व्यवस्थापन आणि नियोजनाचा विलक्षण अनुभव

    दिनांक  10-Oct-2017   
 
 
 
 
''... दुसर्‍या प्रकारात एखाद्या लक्ष्यापासून दूर पळणार्‍या गर्दीला पॅनिक अशी संज्ञा आहे. १९८१ मध्ये कुतुबमिनार परिसरात अचानक वीज गेली. वीज गेल्यावर झालेल्या धावपळीत एकूण ४५ लोक प्राणाला मुकले. हे एक पॅनिकचे उदाहरण आहे. वीज गेल्यावर झालेला अंधार, गर्दीत असणारी मुलांची जास्त संख्या आणि कुतुबमिनार पडतो आहे, अशी उठलेली अफवा. यामुळे लोक पॅनिक झाले आणि दरवाजाकडे धावत सुटलेल्या गर्दीत ४५ लोक मरण पावले. त्यात २७ लहान मुलं होती.
 
 
या सगळ्याचा तथ्यांश असा आहे की, गर्दीची आकलनशक्ती वैयक्तिक आकलनशक्तीपेक्षा कमी असते. गर्दीचा नैसर्गिक तोल किंवा हार्मनी नाहिशी होण्यासाठी मानसिक दौर्बल्याला आव्हान देणारी छोटीशी घटना पुरेशी असते. निर्माण झालेल्या परिस्थितीला उत्तर देण्याची सामूहिक सारासार बुद्धी गर्दीकडे नसते. अशा प्रकारच्या आपत्तीच्या वेळी सामाजिक बंधने ताबडतोब सुटतात आणि मी आणि माझे अस्तित्व याचाच आधी विचार मनात डोकावतो. परिणामी काही क्षणात 'आभाळ कोसळले पळा पळा'ची साथ पसरते...''
 
 
हा परिच्छेद आहे, भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या 'कुशावर्ताचा कोतवाल - एक पर्वणी व्यवस्थापनाची' या पुस्तकातील. नुकतीच मुंबईत एलफिन्सटन-परळ रेल्वे स्थानक पुलावर अफवा उठल्यानंतर चेंगराचेंगरीची घटना घडली. यात २३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. या पार्श्वभूमीवर डॉ. सिंगल यांनी २००३ साली त्र्यंबकेश्वरला झालेल्या कुंभमेळ्यातील व्यवस्थापनाची नोंद केली आहे, ती महत्त्वाची ठरावी.
 
 
२००३ सालच्या त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यात डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी मुख्य कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षा अधिकारी म्हणून जबाबदारी निभावताना कौतुकास्पद अशी कामगिरी केली. यावेळी काम करताना आलेले अनुभव सरकारी कर्तव्य पार पाडण्यापुरतेच मर्यादित न राहता समाजशास्त्र, अर्थशास्त्र, गर्दीचे मानसशास्त्र - या विषयांचे प्रत्यक्ष प्रमाण देणारे ठरले, हा अनुभव सिंगल यांनी या पुस्तकात मांडला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने दर बारा वर्षांनी एकाच ठिकाणी, कोणतेही अधिकृत निमंत्रण नसताना लाखोंच्या संख्येने येणार्‍या श्रद्धाळूंंच्या गर्दीचे नियोजन हा एक मॅनेजमेंट एक्सपिअरन्स म्हणून लेखकाच्या मनात कायमचा कोरला गेला. या अनुभवांचा उपयोग संदर्भ म्हणून व्हावा यासाठी डॉ. सिंगल यांनी हे पुस्तक २०१५ साली लिहिले. कुंभमेळा २००३ साली झाला, परंतु हे पुस्तक प्रत्यक्षात घटना घडून गेल्यानंतर १२ वर्षांनी लिहिल्याचे जाणवत नाही. पुस्तकात दिलेल्या घटनांचे, परिस्थितीचे, नियोजनाचे तपशील नेमके असल्याचे पुस्तक वाचताना स्पष्ट होते.
 
 
कुंभमेळ्याची नोंद गिनीज बुकमध्ये होत असली तरी एका छोट्याशा परिसरात एक कोटीपेक्षा अधिक लोक जमतात. एका धार्मिक विक्रमाचा भाग सोडला तर यामुळे त्या ठिकाणच्या कायदा सुव्यवस्थेवर किती ताण येत असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. आलेल्या भाविकांच्या समुद्र भरतीला महिनाभर सुरक्षितरित्या सामावून घेऊन कायदा सुव्यवस्था राबवणे, भाविकांची काळजी घेत, साथीच्या रोगांना अटकाव करत, चेंगराचेंगरी होणार नाही याची दक्षता घेत मुख्य म्हणजे आलेल्या साधू-महंतांना सांभाळणे हे वाटते तितके सोपे काम नाही, याची जाणीव पुस्तक वाचताना सतत होत राहते.
 
