हिंदू स्वयंसेवक संघाचा विश्वसंचार

    दिनांक  13-Oct-2017   
 

 
 
१९२५ साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या ९२ वर्षांत देशातील प्रत्येक क्षेत्रात आपला पाय रोवला. आज भारतात सर्वत्र संघकार्य जोमाने सुरू आहे. स्वातंत्र्यानंतर भारतातील अनेक संघ स्वयंसेवक आपल्या नोकरी, व्यापार, शिक्षण आदी कारणांमुळे परदेशातही स्थायिक झाले. पण, त्या स्वंयसेवकांनी आपला हिंदू समाजाचा मूळ पिंड सोडला नाही, उलट हिंदूबांधवांच्या एकत्रिकरणासाठी संघटनाचा मार्ग पत्करला. रा. स्व. संघाच्या प्रेरणेने जगभरातील स्वयंसेवकांनी अशाप्रकारे हिंदूंना संघटित करण्याचे कार्य हाती घेतले. संघटनाचे हे पहिले बीज केनियामध्ये रोवले गेले. त्यानंतर जगभरातील हिंदूंना एकत्रित करण्याचे हे कार्य ‘हिंदू स्वयंसेवक संघ’ या नामाभिधानाखाली १९४७ सालापासून आजतागायत अविरत सुरू आहे. याच हिंदू स्वयंसेवक संघाची स्थापना, शाखा, उपक्रम, कार्यक्रमयाचा आढावा घेणारा हा माहितीपूर्ण लेख...
 
 
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, 
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम...| 
 
ही प्रार्थना आणि त्यातील संकल्पना, मूल्यांवर निष्ठा ठेवत गेल्या ९२ वर्षांपासून संपूर्ण देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वाटचाल करत आहे. गेल्या ९२ वर्षांत रा. स्व. संघ समाज जीवनाच्या सर्वच क्षेत्रात वर्धिष्णू राहिला. देशातील कामगार, शेतकरी, तरुण, विद्यार्थी, महिला अशा सर्वच समाजघटकांशी संघाची नाळ जोडली गेली. संघाची व्यापकता अशी आहे की, संपूर्ण भारतीय समाजाचे नेतृत्व रा. स्व. संघच करत आहे, असे वाटते. आता रा. स्व. संघाच्या प्रेरणेने सातासमुद्रापार अमेरिकेसह जगभरातील सर्व खंडांतील ३९ देशांमध्ये हिंदू संघटनांचा नवा अध्याय लिहिला जात आहे. ’हिंदू स्वयंसेवक संघ’ म्हणून या संघटनेच्या शाखा ओळखल्या जातात. ’विश्व धर्म की जय’ असा जयघोष करत जगभरातील हिंदूंना जोडण्याचे कामया माध्यमातून अविरतपणे सुरू आहे.
 
 
भारतात रा. स्व. संघाचे जाळे अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरले आहे. अनेक गावे-शहरांमध्ये रोज ‘प्रभात’ आणि ‘सायंकाळ’ अशी संघ स्वयंसेवकांची शाखा भरते. हिंदू धर्माच्या प्रसार-प्रचाराचे कार्य या शाखांच्या माध्यमातून लाखो स्वयंसेवक वर्षानुवर्षे निष्ठेने करत आहेत. भारताबाहेरच्या देशांमध्ये विविध हिंदू संघटनांच्या सोबत उभा राहून हिंदू स्वयंसेवक संघ कामकरतोय आणि आता ‘वाढता वाढता वाढे’ ही उक्ती सार्थ ठरवत ३९ देशांमध्ये भगवा ध्वज फडकत आहे.
 
 
आजघडीला नेपाळमध्ये हिंदू स्वयंसेवक संघाच्या सर्वाधिक शाखा असून त्या खालोखाल अमेरिकेचा क्रमांक लागतो. अमेरिकेतल्या प्रत्येक राज्यात हिंदू स्वयंसेवक संघाची ध्वजा पोहोचली असून तिथल्या शाखांची संख्या १४६ इतकी आहे. हिंदू स्वयंसेवक संघाच्या लंडनमध्ये ८४ शाखा असून आठवड्यातून दोन वेळा स्वयंसेवक एकत्र जमतात. बर्‍याच देशांमध्ये आठवड्यातून एकदाच शाखा भरते. मध्य आशियातील पाच देशांमध्येही हिंदू स्वयंसेवक संघाने प्रवेश केला आहे. परंतु, त्या देशांमध्ये मैदानात भेटता येत नसल्याने स्वयंसेवक समाजातील एखाद्या व्यक्तीच्या अथवा स्वयंसेवकांच्या घरी जमतात. सध्याचे युग हे ऑनलाईन, इंटरनेट यांचे आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर करत फिनलँडमध्ये ई-शाखा भरते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध देशांमधले स्वयंसेवक या ई-शाखेत सहभागी होतात.
 
