‘एक दिवस एक माणूस’

    दिनांक  02-Oct-2017   
एका वलयांकित व्यक्तीबरोबर त्याच्या सहवासात एक दिवस राहायचं, ती व्यक्ती, तिच्या भोवतालचं वातावरण याचं शब्दचित्र रेखाटायचं आणि हे करता करता त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व पकडायचं...! ही सर्वस्वी नवीन, जगातील पहिलीच आणि एकमेव अशी अभिनव लेखन कल्पना होती. या अपूर्व अशा लेखन कल्पनेचे जनक होते, लेखक आणि पत्रकार ह. मो. मराठे ! बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, मनोहर जोशी, श्रीराम लागू, कुसुमाग्रज, नाना पाटेकर, बाबा आढाव, नरेंद्र महाराज इ. एकूण २६ व्यक्तींबरोबर एक एक दिवस घालवून ह मों नी त्यांचे व्यक्तिमत्त्व रेखाटणारे लेख लिहिले. ते ’घरदार’ आणि ’किर्लोस्कर’ या मासिकात प्रसिद्ध झाले. त्या व्यक्तीच्या त्या दिवसाचा तपशील टिपण्यासाठी हमोंमधला पत्रकार उपयोगी पडला, तर ती व्यक्ती समजून घेताना त्यांच्यातील लेखक उपयोगी पडला. लेखक आणि पत्रकार ही त्यांची दोन्ही रूपे ही लेखमाला लिहिताना एकरूप होऊन गेली. हमोंनी लिहिलेल्या या लेखांची ’एक माणूस एक दिवस’ नावाची तीन पुस्तकेही प्रकाशित झाली.

 

लेखनाची अशी नाविन्यपूर्ण कल्पना हाताळणार्‍या ह. मो. मराठे यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झोळंब गावी २ मार्च १९४० रोजी झाल्याचे मानले जाते. कारण, त्यांची खरी जन्म तारीख हमोंनाही माहिती नव्हती. घरी अठराविश्वे दारिद्य्र असलेल्या हमोंचे बालपण कष्टात गेले. वडील ज्या घराच्या दारात उभे राहून ’ओं भवति भिक्षां देहीऽ’ म्हणत त्याच घरासमोर उभं राहून हमोदेखील ’ओं भवति भिक्षां देही’ म्हणत पुकारा करायचे. अन्न घालायला कोणी घरातून बाहेर आलं तर त्याच्यासमोर झोळी पसरली जायची. झोळीत पडेल ते घेऊन पुढल्या घरी जायचं, मिळेल ते खाऊन राहायचं, असेही आयुष्य त्यांनी काढले. मोठ्या भावाने त्यांना नंतर मालवण येथे नेले आणि आपल्या टेलरिंगच्या व्यवसायावर त्यांचे शिक्षण केले.

 

कॉलेज जीवनात ते लेखनही करू लागले. पण लेखक म्हणून त्यांच्या नावलौकिकाला खरी प्रसिद्धी मिळाली, ती १९६९ सालच्या त्यांच्या ’निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या लघु कादंबरीमुळे. तत्कालीन तरुणाला ती आपलीच कथा वाटली. उलटसुलट प्रतिक्रियांच्या वणव्यातूनही ती सही सलामत सुटली. एवढेच नव्हे, तर ती लोकप्रियदेखील झाली. याच सुमारास ’काळेशार पाणी’ ही त्यांची दुसरी लघु कादंबरी प्रसिद्ध झाली. या कादंबरीतील नायकाच्या निवेदनात शिव्यांचा सढळ उपयोग केला गेल्याने बिथरलेल्या काही सोवळ्या वाचकांनी, समाजाच्या प्रकृतीची चिंता करणार्‍या संस्कृतीसंरक्षक शिष्ट समीक्षकांनी आणि करून करून भागलेल्या काही नामवंतांनीही ही दीर्घकथा प्रकाशित झाल्यानंतरच्या काळात त्यांच्यावर आग पाखडली, पण जो सुन्न करणारा अनुभव हमोंनी या कादंबरीत व्यक्त केला आहे, त्याची धग या तथाकथित मवाल्याने वापरावयाच्या भाषेशिवाय एरवी जाणवलीही नसती! त्यांच्या याच कादंबरीवर पुष्कराज परांजपे या नव्या दमाच्या तरुणाने २००८ साली ’डोह’ हा चित्रपट प्रदर्शित केला.

- महेश पुराणिक