‘गोंय, गोंयकार आणि मनोहरबाब पर्रीकर’

    दिनांक  29-Jan-2017   


ठिकाण पणजी, गोवा. वेळ दुपारचे बारा-साडेबारा. पणजीतील मार्केट भागातील एका संस्थेच्या सभागृहामध्ये भारतीय जनता पक्षाची युवक आघाडी अर्थात भारतीय जनता युवा मोर्चाचा मेळावा. प्रमुख वक्ते (अर्थातच) केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर. गोव्याच्या लहानशा आकाराला व लोकसंख्येला साजेशी सात-आठशेची उपस्थिती. पैकी ९० टक्क्याहून अधिक महाविद्यालयीन युवक-युवती. निवडणुका तोंडावर आलेल्या असल्याने वातावरणात निवडणुकीचा माहोल जरूर पण हिंदी सिनेमाप्रमाणे सगळीकडे झेंडे, पोस्टर्स, भगवी उपरणी घेतलेले गॉगलधारी कार्यकर्ते, गुलाल इत्यादी काहीच नाही. सुरुवातीला युवा मोर्चाचा कोणी शहरप्रमुख किंवा विद्यापीठ प्रमुख आदींची भाषणे. मग पणजी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचे भाषण. एवढ्यात संरक्षणमंत्री पर्रीकरांचे सभेत आगमन होते. उमेदवारही मग भाषण आटोपते घेतो. पर्रीकर भाषणाला उभे राहतात आणि सभागृह टाळ्या आणि घोषणांनी दणाणते. पर्रीकरांचे भाषण संपल्यावर ते काही वेळ उपस्थित युवकांसोबत संवादासाठी ठेवतात. श्रोत्यांमध्ये माईक फिरवला जातो. आणि याचदरम्यान जेमतेम अकरावी-बारावीत असणारी एखादी विद्यार्थिनी किंवा कुठल्याशा खेळात जिल्हास्तरावर खेळणारा तेवढ्याच वयाचा विद्यार्थी उठून ‘क्रीडास्पर्धांना जावे लागत असल्याने कॉलेजच्या अटेंडन्समधून सवलत मिळावी’ किंवा ‘कॉलेज कॅन्टीनमध्ये ई-पेमेंट करता येण्यासाठी कॉलेजमध्ये मोबाईल नेता यावा’ आदी विविध मागण्या करतात. ‘देशाचे संरक्षणमंत्री’ मनोहर पर्रीकर या सर्व मागण्या शांतपणे ऐकून घेतात, नोंदवून घेतात. सभा संपते, कॉलेज विद्यार्थ्यांची आपल्यासोबत सेल्फी घेण्याची मागणीही पूर्ण करत पर्रीकर आणखी ५-१० मिनिटे थांबतात. आणि मग एका साध्या गाडीतून कोणत्याही सुरक्षारक्षक किंवा अन्य ताफ्याशिवाय मोजक्या २-३ कार्यकर्त्यांसह पर्रीकर पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना होतात...

गोवा विधानसभा निवडणूक २०१७ च्या मतदानासाठी काही दिवस शिल्लक राहिले असता गेल्या महिन्याभरापासून गोव्यात सहजपणे आढळून येणारे हे चित्र. आता याचा नेमका अर्थ कसा लावायचा? संपूर्ण देशाचा संरक्षणमंत्री अकरावी-बारावीतल्या मुलांच्या कॉलेजच्या समस्याही ऐकून घेत बसतो असा आक्षेपही काहीजण घेऊ शकतात. अन्य व्यवस्था असताना या समस्या मांडण्यासाठी गोव्यातील युवकांना थेट पर्रीकारांकडे का जावेसे वाटते? असेही काहीजण विचारू शकतात. पण सरतेशेवटी यातून काही गोष्टी अतिशय स्पष्टपणे आपल्याला दिसून येतात ज्यातून गोव्याच्या गेल्या काही वर्षांतील सामाजिक-राजकीय परिस्थितीचा आणि या निवडणुकीचा अंदाज लावता येतो. एक म्हणजे राजकारणाशी काहीही संबंध नसलेल्या त्या महाविद्यालयीन युवकांना आपल्या कॉलेज प्रशासनापेक्षा ‘मनोहर पर्रीकर’ ही व्यक्ती (कदाचित, ‘ही व्यक्तीच’!) आपल्या समस्या सोडवू शकेल असा विश्वास वाटतो. कोणतीही बाब निर्धास्तपणे व मोकळेपणे आपण या व्यक्तीशी बोलू शकू अशी खात्री वाटते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोव्याच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या समस्या सोडवण्याची क्षमता असणारा ‘मनोहर पर्रीकर’ हाच आपला नेता आहे हे गोवेकरांनी मनोमन स्वीकारले आहे.