 
हिंदू स्वयंसेवक संघाचे हिंदू संघटनांचे कार्य संपूर्ण जगभरात जोमाने सुरू आहे. सध्या संघाचे २५ प्रचारक आणि शंभरहून अधिक विस्तारक शाखांच्या विस्ताराचे कार्य सर्वत्र करत आहेत.
 
 
हिंदू स्वयंसेवक संघाची स्थापना
रा. स्व. संघाचा विश्व विभाग स्थापन करणे, हा कोणत्याही योजनेचा किंवा रचनात्मक कार्याचा भाग नव्हता, ज्याची नंतर अंमलबजावणी झाली. १९४६ साली मुंबईहून केनियातील मोम्बासा शहराला जाणार्‍या जहाजावर माणिकभाई रुगानी आणि जगदीश शारदा हे दोन स्वयंसेवक अगदी अचानक भेटले आणि त्यांनी तिथेच संघ प्रार्थना म्हटली आणि तीच भारताबाहेरची रा. स्व. संघाची पहिली शाखा ठरली. याची कथा मात्र मोठी मजेशीर आहे.
 
 
आजचे जे हिंदू स्वयंसेवक संघाचे स्वरूप दिसते आहे, त्याची सुरुवात १९४६ साली झाली. त्यावेळी लुधियानातील संघ स्वयंसेवक प्रा. जगदीश शारदा अमृतसरहून केनियाला जात होते. अचानक त्याचवेळी एक तरुण व्यापारी-माणिकभाई गुगाणी हे देखील गुजरातहून केनियालाच जात होते. मुंबईहून मोम्बासाला जाणार्‍या जहाजातून या दोघांचा प्रवास सुरू झाला. हा संपूर्ण प्रवास १८ दिवसांचा होता. हे दोघेही प्रवासी एकमेकांना अनोळखी असले तरी ते दोघेही रा. स्व. संघाच्या शाखेत नियमित जात असत. जहाजावरील पहिल्याच दिवशी संघाची रोजची सायंशाखा त्यांच्याकडून चुकल्याने दोघेही अस्वस्थ झाले. त्यामुळे प्रा. जगदीश शारदा आणि माणिकभाई रुगानी या दोघांनीही स्वतंत्रपणे वैयक्तिकरित्या असे ठरवले की, जहाजावरच शाखेला सुरुवात करायची. आणि नंतर दोघांनी संघाचा गणवेश परिधान केला. दोघेही एकाच वेळी जहाजाच्या डेकवर आले. दोघांनी एकमेकांना संघाच्या गणवेशात पाहताच त्यांना खूप आनंद झाला. हीच रा. स्व. संघाची भारताबाहेरची पहिली शाखा होय, जी चक्क दूर समुद्रात भरली. त्यानंतर त्यांनी जहाजावरील सर्व भारतीयांशी ओळख करून घेतली आणि त्यांना हे ऐकून आश्चर्यच वाटले की, जहाजावर एकूण १७ संघ स्वयंसेवकांची उपस्थिती आहे. त्यानंतर रोज म्हणजे मोम्बासाला पोहोचेपर्यंत जहाजाच्या डेकवर संघाची शाखा सुरू झाली. नंतर नैरोबीला गेल्यानंतर सर्वांनी ठरवले की, येथे हिंदू संघटनांचे कार्य सुरू करायला हवे. त्यासाठी त्यांनी रा. स्व. संघाचे पंजाबचे तत्कालीन प्रांत प्रचारक असलेल्या माधवराव मुळे आणि ज्येष्ठ प्रचारक चमनलालजी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर १९४७ सालच्या मकरसंक्रांतीला सायंकाळी नैरोबीत नियमित हिंदू एकत्रीकरणाला सुरुवात झाली, ज्याचे नाव ‘भारतीय स्वयंसेवक संघ-केनिया’ असे ठेवले गेले. त्यानंतर भारतीय स्वयंसेवक संघाचे नाव बदलून ’हिंदू स्वयंसेवक संघ’ असे नामकरण करण्यात आले. आता हिंदू स्वयंसेवक संघाच्या शाखा केनियातील मोम्बासा, नाकारु, किसुमु, एल्डोरेट आणि मेरु या शहरात सुरू आहेत.
 
