स्थिर भाजप सरकार आणि दुभंगलेले विरोधक

    दिनांक  27-Jan-2017   


महाराष्ट्रातील एखाद्या जिल्ह्याएवढ्या क्षेत्रफळाचा आणि पुण्यासारख्या शहराहून कमी लोकसंख्येचा गोवा जितका जास्त लहानसा वाटतो तितकाच जास्त गुंतागुंतीचा व समजून घेण्यास अवघड आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी ‘अजीब है ये गोवा के लोग !’ असे काढलेले उद्गार प्रसिद्ध आहेत. पक्क्या ‘गोयंकारा’च्या मनाचा ठावठिकाणा शोधणे भल्याभल्यांनाही अवघड जाते. कारण इथला कोणताच विषय सरळमार्गी नसतो. एकात एक गुंतलेला असतो. गोव्याच्या याच मूळ स्वभावाचे प्रतिबिंब अर्थातच गोव्याच्या राजकारणावरही पडलेले आहे. गोव्याचा राजकीय इतिहास पाहिल्यास गोव्याचे राजकारण हे कायमच अस्थिर राहिल्याचे दिसून येईल. भाऊसाहेब बांदोडकर, शशिकला काकोडकर यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा कार्यकाळ, पुढे प्रतापसिंह राणेंच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसची एक टर्म वगळता कोणी सलग पाच वर्षांचे स्थिर सरकार देऊ शकलेले नाही व कोणी मुख्यमंत्री पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू  शकलेले नाहीत. ९० च्या दशकात तर तब्बल १३ मुख्यमंत्र्यांपैकी केवळ ३ मुख्यमंत्री एक वर्षाचा किंवा अधिक कार्यकाळ पूर्ण करू शकले बाकींनी त्याआधीच गाशा गुंडाळला. गोव्यात ५ वर्षांचे स्थिर सरकार यायला २००७ उजाडले. कॉंग्रेसच्या दिगंबर कामतांनी मगोप व अन्य पक्ष, अपक्षांची जुळवाजुळव करून सरकार स्थापन केले व ५ वर्षे चालवले खरे पण या सरकारच्या कारभाराला लोक इतके विटले की २०१२ पर्यंत गोव्यात कॉंग्रेसविरोधाची लाटच तयार झाली व आपल्या निम्म्या जागा गमावत दिगंबर कामत सरकार खाली कोसळले.

२०१२ मध्ये मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली स्पष्ट बहुमताने निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने खऱ्या अर्थाने स्थिर सरकार दिले. हे सरकार निवडून येण्यामागची कारणमीमांसा आपण लेखमालिकेच्या मागील भागांत केलीच. मनोहर पर्रीकरांची व्यक्तिगत प्रतिमा आणि नेतृत्व १९९८-२००० नंतर लोकप्रिय होऊ लागले होतेच. शिवाय भाजपने १९९० ते २०१० या वीसेक वर्षांच्या काळात अतिशय मेहनतीने संपूर्ण राज्यभरात आपले संघटन निर्माण केले. त्याची फळे अर्थातच २०१२ मध्ये त्यांना मिळाली. अडीच-पावणेतीन वर्षे मुख्यमंत्रीपदी राहिल्यानंतर नोव्हेंबर, २०१४ मध्ये पर्रीकर थेट संरक्षणमंत्री म्हणून केंद्रात गेले. यानंतर गोव्यात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाल्याने राज्याचे राजकारण अस्थिर होईल, भाजपअंतर्गत गोंधळ उडेल, माध्यमप्रश्नावर पक्षात दुफळी माजेल आदी बऱ्याच शक्यता वर्तवल्या गेल्या. मात्र लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही सक्षमपणे उर्वरित २ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. शिवाय पर्रीकर जरी दिल्लीत गेले असले तरी गोव्यावर लक्ष ठेऊन होतेच. शिवाय पर्रीकर हेच आमचे नेते हे गोवा भाजपने ठरवूनच टाकले असल्याने नेतृत्वाची पोकळी अशी निर्माण झालेली दिसलीच नाही. कारण केंद्रात मनोहर पर्रीकर आणि मनोहर पर्रीकर हेच गोव्याचे नेते राहिले.

