बालेकिल्ला राखला, उद्ध्वस्त गढ्यांचे काय ?

    दिनांक  14-Oct-2017   
 
 
अशोक चव्हाण यांच्या सुदैवाने दिल्लीतील कॉंग्रेसचं केंद्रीय नेतृत्वही गोंधळलेलं असल्याने चव्हाणांचं प्रदेशाध्यक्षपद टिकलं आहे. परिस्थिती अगदीच निर्णायक पातळीवर जात असताना नांदेडच्या निवडणूक निकालाने अशोक चव्हाणांना प्राणवायू पुरवला आहे. मात्र, हा प्राणवायू फार दिवस पुरणारा नाही. कारण, चव्हाण हे नांदेड जिल्हाध्यक्ष नसून राज्याचे अध्यक्ष आहेत. नांदेड निवडणुकीत भाजपच्या पराभवाने चव्हाण यांची बाजू थोडी वरचढ झाली असली तरी राज्यात अद्याप पहिले पाढे पंचावन्नच आहेत.
 
 
‘‘ज्यांच्या मागे किमान स्वतःची राज्यं नाहीत, ते केंद्रात पंतप्रधानपदाचे दावेदार ठरू शकत नाहीत,’’ अशाप्रकारची खंत कॉंग्रेसच्या एका अत्यंत ज्येष्ठ, प्रभावशाली व पंतप्रधानपद मिळविण्यात सातत्याने अपयशी ठरलेल्या नेत्याने खासगीत व्यक्त केली होती. देशाच्या राजकारणात यशस्वी ठरण्यासाठी आवश्यक असणारे हेच सूत्र राज्य पातळीवरही जवळपास सारखेच आहे. राज्य पातळीवर ‘प्रभावी नेता’ म्हणून सिद्ध करायचं झाल्यास किमान आपला जिल्हा आपल्यामागे भक्कमपणे उभा असल्याचे सिद्ध करावे लागते. त्यामुळेच २०१४ पासून महाराष्ट्रासह देशभरात कॉंग्रेसची आजवर कधीच झाली नव्हती इतकी जबरदस्त पीछेहाट होत असताना आपलं कार्यक्षेत्र नांदेड भक्कमपणे टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरलेले अशोक चव्हाण हे नक्कीच अभिनंदनास पात्र ठरतात. वास्तविक पाहता ’ड’ वर्गात मोडणार्‍या छोट्याशा नांदेड महानगरपालिकेची ही निवडणूक कॉंग्रेसने जिंकली व केंद्र-राज्यातील सत्ताधारी भाजपचा दारूण पराभव झाला. मात्र, या निवडणुकीनंतर चालू असलेले कवित्व पाहता मुख्य रोख हा कॉंग्रेस जिंकण्यापेक्षा भाजप पराभूत होण्यावर आहे हे लक्षात येतं. म्हणजे कॉंग्रेसच्या या विजयाचा आनंद डाव्या कम्युनिस्ट, समाजवाद्यांसह अगदी शिवसेनेनेही साजरा केला आहे. ते स्वाभाविकच आहे. मात्र, या निवडणुकीचं महत्त्व एवढ्यावरच संपत नाही. कारण, हा विजय कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी मिळवलेला आहे. त्यामुळेच या निवडणुकीचं महत्त्व कॉंग्रेस पक्षांतर्गत राजकारणात जरा अधिक आहे.
 