 
पुढे रा. स्व. संघाचे स्वयंसेवक जसजसे परदेशात गेले तसतसे त्यांनी त्या त्या देशात संघप्रेरणेने हिंदू संघटनाचे कार्य सुरू केले. ‘एकात्म मानवदर्शना’चे जनक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रेरणेने म्यानमार म्हणजे त्यावेळच्या ब्रह्मदेशात संघाची शाखा ‘सनातन धर्म स्वयंसेवक संघा’च्या नावाने सुरू करण्यात आली. नेपाळमध्ये ‘मातृभूमी स्वयंसेवक संघ’ आणि त्यानंतर अन्य देशांमध्ये ‘हिंदू स्वयंसेवक संघा’च्या नावाने शाखा सुरू करण्यात आली. हिंदू स्वयंसवेक संघाची नोंदणी त्या त्या देशातील कायद्यानुसार करण्यात आली. वर्तमानात विश्व विभागाचे सर्व कार्य काही अपवाद वगळता ‘हिंदू स्वयंसेवक संघ’ या नावाने सुरू आहे.
 
 
हिंदू स्वयंसेवक संघ-केनियाची स्थापना १९४७ साली केनियामध्ये झाली, त्यानंतर १९५० साली ब्रह्मदेशात शाखा सुरू झाली. १९६० च्या सुरुवातीला हिंदू स्वयंसेवक संघाचे कार्य इंग्लंडमध्ये सुरू झाले आणि त्या दशकाच्या अंतापर्यंत या कार्याची पताका अमेरिकेतही फडकली. १९९०च्या दशकात विश्व विभागाच्या कार्याने मोठी झेप घेतली आणि त्यामुळे त्यासाठी काही संरचना तयार करण्याची गरज भासली. यावेळेपर्यंत चमनलालजी हिंदू स्वयंसेवक संघाच्या कार्याचा समन्वय साधत होते. १९५८ साली रा. स्व. संघाचे संयुक्त प्रांताचे ज्येष्ठ प्रचारक लक्ष्मणराव भिडे यांनी केनियाला भेट दिली. ते त्यावेळी उत्तर प्रदेश, बिहार आणि नेपाळचे प्रमुख होते.
 
 
आणीबाणीच्या काळात भारतातील माध्यमस्वातंत्र्यावर बंधने आली. यावेळी जगाचे लक्ष भारतीय नागरिकांच्या परिस्थितीकडे, त्यांच्या मानवाधिकार हननाकडे वेधण्याची गरज निर्माण झाली. यासाठी परदेशातील संघ स्वयंसेवकांचा उपयोग करून घेण्याचे ठरवण्यात आले. हे कार्य लक्ष्मणरावजी भिडे यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यानंतर परदेशातील भारतीयांच्या सहकार्याने ‘फ्रेंड्‌स ऑफ इंडिया सोसायटी’ची स्थापना करण्यात आली. सुब्रमण्यम स्वामी, मकरंद देसाई यांनी या व्यासपीठाच्या माध्यमातून परदेशात आणीबाणीचा मुद्दा उठवला आणि देशातील हुकूमशाहीविरोधात दबाव निर्माण केला.
 
 
लक्ष्मणराव भिडे यांनी त्यानंतर म्हणजे १९९४ पर्यंत अनेक देशांना भेटी दिल्या आणि जगाच्या विविध भागात हिंदू स्वयंसेवक संघाचे जाळे निर्माण केले. सध्या मुंबईतून रमेश सुब्रमण्यम हे हिंदू स्वयंसेवक संघाचे कार्य पाहतात.
 
 
हिंदू स्वंयसेवक संघाचा गणवेश
 
हिंदू स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचा गणवेश काळी पँट आणि पांढरा शर्ट असा आहे. हिंदू स्वयंसेवक संघाची ’विश्व धर्म की जय’ अशी घोषणा आहे. जगाच्या कानाकोपर्‍यात भारतीय नागरिक पोहोचले असल्याने ’वसुधैव कुटुम्बकम’ हे ब्रीद घेऊन जगभरातील हिंदूंना भगव्या झेंड्याखाली एकत्र आणण्याचे ध्येय हिंदू स्वयंसेवक संघाने समोर ठेवले आहे.
 