या निवडणुकीचे स्वरूप ‘पर्रीकर व्हर्सेस ऑल’ असे का तर ते यासाठी. साधारण ११९५-९८ पासून मनोहर पर्रीकर हे गोव्यातील सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांच्याभोवती लोकप्रियतेचे हे वलय नेमके कधी निर्माण झाले हे सांगता येणार नाही पण ते गोव्यात आणि गोव्याबाहेरही संपूर्ण देशात स्पष्टपणे दिसून आले ते २०१२ च्या निवडणुकीत. पर्रीकरांच्या नेतृत्वाखालील भाजपने राजकीय अस्थिरतेचा शाप असणाऱ्या गोव्यात स्पष्ट बहुमतातील सरकार आणून चमत्कार घडवून दाखवला. तेव्हापासून केवळ ‘गोवा भाजप’चेच नाही तर ‘गोव्याचे नेते’ अशी पर्रीकरांची ओळख बनली जी दिवसेंदिवस अधिकच वृद्धिंगत होते आहे. एका राज्याचा मुख्यमंत्री किंवा राज्यातील पक्षाचा नेता इथपासून थेट ‘राज्याचा नेता’ हा प्रवास शब्दांमध्ये सोपा वाटत असला तरी प्रत्यक्षात फार जास्त अवघड असतो. आपल्या महाराष्ट्रात स्वतःला ‘महाराष्ट्राचे नेते’ म्हणवून घेणाऱ्या अनेक जुन्या, ‘जाणत्यां’ची २०१४ च्या केवळ एका पराभवामुळे झालेली अवस्था पाहिल्यास आपल्या हे सहज लक्षात येईल. त्यानंतर पर्रीकर केंद्रात गेले, थेट संरक्षणमंत्री झाले. साध्या-भोळ्या ‘गोंयकारां’पासून बरेच दूर, दिल्लीच्या साचेबद्ध राजकारणात प्रवेश करणाऱ्या पर्रीकरांची गोव्यावरील पकड मात्र आजही तितकीच कायम आहे. आणि तिचाच प्रत्यय आज या निवडणुकीतून पुन्हा एकदा येतो आहे.

मनोहर पर्रीकारांचा व्यक्तिगत राहणीतील साधेपणा, कोणत्याही डामडौल व सुरक्षाव्यवस्थेशिवाय गर्दीत घुसणे, तिला आपलेसे करणे आदी वैशिष्ट्ये आता साऱ्या देशाला माहित झाली आहेत. मात्र याच साधेपणाबरोबर पक्षीय राजकारणात आवश्यक खमकेपणा, घेतलेले निर्णय कठोरपणे राबवून घेण्याची क्षमता, गोव्यातील प्रत्येक गाव आणि वाडीचा, तिथल्या सामाजिक-राजकीय परिस्थितीचा सखोल अभ्यास, बूथ पातळीवरील कार्यकर्त्यापर्यंत जनसंपर्क आणि दिवसाचे अठरा-वीस तास अखंडपणे काम करण्याची क्षमता ही पर्रीकरांच्या व्यक्तिमत्वातील आणि कार्यशैलीतील वैशिष्ट्ये आहेत. यांच्या जोरावर पर्रीकरांनी गोव्यात ही अशी केवळ अफाट म्हणावी एवढी लोकप्रियता मिळवली आहे. पर्रीकर केंद्रात गेल्यानंतर गोव्यात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. मात्र, लक्ष्मीकांत पार्सेकरांनीही दोन वर्षे सक्षमपणे कारभार चालवला. मात्र, पर्रीकर नसल्याने प्रचारात ‘जान’ येत नव्हती. आता स्वतः पक्षाध्यक्ष अमित शहा किंवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘गोव्याचा पुढचा मुख्यमंत्री कदाचित दिल्लीतून येऊ शकतो’ अशाप्रकारचे वक्तव्य करत धमाल उडवून दिली. कार्यकर्ते ‘चार्ज’ होऊन झाडून कामाला लागले. आता हे राजकीय चातुर्य का अपरिहार्यता हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईलच. मात्र, दुसरीकडे ‘पर्रीकर दिल्लीतूनही गोव्याचा कारभार करतात’ असे पक्षाध्यक्ष शहांचे वक्तव्य हे बरेच काही सांगून जाते. पर्रीकर पुन्हा गोव्यात येण्याच्या शक्यतांवर पंतप्रधान मोदींनी गोव्यात येऊन ‘गोव्याने देशाला एक सक्षम संरक्षणमंत्री दिला’ असे सांगत काही अप्रत्यक्ष संकेत दिले असले तरी ते फारसे कोणाच्या ध्यानात आलेले नाहीत. दुसरीकडे पर्रीकर गोव्यात येण्याच्या चर्चांनी भाजपने आज प्रचारात जबरदस्त अशी (कदाचित पुढचे निकाल आधीच स्पष्ट करणारी?) आघाडी घेतली आहे. ‘पर्रीकर इज इक्वल टू गोवा अॅण्ड गोवा इज इक्वल टू पर्रीकर’ असे का म्हटले जाते याचे कारण हे असे आहे.

निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असता आज मनोहर पर्रीकर स्वतः गोव्यात तळ ठोकून आहेत. मोठ्या सभांपासून ते महिला, युवक मेळावे, कोपरा बैठका, रॅली आदींमधून लोकांशी संवाद साधत आहेत. आणि अर्थातच त्यांना गोवेकरांचा जोरदार प्रतिसाद मिळत असून याचा फायदा भाजपला होतो आहे. अर्थात, एकीकडे पर्रीकरांची अशी ही अफाट लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच जात असताना तिला सुरुंग लावण्याचा प्रयत्नही झाला. जेव्हा कोणतीही सकारात्मकता वाढत असते तेव्हा तिला छेद देण्याचा प्रयत्न करण्यासाठी नकारात्मक गोष्टीही जन्म घेत असतात. संघ परिवारातील ज्येष्ठ कार्यकर्ते, पर्रीकरांचे इतक्या वर्षांचे जुने सहकारी प्रा. सुभाष वेलिंगकर आज पर्रीकरांच्या विरोधात वेलिंगकर चक्क ढवळीकरांच्या मगोपशी हातमिळवणी करून उभे ठाकले आहेत. गोवा सुरक्षा मंचाचे निवडणूक धोरण, ते लढवत असलेल्या अवघ्या ५ जागा आणि मगोपसारख्या पक्षामागे त्यांनी लावलेली आपली सगळी उर्जा पाहता या विरोधामध्येही अशीच नकारात्मक छटा आपल्याला दिसून येते. ‘गोसुमं’ला स्वतःला सत्ता मिळवायची नसून दुसऱ्याची सत्ता घालवायची आहे आणि ती सत्ता बजबजपुरी माजवून राज्याचे वाटोळे करू शकण्याची कमल क्षमता असणाऱ्या मगोपच्या हाती द्यायची आहे. या साऱ्यातून आणि शिवाय गेल्या काही महिन्यांत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या वक्तव्यांतून यातील व्यक्तिगत महत्वाकांक्षा व पर्रीकरांबाबतचा व्यक्तीद्वेष स्पष्ट होतो. गोवेकरांनाही आता या बाबी लक्षात येऊ लागल्या असून लोक जाहीरपणे प्रश्न विचारू लागले आहेत. त्यामुळे हे वादळ हे चहाच्या पेल्यातील वादळ ठरणार असे स्पष्ट झाले असले तरी गोवा राज्यात इतके मजबूत काम उभे करणाऱ्या अशा ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या एका जबरदस्त फळीतील एक व्यक्ती अशाप्रकारे बाहेर पडावी ही बाब अनेकांसाठी दुःखदायक ठरते.

मनोहर पर्रीकरांनी स्वतःवरील व्यक्तिगत टीकेला आजवर एका शब्दानेही प्रतिक्रिया न देता कमालीचा संयम दाखवला. शिवाय पर्रीकरांनी जोडलेले अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत. पर्रीकरांना ‘मनोहरबाब’ किंवा ‘मनोहरभाई’ अशी एकेरीत हाक मारणारी, त्यांच्याशी व्यक्तिगत मैत्री असणारी अनेक कार्यकर्त्यांची फळी आज गोवा भाजपच्या पक्षसंघटनेत मजबुतपणे उभी आहे. त्यामुळे या साऱ्यातून पर्रीकरांचे नेतृत्व गोंयकारांनी स्वीकारले असल्याचेच पुन्हा एकदा स्पष्ट होते. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्यानंतर पूर्ण राज्यभरात एवढी अफाट लोकप्रियता (आणि मान्यता) लाभलेला आणि पेडण्यापासून काणकोणपर्यंत कोणत्याही मतदारसंघातून निवडून येण्याची क्षमता असलेला नेता गोवेकर प्रथमच अनुभवत आहेत. आता निवडणुकीला काहीच दिवस उरले असल्याने साधेभोळे, सुशेगाद परंतु आपल्या मनाचा ठावठिकाणा न लागू देणारे ‘गोंयकार’ मतपेटीतून कसा कौल देतात हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे..


- निमेश वहाळकर