 
कॉंग्रेसचे दिग्गज नेते शंकरराव चव्हाण यांचे अशोक चव्हाण हे पुत्र. अशोक चव्हाण १९८७-८८ पासून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जात असून त्यांनी कारकिर्दीतील पहिले मंत्रिपद अवघ्या ३५व्या वर्षी भूषवलेले आहे. २००३ पासून कॅबिनेट मंत्रिपदी असणारे चव्हाण यांनी २००८ ते ०९, २००९ ते १० अशा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या दोन टर्म्स केल्या आहेत. २०१० मध्ये ‘आदर्श’ गृहनिर्माण प्रकरणात त्यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली आणि ते बॅकफूटवर गेले. सोबतीला कॉंग्रेस अंतर्गत गट-तट होतेच. २०१० ते २०१४ चव्हाण राज्याच्या राजकारणातून जवळपास फेकले गेल्यातच जमा होते. २०१४ मध्ये चव्हाण नांदेडमधून लोकसभेला उभे राहिले. राज्यात आणि केंद्रात कॉंग्रेस पक्षाची पार धूळधाण उडालेली असताना राज्यातून निवडून गेलेल्या अवघ्या २ खासदारांपैकी चव्हाण एक होते. कॉंग्रेस सरकारच्या काळात केंद्रात जे घोटाळे झाले, त्यामुळे जशी देशभरात सरकारची प्रतिमा डागाळली, तशी राज्यात ‘आदर्श’मुळे कॉंग्रेसची पुरती बेअब्रू झाली. राज्यात कॉंग्रेसचे श्राद्ध घालण्यात या प्रकरणाने महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी खुद्द चव्हाण मात्र ८० हजारांच्या मताधिक्क्याने निवडून आले. विधानसभा निवडणुकीतही नांदेड लोकसभेअंतर्गत कॉंग्रेसच्या ६ जागांपैकी ३ जागा निवडून आल्या. देशात कुठेच काहीच सुवार्ता मिळत नसताना चव्हाणांनी नांदेड हा परंपरागत बालेकिल्ला कायमराखला आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. राज्यात पक्षाच्या नेतृत्वाची संधी पुन्हा एकदा चालून आलेली असताना त्यांना तिचं सोनं करता आलं नाही. नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद-पंचायत समित्या आदी सर्वच्या सर्व निवडणुकांत कॉंग्रेसचा धुव्वा उडाला. याचसोबत पक्षांतर्गत गटबाजीने पुन्हा एकदा उचल खाल्ली.
 
 
मुंबई, कोकण, पश्चिममहाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आदी प्रत्येक विभागातून गटबाजीला उधाण आलं, जे अजूनही कमी झालेलं नाही. विधिमंडळात पक्षाचे नेतृत्व करायला राधाकृष्ण विखे-पाटील, शरद रणपिसे यांच्यासारखी दुबळी माणसं, त्यात विखेंच्या स्वतःच्याच पक्षनिष्ठेवर वारंवार उभं राहिलेलं प्रश्नचिन्ह, नारायण राणे व इतर नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांना मध्येच फुटणार्‍या उकळ्या, यामुळे पक्षसंघटना चव्हाणांच्या कार्यकाळात पुरती कमकुवत झाली आहे. याचसोबत चव्हाणांचा स्वतःचा गट वासरांतील शहाणी लंगडी गाय बनून प्रबळ होऊ लागला आहे. अब्दुल सत्तार, डी. पी. सावंत, प्रवक्ता सचिन सावंत आदी अशोक चव्हाण समर्थक गट पक्षात सध्या इतर गटांना वरचढ ठरत असून त्यांच्यात आपल्याला खड्यासारखं बाजूला टाकलं जात असल्याची भावना आहे. नुकतेच संघटनेत आलेले सचिन सावंत यांनी जुनेजाणते प्रवक्ते व आ. अनंत गाडगीळ यांच्यावर कुरघोड्या करण्याचा केलेला प्रयत्न हे याचंच उदाहरण. पक्षाला ना राणेंना सांभाळायला जमलं ना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मतांची फोडाफोड रोखायला. चव्हाण यांच्या सुदैवाने दिल्लीतील पक्षाचं केंद्रीय नेतृत्वही गोंधळलेलं असल्याने चव्हाणांचं अध्यक्षपद टिकलं, पण परिस्थिती अगदीच निर्णायक पातळीवर जात असताना नांदेडची निवडणूक आली आणि तिच्या निकालाने चव्हाणांना प्राणवायू पुरवला. हा प्राणवायू फार दिवस पुरणारा नाही. कारण, चव्हाण काही नांदेड जिल्हाध्यक्ष नसून राज्याचे अध्यक्ष आहेत. नांदेड निवडणुकीत भाजपच्या पराभवाने चव्हाण यांची बाजू थोडी वरचढ झाली असली तरी राज्यात अद्याप पहिले पाढे पंचावन्नच आहेत. त्यामुळे आता चव्हाण यांची पुढची वाटचालच अधिक महत्त्वाची ठरणार आहे.
 
