जळगाव जामोद तालुक्यात बँक शाखांचे जाळे तयार करणार

    दिनांक  15-Oct-2017


पालकमंत्री फुंडकर यांची घोषणा 

बुलडाणा : मानव विकास निर्देशांक वाढवण्याच्या उद्दशाने जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात लवकरच बँकांचे जाळे उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली आहे. तसेच या संबंधीचे आदेश देखील त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.


राज्य शासनाने मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या राज्यातील २५ तालुक्यांची निवड केली आहे. त्यामध्ये बुलडाण्यातील जळगांव जामोद तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी या तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी तालुक्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांचे जाळे मोठ्या प्रमाणावर निर्माण करावे लागणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच यासंबंधी काल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जळगांव जामोद तालुका मानव विकास निर्देशांक कार्यक्रमाची आढावा बैठक देखील आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री फुंडकर यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना या संबंधी काही सूचना देखील दिल्या.


या कार्यक्रमामध्ये जळगाव जामोद तालुक्यात रोजगार निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, छोट्या – छोट्या रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात याव्यात. तालुक्यात शेती व संलग्न क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध होऊ शकतो. याबाबत शक्यता पडताळून पाहण्यात याव्यात. याप्रसंगी आमदार डॉ. संजय कुटे यांनी मुद्देनिहाय माहिती घेवून तालुक्याचा सर्वांगिण विकासाकरीता आराखडा तयार करण्याबाबत सांगितले. जळगांव जामोद आयटीआय येथे बॉश कंपनी कौशल्य विकासाकरीता करारातंर्गत काम करणार आहे. त्याचा लाभ या भागातील तरूणांना होणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.