
गंम्मत वाटली असेल ना हे शीर्षक वाचून! पाककृती बद्दल काहीतरी, म्हणजे भाजीची कृती वगैरे असावी असाही संशय आला असेल. पण तसं काही नाही. प्रत्येकाची वांगी म्हणजे एकतर प्रत्येकाने कधी न कधी दुसऱ्याचं केलेलं वांगं किंवा कोणीतरी त्याचं केलेलं वांगं!
गंम्मत काय झाली की क्रिकेटचा हंगाम सुरु झाला आणि फेसबुक वर क्रिकेटचे जुने व्हिडीओ यायला लागले. त्यात तो खास व्हिडीओ पण होता, एका ओव्हर मध्ये युवीने मारलेल्या सहा षटकारांचा! त्यात मला इंग्लंड च्या broad या बॉलरचं वांगं सापडलं. म्हणजे flintoff बरोबर युवराज ची काहीतरी बाचाबाची झाली आणि फटके बसले broad ला! flintoff चं, म्हणजे वड्याच तेल निघालं broad वर म्हणजे वांग्यावर!
आपल्या नेहमीच्या आयुष्यात ही गोष्ट इतकी सहज घडते की आपल्या हे लक्षात ही येत नाही. पण जेंव्हा कोणीतरी आपल्यावर दुसऱ्याचा राग काढत तेंव्हा आपण चटकन म्हणतो की, वड्याच तेल वांग्यावर काढू नकोस. हा मानवी स्वभाव आहे आणि कोणी कितीही मोठा असो वा लहान त्यातून सुटलेला नाही. लहानपणी बाहेर काही बिनसलं असेल तर घरात हमखास आईवर राग काढला जातो, तिच्याशी अबोला धरून किंवा खाण पिण नाकारून! हीच मुलं मोठी झाली की आईच वांगं होतात मग लहानश्या कारणावरून पाठीत धपाटा सुद्धा बसू शकतो त्यांच्या. कारण आई असली तरी ती पण माणूसच ना!
मला एक गोष्ट आठवते एका चिडचिड्या माणसाची. office मधून घरी आला कि रोज बायकोला शिव्या घालायचा. तिने कितीही चांगलं वागायचा प्रयत्न केला तरी याचं तोंड वाकडंच! बायको बिचारी कंटाळून गेली रोजच्या या कटकटीला. एक दिवस चमत्कार झाला. तो माणूस पूर्ण बदलला. घरी आल्यावर बायको मुलांशी गप्पा मारायला लागला. फिरायला घेऊन जायला लागला. बायकोला वाटलं देवच पावला. पण मग तिला त्याचा संशय यायला लागला कारण तो नेहमीपेक्षा उशिरा घरी यायला लागला होता. तिने ठरवलं कि त्याचा पाठलाग करायचा. एके दिवशी office मधून तो निघाल्यावर ती त्याच्या पाठोपाठ लपत – छपत निघाली. तो घरी जायच्या ऐवजी एका टेकडीवर गेला. बायको अर्थातच पाठोपाठ होतीच पाळतीवर. वर एका आडोशाला जाऊन तो थांबला. त्याने आपल्या office bag मधून काहीतरी काढलं, समोर ठेवलं आणि जोर जोरात ओरडायला, शिव्या घालायला सुरुवात केली. पाच मिनिटे हा प्रकार झाल्यावर तो शांत झाला, पाण्याची बाटली तोंडाला लावली, घटाघटा पाणी प्यायला आणि ती वस्तू उचलून bag मध्ये ठेवताना बायकोला ती दिसली. ती वस्तू म्हणजे त्याच्या खडूस boss चा फोटो होता. बायकोच्या वांग्याची जागा boss च्या फोटोने घेतली होती.