 
नांदेडमध्ये भाजपला अपयश का मिळालं? याची कारणं भाजप शोधेलच. मात्र, या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार ताकद लावली होती हेही खरंच. मात्र, ती ताकद लावूनही ही लढाई काहीशी विषमच होती. एका बाजूला नांदेडच्या राजकारणावर गेली २५-३० वर्षे एकहाती वर्चस्व गाजवणारं चव्हाण घराणं आणि दुसरीकडे मूळचे लातूरमधले आणि गेल्यावर्षीच मंत्रिपदाची धुरा मिळाल्याने प्रकाशझोतात आलेले संभाजी पाटील-निलंगेकर. तुलनेने नवखे असूनही निलंगेकरांनी जोरदार खिंड लढवली आणि कॉंग्रेसच्या परंपरागत बालेकिल्ल्यात कॉंग्रेसपुढे एक तगडं आव्हान उभं केलं. मात्र, नांदेडकरांनी चव्हाण घराण्यावरच पुन्हा एकदा विश्वास दाखवला. आता भाजपला आत्मपरीक्षण करून, नांदेडबाबत नव्याने व्यूहरचना करावी लागेल. मात्र, नांदेडशेजारच्याच लातूरमध्ये कॉंग्रेसची पारंपरिक देशमुखी गढी जिल्हा परिषद व इतर निवडणुकांत पुरती उद्ध्वस्त केल्यानंतर नांदेडच्या या दुसर्‍या गढीला सुरुंग लावण्याचं भाजपचं स्वप्न तूर्तास अधुरंच राहणार आहे. नांदेडची पुनरावृत्ती आता देशभरात होणार आणि चव्हाणांच्या भाषेत भाजपचा परतीचा प्रवास सुरू होणार, असं मानणं मात्र वेडेपणा ठरेल. कारण नांदेडसह इतर ठिकाणी पोटनिवडणुकाही झाल्या आहेत, ज्यामध्ये भाजपने सहजपणे यश मिळवलं आहे. एमआयएमसारख्या विषारी प्रवृत्तींना नांदेडकरांनी त्यांची योग्य जागा दाखवली, ही बाब मात्र सकारात्मक म्हणावी लागेल. गेल्या वर्षभरात झालेल्या निवडणुकीत भिवंडी, मालेगाव आणि आता नांदेड या मुस्लीमबहुल शहरांत एमआयएमला साफ अपयश आलं आहे. भाजपनेही आपला पराभव स्वीकारतानाच एमआयएमअपयशी ठरून ती मतं एका राष्ट्रीय पक्षाला मिळाल्याचे स्वागत करत राजकीय परिपक्वता दाखवली आहे. सोबतच नांदेडमध्ये कॉंग्रेसच्या बरोबरीने ताकद असणार्‍या शिवसेनेला चारचौघात सांगण्याइतपतही यश मिळालेलं नाही, मात्र भाजप पराभूत झाल्यामुळे सेनेला अत्यानंद झालेला आहे.
 
 
थोडक्यात, अशोक चव्हाण यांची पुढील वाटचाल सोपी नाही. परिस्थितीने आणखी एक संधी दिलेली असताना चव्हाण तिचा फायदा घेतात की आधीसारखंच वासरांतील लंगडी गाय बनून राहण्यात धन्यता मानतात हे सर्वासी त्यांच्या पुढील वाटचालीवर अवलंबून आहे. 
 
- निमेश वहाळकर