 
हिंदू स्वयंसेवक संघाचे कार्य
 
जगभरात पसरलेल्या हिंदू संघटनांचे कार्य ‘हिंदू स्वयंसेवक संघ’ या नावाने ओळखले जाते. जगभरातील हिंदूंना जोडण्यासाठी ‘हिंदू स्वयंसेवक संघ’ हे नाव देण्यात आले आहे. हिंदू स्वयंसेवक संघाच्या कार्याला जगभरात आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘चिन्मय मिशन’ आणि ‘रामकृष्ण मिशन’ या संस्थांचे सहकार्य लाभत आहे. सध्या संघाशी ‘सेवा इंटरनॅशनल’ सह अन्य ४० संघटनाही जोडलेल्या आहेत. मात्र, परदेशात कार्य करणारी ‘हिंदू स्वयंसेवक संघ’ ही संघटना या सर्वांपेक्षा फार मोठी आहे. आफ्रिकी देश टांझानिया आणि युगांडा व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका आणि मॉरिशसमध्येही हिंदू स्वयंसेवक संघाच्या शाखा सुरू आहेत.
 
 
नेपाळ, ब्रह्मदेश (म्यानमार) आणि केनियामध्ये काही ठिकाणी हिंदू स्वयंसेवक संघाच्या दैनंदिन शाखा सुरू आहेत, पण इतर देशात साप्ताहिक शाखा आयोजित केल्या जातात. तथापि, आज्ञा, ध्वज, आचारपद्धती आणि उत्सव हे सर्वच ठिकाणी सारखेच आहेत. हिंदू स्वयंसेवक संघाच्या शिक्षावर्गाचा कालावधी आठ दिवसांचा असतो. अशाप्रकारे तीन वर्ग पूर्ण केल्यानंतर सहभागी स्वयंसेवकांना द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षणासाठी भारतात पाठवले जाते. त्यानंतर संघ स्वयंसेवकांना तृतीय वर्षाचे प्रशिक्षण नागपूर येथे दिले जाते. संघ शिक्षावर्गाचे आयोजन सध्या १२ देशांत करण्यात येते. परदेशातील संघ शाखेत येणार्‍या स्वयंसेवकांना दुरून यावे लागते, बरेचदा घर आणि शाखेचे ठिकाण यातील अंतर जास्त असते आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी व मुलेही असतात. म्हणून शाखेच्या वेळी त्यांची तीन गटात विभागणी केली जाते. पुरुष, महिला आणि बालक. यामुळे संघकार्याबरोबरच हिंदू सेविका समितीचे कार्यही विकसित होते. संघकार्याच्या विकासाबरोबरच विश्व हिंदू परिषद, संस्कार भारती, बालगोकुलम, विद्यार्थी क्षेत्र-नॅशनल हिंदू स्टुडंट्‌स फोरम आणि सेविका समिती यांचेही कार्य सुरु असून कित्येक देशात पसरले आहे. हिंदू स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशात अनेक नवीन मंदिरांची उभारणी करण्यात आली असून येथे कित्येक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हिंदू स्वयंसेवक संघाचे सर्व कार्य हे पाच भौगोलिक विभागांनुसार विभागलेले आहे.
 
 
१) अमेरिका, कॅनडा, कॅरेबियन बेटे, दक्षिण अमेरिकेतील राष्ट्रे
 
२) युरोप खंड
 
३) आफ्रिका आणि मध्य-पूर्वेतील देश
 
४) दक्षिण-पूर्व आशिया आणि भारतीय उपखंडातील देश 
 
५) ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड
 
सध्या हिंदू स्वयंसेवक संघाचे कार्य ३९ देशांत सुरु असून अन्य १०० देशांत कार्य सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. १९७० साली कॅनडात विश्व हिंदू परिषदेची आणि १९७१ साली ‘वर्ल्ड हिंदू कौन्सिल’ या हिंदू स्वयंसेवक संघाच्या सहकारी संघटनांची स्थापना करण्यात आली. या संघटनांना उत्तर अमेरिकेमध्ये आपले कार्य सुरु करण्यात आणि वाढवण्यात हिंदू स्वयंसेवक संघाचे मोठे सहकार्य मिळाले.
 
