किटकनाशकांची फवारणी करताना संरक्षक साहित्याचा वापर करावा-पांडुरंग फुंडकर

    दिनांक  10-Oct-2017

 

कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचे आवाहन

बुलडाणा: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कापूस व सोयाबीन पिकावर फवारणी करताना शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर कृषि विभागामार्फत फवारणी करताना घ्यावयाच्या खबरदारीच्या मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. विषबाधेच्या घटना घडू नयेत, यासाठी किटकनाशकांची फवारणी करतेवेळी संरक्षक साहित्य असलेल्या हातमोजे, चष्मा, मास्क, टोपी आदी वस्तूंचा वापर करावा, असे आवाहन राज्याचे कृषि व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे.


शेतमजूर किंवा शेतकरी बांधवांनी फवारणी करताना संरक्षक किटचा वापर करावा, प्रतिबंधात्मक उपाययोजना करून विषबाधा झाल्यास बाधीत व्यक्तीवर तातडीने प्रथमोपचार करावे. तसेच त्वरित शासकीय यंत्रणेला कळविण्यात यावे. फवारणी करताना शेतमुजरांना संरक्षक किट पुरवून त्यांना आवश्यक सूचना देण्याची जबाबदारी शेतमालकाची आहे.

 

फवारणी करतेवेळी शेतमालकाने प्रथमोपचाराचे साहित्य शेतावर उपलब्ध करून द्यावे. पिकावर शक्यतो सकाळच्या सत्रात वारे नसतांना करावी. उष्ण व दमट, प्रखर उन्हामध्ये किटकनाशकाशी संपर्क आल्यास शरीरात विष भिनवण्याची प्रक्रिया वेगाने होते. वारे वाहणाऱ्या दिशेने फवारणी करावी. फवारणी करतेवेळी जवळपास अन्य संबधित व्यक्ती अथवा जनावरे असणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, असेही आवाहन पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे.