यवतमाळमध्ये अप्रमाणित व शिफारस नसलेले किटकनाशके पुरवणाऱ्या वितरकांवर फौजदारी गुन्हा

    दिनांक  10-Oct-2017


कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची बुलढाण्यात घोषणा

बुलडाणा : यवतमाळमध्ये झालेल्या विषबाधेच्या घटनेमुळे अनेक शेतकऱ्यांना विनाकारण आपला जीव गमवावा लागला असून शिफारस नसताना आणि गरज नसतानाही यवतमाळ सारख्या भागात घातक विषारी किटकनाशकांची विक्री करण्यात आली आहे. त्यामुळे किटकनाशक कंपनी आणि वितरकावर कायद्यानुसार लवकरच फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असून शासकीय यंत्रणेतील दोषींवर देखील कडक कारवाई करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केली आहे.


यवतमाळ येथील कीटकनाशकाच्या विषबाधेच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री फुंडकर आणि कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी काल सह्याद्री अतिथीगृह येथे बीटी बियाणे उत्पादक कंपन्या आणि कीटकनाशक कंपन्यांच्या प्रतिनिधी समवेत स्वतंत्र बैठक आयोजित केली होती. यामध्ये ते बोलत होते. विषबाधेच्या घटनेवरून त्यांनी कीटकनाशक बनवणाऱ्या कंपन्या आणि वितरकांची चांगलीच कानउघडणी केली.


कीटकनाशक उत्पादक कंपन्यांनी उत्पादीत केलेल्या कीटकनाशकामुळे आज मोठ्या प्रामाणात शेतकरी, शेतमजूर रुग्णालयात दाखल होत आहेत. परंतु याबाबत कसलीही माहिती घेण्याचीही गरज जिल्ह्यातील उत्पादक आणि विक्रेत्यांना भासली नाही ? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी केला. वितरकांना फक्त आपला माल विकला गेला पाहिजे. परंतु आपल्या किटकनाशकामुळे शेतकरी बांधवांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याची त्यांचे सांत्वन करण्याची आवश्यकता कंपनीला भासली नाही. फक्त व्यवसाय डोळ्यासमोर ठेवू नका समाजिक भान देखील जपले पाहिजे, अशा शब्दात त्यांनी उपस्थितांची कानउघडणी केली.


ज्या भागात शिफारस आणि आवश्यकता नसताना अप्रमाणित कीटकनाशकांची विक्री केली जाते ती तातडीने बंद झाली पाहिजे. वितरकाला आमिषे दाखवून चुकीची माहिती देऊन किटकनाशक विक्रीस भाग पाडले जाते. त्यामुळे शेतकऱ्याची हानी होते. कृषि सेवा केंद्र, कृषी विभागातील कर्मचारी यांच्या संगनमताने अप्रमाणित कीटकनाशकांची विक्री केली जात असेल तर नुसता दंडात्मक नव्हे तर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे ते म्हणाले. तसेच जिल्ह्यांमध्ये झालेल्या कीटकनाशकांच्या विक्रीची देखील चौकशी करण्यात येईल असे त्यांनी म्हणाले.