 
ऑस्ट्रेलिया
 
ऑस्ट्रेलियातील हिंदू स्वयंसेवक संघाने आपल्या ऑस्ट्रेलियातील कार्यावर लक्ष केंद्रित केले आहे. रा. स्व. संघाच्या विचारांनी प्रेरित झालेल्या हिंदू स्वयंसेवक संघाचे ध्येय प्रगतीशील आणि चैतन्यशील हिंदू समाजाची उभारणी करणे हे आहे. या माध्यमातून हिंदू समाज आपल्या अंतर्गत आणि बाह्य आव्हानांचा सामना करु शकतो आणि त्यातून विश्र्वकल्याण साधले जाईल, ही हिंदू स्वयंसेवक संघाची विचारप्रणाली आहे. ऑस्ट्रेलियातील हिंदू स्वयंसेवक संघाचा संबंध विश्व हिंदू परिषद आणि ‘हिंदू युथ नेटवर्क’ या संघटनांशीदेखील आहे. या माध्यमातून तेथील हिंदू समाजाशी निगडित प्रश्नांवर जनजागृती करणे, आवाज उठवणे हे कामकेले जाते. परंतु, हिंदू स्वयंसेवक संघ येथील कोणत्याही राजकीय पक्ष किंवा व्यक्तीला पाठिंबा देत नाही.
 

 
नेपाळ
 
नेपाळमध्ये हिंदू स्वयंसेवक संघाची सुरुवात १९९२ साली झाली. भारतामध्ये शिक्षण घेत असताना काही नेपाळी विद्यार्थ्यांना रा. स्व. संघापासून प्रेरणा मिळाली आणि त्यांनी नेपाळमध्ये हिंदू स्वयंसेवक संघाची स्थापना करण्याचे ठरवले. सध्या नेपाळमध्ये हिंदू स्वयंसेवक संघाची शाखा दैनंदिन तत्त्वावर सुरु आहे. नेपाळच्या तराई प्रदेशात हिंदू स्वयंसेवक संघाचे मोठे कार्य असून त्या माध्यमातून शिक्षण, विचारधारेचा प्रसार आणि प्रचार करणे असे कार्य केले जाते.
 
 
युनायटेड किंग्डम
 
युनायटेड किंग्डममध्ये हिंदू स्वयंसेवक संघाची स्थापना १९६६ साली करण्यात आली. सुरुवातीला तेथील बर्मिंगहॅमआणि ब्रॅडफोर्ड या शहरांत हिंदू स्वयंसेवक संघाच्या शाखा सुरु करण्यात आल्या. रा. स्व. संघापासून प्रेरित हिंदू स्वयंसेवक संघ ब्रिटनमध्ये कार्य करणारी सामाजिक संघटना आहे. या माध्यमातून येथील हिंदू समाज वेळोवेळी आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रम-कार्यक्रमात भाग घेतो. ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन आणि मार्गारेट थॅचर यांनीदेखील सनातन धर्मावर आधारित ‘वसुधैव कुटुम्बकम’चा संदेश पुढे घेऊन जाणार्‍या हिंदू स्वयंसेवक संघाच्या कार्याचे कौतुक केले होते.
 
 
अमेरिका
अमेरिकेमध्ये हिंदू स्वयंसेवक संघाची स्थापना १९८९ साली करण्यात आली. येथे हिंदू स्वयंसेवक संघाची नोंदणी करसवलती संदर्भातील ५०१ (सी)(३) या अंतर्गत करण्यात आली आहे.
 
 
विश्व विभागाचे ’संवाद’ हे मुखपत्र १०० देशांत वितरित करण्यात येत आहे. इंग्लंडमध्ये संघकार्य अधिक नियमबद्ध प्रकारे होत असून तेथे हिंदू स्वयंसेवक संघाच्या ३० शाखा सुरु आहेत. तेथे बालगोकुलमची ८० मिलन केंद्रे आहेत. अमेरिकेमध्ये १५० शाखा सुुरु असून मॉरिशसमध्ये २० शाखा सुरु आहेत. संपूर्ण जगभरातील हिंदू स्वयंसेवक संघाच्या शाखांची संख्या ५५० पेक्षा अधिक आहे. हिंदू स्वयंसेवक संघामार्फेत २०-२५ देशांत संपर्क समितीच्या माध्यमातून संपर्क ठेवला जात आहे.
 
 
सध्या भारतातून १० प्रचारकांना परदेशात विश्व विभागाच्या कार्यासाठी पाठवण्यात आले असून म्यानमारमध्ये ७ स्थानिक प्रचारक कार्यरत आहेत. मलेशियात १ प्रचारक आहे.
 
