#ओवी Live - प्रेमाचे देणे

    दिनांक  29-Jan-2017   


परवा अनसूया मामीची आठवण आली. तशी आठवण तर बऱ्याच वेळा येते, पण परवा तिला फोन केला. किती आनंद झाला तिला! माझा आवाज ऐकून तिचा गळा दाटून आला. घोगऱ्या आवाजात बोलली माझ्याशी.

फोन ठेवला आणि माझेच डोळे भरून आले. लहानपणच्या आठवणींनी मनात गर्दी केली. दर सुट्टीत, आम्ही सगळे आजीच्या गावी जायचो. आईचा मावस भाऊ आजीच्या शेजारी राहायचा. दिनू मामा आणि अनु मामी, माझे खूप लाड करायचे. अनु मामी माझ्यासाठी खाऊ करून ठेवायची, गोष्टी सांगायची, कधीतरी मेंदी काढून द्यायची, वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्या घालून द्यायची. आणि प्रत्येक सुट्टीत एक छानसा फ्रॉक घेऊन द्यायची. फार कौतुक तिला माझे.

हे सगळ ७वी – ८वी पर्यंत. नंतर शाळा – कॉलेज मुळे २-३ दिवसांपेक्षा जास्त जाणे झाले नाही. पुढे नोकरी, लग्न आणि संसारात तर वर्ष - वर्ष भेट झाली नाही. मधल्या काळात अनु मामीचा मुलगा US ला शिफ्ट झाला. आणि चार वर्षामागे मामा गेला. तेंव्हापासून अनु मामी एकटीच राहते. अधून मधून मुलाकडे जाते पण तिला तिकडे करमत नाही.

या आठवांनी माझे डोळे पाणावले, ते पश्चातापाच्या अश्रूंनी. काय हवे असते अनु मामीला तर एक विचारपूस करणारा फोन. फक्त चार प्रेमाचे शब्द! आणि ‘कामाच्या व्यापात’ मला महिन्यातून साधा एक फोन सुद्धा करता येत नाही!

 

कृष्ण म्हणतो - मला प्रेमाने अर्पण केलेले फळ, फुल, पान किंवा पाणी फार आवडते. भक्ताने प्रेमाने वाहिलेले फुल वास्तविक पाहता मी हुंगावे, पण त्याच्या प्रेमळ अर्पणाने, अत्यानंदित होऊन, ते फुल मी मुखिची घालितो! माझ्यासाठी कोणी वैकुंठाहून मोठे सुंदर मंदिर बांधले किंवा कौस्तुभाहून मौल्यवान मणी दिला तर जो आनंद होईल त्याहून अधिक आनंद मला या प्रेमाच्या नित्य अर्पणातून मिळतो.

फळ, फुल, पान घ्यायला विष्णू चतुर्भुज होऊन पुढे उभा राहत नाही! तो आपल्या आजूबाजूला असणारा दरिद्री नारायण आहे. कोणा भुकेल्याला अन्न देणे, किंवा कोणा तहानलेल्या पक्ष्याला पाणी देणे किंवा घरच्या एकाकी वृद्धाशी नित्य संवाद साधणे हीच ईश्वराची आराधना आहे.