college मध्ये असताना एकेदिवशी माझी मैत्रीण खूप अपसेट दिसली. नुकतीच माझ्याबरोबर संघटनेच्या कामाला तिने सुरुवात केली होती. मोठी बहिण होती तिला. खूप छान जमायचं दोघींचं. पण हल्ली काहीतरी बिनसलं होतं तिचं. माझ्या मैत्रिणीला विचारलं तेंव्हा म्हणाली,” हल्ली उखडलेलीच असते माझ्यावर “
“अगं, होतं असं कधी कधी. काहीतरी चुकलं असेल तुझं पण! “
असं म्हणाल्यावर जाम भडकली माझ्यावर. म्हणाली, “ केस विंचरून कंगवा वरच्या कप्प्याऐवजी खालच्या कप्प्यात ठेवला, हे काय कारण झालं का भांडणाचं? “
बघता बघता डोळेच भरून आले तिचे.
“ दोन दिवसांपूर्वी तिचा रुमाल सापडत नव्हता तर मला म्हणाली तूच हरवला असशील. अशी नव्हती पूर्वी ती! “
माझ्या एव्हाना लक्षात आलं होतं कि मूळ कारणाचा ‘ वडा ‘ वेगळाच आहे आणि ‘ वांगं ‘ वेगळ्या कारणाचं झालंय!
तिच्याशी बोलल्यावर लक्षात आलं कि ती पूर्वी आपल्या बहिणीबरोबर सगळीकडे जायची - यायची पण संघटनेच्या कामात आल्यावर तिला बहिणीला पूर्वीप्रमाणे वेळ देणं जमत नव्हतं. बिनसायचं खरं कारण हे होतं पण ते बोलता न आल्यामुळे छोट्या छोट्या कारणांवरून ती चिडचिड करायची. मोठ्या बहिणीला ठरवून वेळ द्यायला तिने सुरुवात केली आणि मग वड्याचं तेल वांग्यावर निघण कमी झालं.
या वड्याचं तेल वांग्यावर काढण्याची एक खासियत आहे. ती अशी की कोणतच क्षेत्र वर्ज्य नाही या वृत्तीला. क्रिकेट मधील एक उदाहरण तर वरती आलंच आहे. शिवाय सामन्याचा निकाल मनाजोगता नाही लागला की दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात टीव्ही फोडल्याच्या बातम्या हमखास असतात. एका अर्थी चांगलच आहे नाहीतर खेळाडूंची डोकी फुटली असती.
सासूबाईंना विरोध करता नाही आला कि नवरा सापडतोच तावडीत घरी आल्यावर. नवऱ्यावरचा राग मुलांवर काढण्याची पूर्वीची पद्धत आता जरा मागे पडली आहे पण भांडीकुंडी असतातच की हाताशी!
राजकारणाचं क्षेत्रं पण सुटलेलं नाही यातून. दुसऱ्या पक्षाच्या कार्यालयाची मोडतोड, पुढाऱ्यांवरचा राग काढण्यासाठी कार्यकर्त्यांना केलेली मारहाण ही या वृत्तीची विकृत रूपं आहेत.
नुकतीच समृद्धी महामार्गाला विरोधाची बातमी आली होती वर्तमानपत्रात. लवासाचे विशेषाधिकार काढून घेतल्याची बातमी आल्याआल्याच पाठोपाठ ही बातमी वाचून मनात आलं ‘वडा ‘ जितका मोठा ‘ वांगही ‘ तितकं मोठं शोधून काढलंय!
खरं म्हणजे वयाने लहान – मोठं, अधिकाराने लहान - मोठं कोणीच सुटत नाही या वृत्तीतून. कारण शेवटी सर्व माणसचं ना तुमच्या आमच्यासारखी! कधी आपला वडा तर कधी आपलं वांगं होतंच राहणार मधून मधून. पण कधीतरी वड्याचं तेल वड्यावर काढता येईल का याचा पण विचार करायला हवा. शेवटी वांग्याच्या सहनशक्तीला पण मर्यादा असतीलच ना? अति तिथे माती हे पण लक्षात ठेवायला हवे. काय? बरोबर ना?.
- शुभांगी पुरोहित