 
हिंदू स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी आणि त्यांना विविध घडामोडींची माहिती व्हावी, या उद्देशाने संघाकडून अनेक नियतकालिके प्रकाशित केली जातात. दिल्लीतून प्रसिद्ध होणारे ‘संवाद’, युनायटेड किंग्डममधून ‘संघ संदेश’, हॉंगकॉंग येथून ‘संदेश भारती’, केनियातून ‘अमर भारती’ ही नियतकालिके नियमित प्रकाशित आणि वितरीत केली जातात. ‘तत्व’ आणि ‘बालगोकुलम’ ही नियतकालिके अमेरिकेतून प्रसिद्ध होतात. हिंदूंचे एकत्रीकरण, हिंदू समाजाचे विचार, तत्त्वप्रणाली, सकारात्मक बाबी, हिंदू मानस, आदी गोष्टींसाठी हिंदू स्वयंसेवक संघाकडून अनेक सार्वजनिक कार्यक्रम, उपक्रमाचे आयोजन केले जाते. हे कार्यक्रमहिंदू स्वयंसेवक संघ, विश्र्व हिंदू परिषद, बालगोकुलम, स्टुडंट कौन्सिल किंवा ‘सेवा इंटरनॅशनल’ संस्थेच्या माध्यमातून आयोजित केले जातात. या सर्व कार्यक्रमांना सर्व संलग्न-सहकारी संस्था सहकार्य करतात.
 
 
उत्सवांचा उत्साह
 
हिंदू स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून जगभरात सर्वत्र भारतीय आणि हिंदू सण साजरे केले जातात. मकरसंक्रांती, रक्षाबंधन, गणेशोत्सव, दुर्गापूजा, विजयादशमी, भारतीय स्वातंत्र्यदिन, योगदिन हे सण साजरे केले जातात. या सणांच्या वेळी येथे अनेक कार्यक्रमआणि उपक्रमआयोजित केले जातात. सणांच्या काळात येथील हिंदू समुदायातील नागरिक आपल्या कुटुंबासह एकत्र येतात. आप्तेष्ट, मित्र, स्वयंसेवक बंधुंच्या भेटीगाठी होतात आणि एकमेकांमध्ये सद्भाव वाढीस लागतो, बंध निर्माण होतात.
 
 
‘बालगोकुलम’
 
हिंदू स्वयंसेवक संघाद्वारे चालवला जाणारा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे बालगोकुलम. ‘गोकुलम’ म्हणजे गोकुळ ही कृष्णाची बालवयातील भूमी होती. येथेच बाळकृष्णाने अनेक लीला केल्या. सवंगड्यांसह खेळ खेळले. याच अनुषंगाने प्रत्येक लहान मूल हे कृष्णरूप समजून हिंदू स्वयंसेवक संघाकडून ’बालगोकुलम’ हा उपक्रमचालवला जात आहे. गोकुळ ही भक्तीचीही भूमी आहे. ’बालगोकुलम’चा उद्देश बालकांमधील भक्तिभावना वाढीस लागावी आणि त्याचा प्रसार त्यांच्यात व्हावा, हा आहे. ’बालगोकुलम’च्या माध्यमातून हिंदू धर्माची मूल्ये, नियम, सांस्कृतिकमुळे बालकांमध्ये रूजली जावी, हा विचार प्रामुख्याने समोर ठेवला जातो. यामध्ये अनेक उप्रकमांचा समावेश होतो. विविध खेळ, योगासने, कथाकथन, भजन, श्लोक, कला आणि प्रत्यक्ष कृती यांच्या माध्यमातून हिंदू धर्माची तत्त्वे बालकांमध्ये रुजवली जातात. ‘बालगोकुलम’ची रोजची शाखा दीड तासाची असते. ‘बालगोकुलम’मध्ये वयाच्या पाच वर्षांपुढील बालकांना प्रवेश दिला जातो. बालकांना येथे दोन वयोगटात विभागले जाते. वय आणि अन्य काही महत्त्वाच्या कारणांव्यतिरिक्त ’बालगोकुलम’मध्ये कोणालाही प्रवेश नाकारला जात नाही. ’बालगोकुलम’मध्ये इंग्रजी, संस्कृत, हिंदी आणि प्रादेशिक भाषा, मातृभाषा, वेश, आचार, संस्कृती यांचा शाखेच्या विस्तारासाठी, कार्यासाठी उपयोग केला जातो. ‘बालगोकुलम’मधील शिक्षकांसाठीदेखील साप्ताहिक अभ्यासवर्ग आयोजित केला जातो. त्याचबरोबर ‘बालगोकुलम’मधील शिक्षकांची बैठकदेखील आयोजित केली जाते. यामध्ये पुढील योजना, कार्यक्रमांची चर्चा, उपक्रमांची आखणी केली जाते. ’बालगोकुलम’मध्ये मुख्य शिक्षक, कार्यकर्ता, कार्यवाह, बालशिक्षक, शारीरिक प्रमुख आणि बौद्धिक प्रमुख अशी जबाबदारीनुसार विभागणी केलेली असते.
 

