जलयुक्त शिवारमुळे बुलढाण्यातील ७७ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली

    दिनांक  17-Oct-2017बुलडाणा : पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरावे, जेणे करून जमिनी खालील भूजल साठ्यांमध्ये वाढ व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून गेल्या तीन वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या 'जलयुक्त शिवार' या योजनेने आता जिल्ह्यात देखील चांगलेच बाळसे धरले आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात १२ हजार कामांची पूर्तता झाली असून यामुळे जिल्ह्यातील जवजवळ ७७ हजार ९९३ हेक्टर जमीन सिंचन क्षेत्राखाली आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भूजलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून जिल्ह्यात पिकांची आणि पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होण्याच्या मार्गावर आली आहे.


राज्य शासनाकडून या योजनेचा शुभारंभ करण्यात आल्यानंतर सन २०१५-१६ या वर्षामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील ३३० गावांचा समावेश करण्यात आला होता. यानंतर या योजनेच्या माध्यमातून या गावांमधील जलसंधारणाची ९ हजार १२३ कामे पूर्ण करण्यात आली होती. या दरम्यान या विविध कामांच्या माध्यमातून जिल्ह्यात ४५ हजार २७० टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. तसेच यामुळे जिल्ह्यातील ३८ हजार १२१ हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. तर २० हजार ६ हेक्टर क्षेत्रावर दोन वेळच्या संरक्षित सिंचन सुविधा निर्माण झाली.


याच प्रमाणे सन २०१६-१७ या वर्षामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये २४५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यातील या २४५ गावांमध्ये आतापर्यंत ३ हजार २९६ कामे पूर्ण करण्यात आली असून यातील ८८ कामे प्रगतीपथावर आहेत. या टप्प्यात झालेल्या जलसंधारण कामांमुळे १७ हजार १७२ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. तसेच ७ हजार २४१ हेक्टर क्षेत्रावर दोन वेळच्या आणि १२ हजार ६२५ हेक्टर क्षेत्रावर एक वेळच्या संरक्षित सिंचन होणार आहे.


राज्याने अनेक वेळा दुष्काळाचे चटके सहन केले आहेत. विदर्भावर असलेल्या वरुणराजाच्या अवकृपेमुळे विदर्भातील जिल्ह्यांना सातत्याने दुष्काळ आणि पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यामुळेच राज्यातील भूजल साठा वाढून शेती आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर व्हावी, या उद्देशाने जलयुक्त शिवार योजनेची सुरुवात करण्यात आली होती. राज्यातील भूजल साठा वाढवून राज्यातील गावे टँकरमुक्त करणे हा राज्य सरकारचा मुख्य उद्देश आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे भूजल पातळी निश्चितच वाढली आहे. नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसामुळे जलयुक्त शिवार अभियानातील साठवण बंधारा, तलाव, नाला खोलीकरण व रूंदीकरण, ढाळीचे बांध, सिमेंट बंधारा आदींमध्ये चांगले पाणी साठले आहे. त्यामुळे अनेक भागांत जलसंधारणांच्या विविध कामांमध्ये साचलेले पाणी उपयोगात आणले जात आहे. तसेच सध्याच्या बिकट परिस्थितीत जलयुक्त शिवार अभियान बुलढाण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावित आहे.