परभणीत कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा शुभारंभ

    दिनांक  18-Oct-2017

 

कर्जमाफी प्रमाणपत्रांचे परभणीत पात्र शेतक-यांना वितरण, कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा शुभारंभ

परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या परभणी जिल्हयातील शेतकरी कुटुंबांना आज परभणी येथे कर्जमुक्तीच्या लाभाचे वितरण करण्यात आले. शेतक-यांना कर्जमाफी देण्यासाठी जाहिर करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीचा परभणी जिल्हयातील शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात करण्यात आला. यावेळी खा.संजय जाधव अध्यक्ष स्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्वला राठोड, उपाध्यक्षा श्रीमती भावता नखाते. निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा बॅकेचे व्यवस्थापकीय संचालक व्ही.जी.जाधव, सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, अग्रणी बॅक अधिकारी राम खरटमल, जिल्हा विशेष लेखा परीक्षक एस.आर.कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा खासदार जाधव यांनी यावेळी बोलतांना कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतक-यांचे अभिनंदन करुन दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. शेतक-यांच्या पाठीशी शासन सदैव राहिल याची दक्षता आपल्या सर्वांनी घेतली पाहिजे असे सांगून अलिकडे झालेल्या पिक नुकसानीचा आढावा घेऊन प्रशासनाने नूकसानग्रस्त शेतक-यांचा अहवाल शासनाकडे पाठवावा आणि त्यांना मदत करावी असेही आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या पात्र लाभार्थी शेतक-यांना कर्जमुक्तीचा सोहळा मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या सोहळयाचे थेट प्रक्षेपण व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी व अधिका-यांनी पाहिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतक-यांशी संवाद साधला. कर्जमुक्ती योजनेविषयी आणि शेतक-यांच्या प्रगती विषयीच्या धोरणांची माहिती त्यांनी दिली.प्रास्ताविकात सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेविषयी माहिती देवून जिल्हयातील कर्जमूक्त शेतक-यांच्या लाभाची आणि त्यांच्या वितरणाची माहिती दिली. यावेळी जिल्हयातील विविध तालुक्यातील कर्ज मुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकरी लाभार्थ्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात कर्जमुक्ती प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी कर्जमूक्ती पात्र शेतक-यांनी आपल्या कुटूंबियांसह सत्काराचा स्विकार केला. या कार्यक्रमास जिल्हयातील शेतकरी, अधिकारी व मान्यवर नागरिक उपस्थित होते​.