 
‘बालगोकुलम’चे गण
 
’बालगोकुलम’मध्ये ५ ते ८ वर्षे वयाच्या बालकांचा शिशू गण, ९ ते १२ वर्षे वयाच्या बालकांचा बाल गण, १२ ते १७ वर्षे वयाच्या मुलांचा किशोर गण आणि १८ वर्षांवरील मुलांचा तरुण गण असे गट असतात. ’बालगोकुलम’मध्ये शाखेव्यतिरिक्त सहलीचे आयोजन, वृद्धाश्रमांना भेटी देणे, समाजोपयोगी कामकरणे, बालक-पालक मेळावा, हिंदू सण साजरे करणे, बालगोकुलममासिक, हिंदू सांस्कृतिक शिबीर आणि अन्य अनेक उपक्रमराबवले जातात. ’बालगोकुलम’च्या माध्यमातून हिंदू तत्त्वज्ञानावर आधारित व्यक्तिमत्त्व विकासाचा उद्देश समोर ठेवला आहे. व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व हे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शारीरिक आणि भावनिक व्यवहारांवर ठरते. ’बालगोकुलम’मधून शारीरिक आणि बौद्धिक या दोन विभागांच्या माध्यमातून योजनाबद्धरितीने व्यक्तिमत्त्व विकसित केले जाते. ’बालगोकुलम’मधील प्रत्येक उपक्रम, कार्यक्रम, कृती ही वैयक्तिकरित्या नव्हे तर सामूहिकरित्या केली जाते, त्यामुळे मुलांमध्ये सांघिकरित्या कामकरण्याची, नेतृत्वाची भावना निर्माण होते.
 
 
’बालगोकुलम’च्या माध्यमातून संपूर्ण कुटुंबासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. कारण, कुटुंब हा समाजाचा प्राथमिक घटक असतो आणि तो व्यक्तींनी साकारला जातो. एका विचाराशी ठामअसलेली बांधिलकी कुटुंबात बदल घडवते आणि ते कुटुंब संपूर्ण त्यानंतर समाजात परिवर्तन घडवू शकते. ’बालगोकुलम’ हा हिंदू स्वयंसेवक संघाचा उपक्रमअसून संघाचा मुख्य उद्देश किंवा ध्येय हे समाजात शांतता आणि सद्भावाची निर्मिती करणे हे आहे आणि हे साध्य करण्यासाठी हिंदू धर्मातील नीतीमूल्ये आणि धर्माची मुळे ‘प्रॅक्टिस-प्रमोट-प्रीझर्व्ह’ या प्रकारे समाजात रुजवणे हा मार्ग संघाने अंगिकारला आहे.
 
 
हिंदू रिलिजियस सर्व्हिस सेंटर
 
हिंदू रिलिजियस सर्व्हिस सेंटर हे केनियातील हिंदूंचे सांस्कृतिक आणि धार्मिक संघटन आहे. हिंदू रिलिजियस सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून केनिया आणि तेथील सर्व समाजाच्या नागरिकांसाठी सेवा उपक्रमराबवले जातात. १९४७ साली केनियातील नैरोबी येथे सुरू करण्यात आलेल्या हिंदू स्वयंसेवक संघाची एक शाखा म्हणून हिंदू रिलिजियस सर्व्हिस सेंटर कार्यरत आहे. हिंदू स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून संघाच्या कार्यकर्त्यांना समाजाची सेवा करण्याची प्रेरणा मिळाली. ज्याचा उद्देश समाजाचे कल्याण व्हावे हा आहे. सदस्यांमध्ये शिस्त बाळगणे हे हिंदू स्वयंसेवक संघाचे सर्वात महत्त्वाचे शिक्षण आहे. सध्या हिंदू स्वयंसेवक संघामध्ये पाच वर्षांच्या बालकांपासून ते ९० वर्षांच्या ज्येष्ठ व्यक्तीपर्यंतचे कार्यकर्ते कार्यरत आहेत.
 
