होईल अशी कृती कुणीही करणार नाही. या स्त्रोतांचे संरक्षण करण्यासाठी ग्रामपंचायत जिल्हा प्राधिकरणास मदत करण्याचे अधिनियमनात तरतूद आहे, अशी माहिती मेहकरचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.