१८ ऑक्टोबर पासून कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा होणार

    दिनांक  16-Oct-2017


 

जालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील कर्जमाफीचे पैसे येत्या १८ ऑक्टोबरपासून राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्षपणे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जालना येथे झालेल्या एका कार्यक्रमात ही माहिती दिली.  ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे बळीराजा सुखावला आहे.

Embeded Object

 

 तसेच १८ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम केला जाणार असून प्रत्येक तालुक्यातील ५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देत पालकमंत्र्यांच्या हस्ते सदराटोपीसाडी-चोळी व प्रमाणपत्र देउन शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.

 

शेतकरी कर्जमाफीसाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रत्यक्ष लाभार्थ्यांचे अर्ज नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती, प्रत्यक्ष कर्जमाफी ही दिवाळीत होणार याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून आधीच करण्यात आली होती, त्यानुसार दिवाळीत कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला लवकरच सुरुवात होणार आहे.

 

कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांनी सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने कर्जवाटपात पारदर्शकता येण्यासाठी कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतलाहोता. त्यासाठी शेतकऱ्यांशी ऑनलाईन अर्ज भरून घेत ही माहिती आधार कार्डाशी लिंक केली. आता दिवाळीच्या मुहूर्तावर कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या पहिल्या टप्प्यात सुमारे १५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली.  


आज मुख्यमंत्री जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जालना जिल्ह्यातील कडवांची येथे जलयुक्त शिवाराच्या प्रकल्पाला त्यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, तसेच अर्जुन खोतकर देखील होते.

Embeded Object

कडवांची येथील जलयुक्त शिवारामुळे स्थानिक दरडोई उत्पन्नात वाढ झाली असून शेती उत्पादनात देखील मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. ते मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यामंत्यांनी केले आहे.

Embeded Object

जालना जिल्ह्याला समृद्धी महामार्गाचा मोठा फायदा होणार असल्याचे देखील ते यावेळी बोलले. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांमध्ये शेतीसाठी २५ हजार कोटीची गुंतवणूक करण्यात आली आहे. याचा फायदा महाराष्ट्रतील शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी होईल, अशी अशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.