 
हिंदू रिलिजियस सर्व्हिस सेंटर हे सामाजिक-सांस्कृतिक आणि धार्मिक संघटन आहे. याचे नियंत्रण संचालक मंडळाकडून केले जाते. ज्यात विश्वस्त, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व खजिनदार आणि सहा समिती सदस्यांचा समावेश होतो. या माध्यमातून हिंदू रिलिजियस सर्व्हिस सेंटरच्या नियमित उपक्रमांवर देखरेख ठेवली जाते. हिंदू रिलिजियस सर्व्हिस सेंटरला विभिन्न समूहांकडून, वैयक्तिक दात्यांकडून आणि सेवा इंटरनॅशनल या संस्थेकडून आर्थिक मदत केली जाते. या देणगीतून हिंदू रिलिजियस सर्व्हिस सेंटर अनेक समाजोपयोगी कार्ये करते. हिंदू रिलिजियस सर्व्हिस सेंटरला दिलेली देणगी ही करमुक्त आहे. उपक्रम: मागील २५ वर्षांपासून हिंदू रिलिजियस सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून पुढील उपक्रमराबविण्यात आले.
 
 
जयपूर फूट प्रोजेक्ट :  दिव्यांग व्यक्तींना चाकाची खुर्ची आणि कृत्रिम अवयव-हात पायांचे वाटप करणे दुष्काळग्रस्तांना मदत :  हिंदू रिलिजियस सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून केनियाच्या कित्येक भागात मोफत अन्नपदार्थ वाटप केले जाते. दुष्काळग्रस्त भागात हा उपक्रमप्रामुख्याने राबवला जातो. शाळा : हिंदू रिलिजियस सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळांना पुस्तके, प्रयोगशाळेतील उपकरणे भेट दिली जातात. नर्सरी स्कूल : हिंदू रिलिजियस सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून विवेकानंद बालमंदिर शाळा चालवली जाते. यात कमी आर्थिक उत्पन्न गटातील लोकांच्या बालकांना प्रवेश देण्यात येतो. हिंदू रिलिजियस सर्व्हिस सेंटर आणि सेवा इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तीवेळी मदत केली जाते. अमेरिकेतील टेक्सास, ह्यूस्टन आदी ठिकाणी आलेल्या वादळांतही हिंदू स्वयंसेवक संघ, ‘सेवा इंटरनॅशनल’तर्फे मदतकार्य करण्यात आले. आपत्तीत अडकलेल्या नागरिकांना दिलासा देणे, अन्नाच्या पाकिटांचे वाटप करणे, पुनर्वसनासाठी सहकार्य करणे आदी कार्य करण्यात आले.
 
 
हिंदू सेविका समिती
 
हिंदू सेविका समिती ही स्वयंसेवी संघटना असून हे महिलांचे सांस्कृतिक संघटन आहे. हिंदू सेविका समितीची स्थापना १९७० साली केनियामध्ये करण्यात आली. आता केनियामध्ये हिंदू सेविका समितीच्या अनेक शाखा सुरू आहेत.
 

 
समितीचे ध्येय आणि उद्देश
हिंदू सेविका समिती आपल्या दैनंदिन कार्यातून मुली व महिलांना वैश्विक हिंदू मूल्यांचे शिक्षण देते. त्याचबरोबर त्यांच्यात शाखेच्या माध्यमातून आत्मविश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातात. सामाजिक चेतनेची भावना विकसित करणे आणि आधुनिक युगातील आव्हाने स्वीकारून विकासासाठी कठोर परिश्रम करणे आदी गोष्टी हिंदू सेविका समितीच्या माध्यमातून केल्या जातात. 
 

 
जगभरातील हिंदू समाज, बालकांपासून ज्येष्ठ व्यक्ती, तरुण, महिला आदी सर्वांना एकत्र करुन हिंदू स्वयंसेवक संघाची संघशक्ती विस्तारत आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात कार्य करणारा हिंदू स्वयंसेवक संघ यापुढेही सदैव वर्धिष्णुच राहणार आहे, हे त्याच्या आजपर्यंतच्या वाटचालीवरुन दिसते. हिंदू स्वयंसेवक संघाच्या आधारावर जगभरातील हिंदू एक होऊन विराट विश्र्वरुपात साकारणार आहे. 
 
 
- महेश पुराणिक