 
एकूण २२ प्रकरणांत लेखकाने कुंभमेळ्यासंबंधीचे आपले अनुभव शब्दबद्ध केले आहेत. छोटी, आटोपशीर दीड-दोन पानांची प्रकरणे असल्याने ती समजण्यास सोपी वाटतात. कुंभमेळा हा विषय तसा पाहिला तर फार मोठा, पण लेखकाने आपल्या छोटेखानी पुस्तकात हा विषय व्यवस्थित हाताळला आहे. नियोजनाच्या दृष्टीने हे पुस्तक महत्त्वाचे असल्याने ते छोटेखानी केले असावे. गर्दीचे व्यवस्थापन, धार्मिक ठिकाणची व्यवस्था कशी आखावी, त्याचे नियंत्रण कसे करावे, कुंभमेळ्याच्या प्रशासकीय व्यवस्थापनासाठी शासकीय व्यवस्थेला करावे लागणारे श्रम यासंबंधीचा हा एक उत्कृष्ट लेखाजोखा ठरावा.
 
 
कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीपासून, नियोजन, व्यवस्थापनाचे मॉडेल, त्र्यंबकेश्वरातील नागरिकांचा, त्या क्षेत्राचा स्वभाव, आलेल्या अडचणी, विविध आखाड्यांची वर्तणूक, सुरक्षा बंदोबस्त, जबाबदारी या सगळ्यातून अपघातांची शून्यवतता, गर्दीचे नियंत्रण, साधू-संत-महंत आणि माध्यमे, व्हीआयपी आदी अनेक मुद्द्यांचा या पुस्तकात समावेश केला आहे, जे उपयुक्त आहे.
 
 
परिशिष्ट म्हणून दिलेल्या प्रकरणात कुंभमेळा, त्याची सुरुवात, आद्य शंकराचार्य, देशाच्या चार दिशांना त्यांनी स्थापन केलेली पीठे, त्यांच्या परंपरा यांचीही माहिती दिली आहे. भाबड्या, भक्तिभावनेने उचंबळलेल्या पण अर्धसाक्षर भाविकांसह हौशा, नवशा, गवशा आणि चोराचिलटांच्या गर्दीचे व्यवस्थापन ही बिकट गोष्ट. जोडीला विविध आखाड्यांच्या संत-महंतांची अहंमन्यता, कुरघोडीची स्पर्धा, मानापमान, जोडीला मंत्री, उच्चाधिकारी नोकरशहा, उद्योगपती, सिनेकलावंत यांच्या अपेक्षांचे दबावतंत्र आणि प्रसिद्धीमाध्यमांच्या मथळ्याच्या स्पर्धेतून निर्माण होणारी अवघड परिस्थिती अशा अनेक संकटांचा सामना करीत कुंभमेळ्याची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळलेल्या डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या या अनुभवाची ही शिदोरी थरारक तर आहेच, पण खूप काही शिकवून जाणारे विलक्षण अनुभव देणारीही आहे.
 
 
सरतेशेवटी कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनावेळी लेखकाच्या घरातील परिस्थिती काय होती, तेथेच जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेली त्यांची पत्नी, येणार्‍या पाहुण्यारावळ्यांची व्यवस्था आदी गोष्टीही पुस्तकात सांगितल्या आहेत. कुंभमेळ्यातील कार्याला इतकी वर्षे लोटली तरी त्र्यंबकेश्वराची आठवण झाली नाही, असा एकही दिवस जात नसल्याचेही लेखकाने नमूद केले आहे. पुस्तकातील प्रत्येक प्रकरणात रेखाचित्रांचा उत्तम प्रकारे वापर केला असून कागद, मुखपृष्ठ आणि मलपृष्ठांचा दर्जाही उत्तमआहे. प्रशासकीय अधिकार्‍यांची अशावेळी होणारी अवस्था, जबाबदारी, नियोजन, व्यवस्थापन आदी गोष्टींची माहिती घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे.
 
 
 
पुस्तकाचे नाव - कुशावर्ताचा कोतवाल - एक पर्वणी व्यवस्थापनाची
 
लेखक - डॉ. रवींद्र कुमार सिंगल
 
शब्दांकन - रामदास बिवलकर
 
संपादन - पराग पाटील
 
प्रकाशक - वॉव मीडिया
 
किंमत - १५०
 
पृष्ठे - ७२
 
 
- महेश पुराणिक