२०१२ च्या निवडणुकीत भाजपकडे मनोहर पर्रीकरांचे अफाट लोकप्रिय नेतृत्व, गाव-बूथ पातळीपर्यंत सशक्त संघटन आणि उमेदवाराच्या वैयक्तिक प्रतिमा आणि जनसंपर्कातून मिळणारी मते अशा तिहेरी आघाड्यांवर चांगली कामगिरी केल्याने सत्ता आली. २०१२ नंतर भाजपच्या सरकारचे काम ही आणखी एक नवी गोष्ट समाविष्ट झाल्याने या चार चाकांवर भाजपची गाडी सुसाट धावू लागली. याशिवाय सरकारने राबवलेल्या अनेक योजना, महिला (विशेषतः गृहिणी), युवक, विद्यार्थी, नवउद्योजक यांच्यासाठी देऊ केलेल्या विविध सवलती व प्रोत्साहने यांमुळे युवक, महिला आदी घटकांमधील भाजपचा आधार जबरदस्त वाढला. कचरा प्रकल्प, पणजीचा तिसरा पूल यासारख्या अनेक पायाभूत सुविधा उभ्या केल्याने त्याचा स्पष्ट जाणवून येण्याइतपत प्रभाव निर्माण झाला. आज पर्वरीतून खाडी ओलांडून पणजी शहरात जात असताना वेगाने उभा राहत असलेला तिसरा भव्य पूल पाहून आपल्याला हे जाणवू शकते. या पुलाचे महत्व केवळ पणजीपुरतेच नसून उत्तर-दक्षिण संपूर्ण गोवा व मुंबई-कोकणापासून खाली मंगलोर-केरळपर्यंत आहे. त्यामुळे ५ वर्षांत भाजपच्या स्थिर सरकारने बरेच चांगले काम करून याही बाबतीत आपला प्रभाव निर्माण केला. लोकप्रिय आणि वलयांकित नेता, रुजलेले पक्षसंघटन, आपले कार्यक्षेत्र बांधून ठेवणारे स्थानिक नेते, आणि राज्य सरकारची कामगिरी या चार मुद्द्यांना घेऊन २०१७ च्या निवडणुकीत मते मागण्यासाठी भाजप लोकांपुढे आत्मविश्वासाने उभा राहू शकला.


भाजप असा वाढत जात असताना दुसरीकडे विरोधी पक्ष मात्र दिवसेंदिवस कमकुवत होताना दिसले. २०१२ पूर्वी सत्ता गाजवणारी गोव्यातील कॉंग्रेस २०१२ मधील पराभव आणि २०१४ लोकसभा निवडणुकीचा धक्का, त्यानंतर देशभरातील कॉंग्रेसमधील निराशाजनक वातावरण यातून कॉंग्रेस अद्यापही वर आलेली दिसत नाही. गोव्याचे मुख्यमंत्रीपद सर्वाधिक तबाल चारवेळा भूषवणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे आता थकले आहेत. सत्तरी भागात आपल्या कार्यक्षेत्रात त्यांनी आपले थोडेफार वर्चस्व कायम ठेवले असले तरी उर्वरित राज्यात त्यांचा प्रभाव उरलेला नाही. दुसरे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचाही राज्यभरात काहीही प्रभाव नाही. शिवाय भ्रष्टाचाराच्या विविध आरोपांनी त्यांची प्रतिमा चांगलीच मलीन झाली आहे. राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता किंवा अनुभव दोन्हीपैकी काहीही असलेला दुसरा नेता आज गोवा कॉंग्रेसकडे नाही. विधिमंडळ आणि प्रदेश कार्यकारिणीमध्ये काहीही एकवाक्यता नाही. स्थानिक पक्षांशी आघाडी करण्याचे प्रयत्न कॉंग्रेसच्याच नेत्यांमधील अंतर्गत मतभेदांमुळे व समन्वयाच्या अभावामुळे फोल ठरले. पांडुरंग मडकईकर यांच्यासारखे नेते भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे कमकुवत झालेल्या कॉंग्रेसचा कमकुवतपणा निवडणुकीच्या तोंडावर अगदीच  उघडा पडलेला दिसतो आहे.

या साऱ्या परिस्थितीमुळे स्वबळावर ४० पैकी ३७ जागा लढवत असलेल्या कॉंग्रेससाठी दोन आकडी संख्या गाठणेही सध्या अवघड आहे. अशा परिस्थितीत ख्रिश्चन मतांसाठी १७ ख्रिश्चन उमेदवार देत (उत्तर गोवा ६, दक्षिण गोवा ११) कॉंग्रेसने स्वतःला जगवण्याचा आणखी एक प्रयत्न केला आहे. मात्र तरीही, सत्तरीत प्रतापसिंह राणे, त्यांचा मुलगा विश्वजित राणे, मडगाव व दक्षिण गोव्यात दिगंबर कामत, लुईझिन फालेरो अशा काही मोजक्या ५-६ जागा वगळता कॉंग्रेसचा अन्य कोणी सदस्य निवडून येऊ शकतो यावर खुद्द कॉंग्रेसचे नेतेही सध्या विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. तर दुसरीकडे अरविंद केजारीवालांचा ‘आम आदमी पक्ष’ही हाती झाडू घेऊन गोमंतकाच्या रणमैदानात उतरला आहे. आप हा पक्ष देशातील एकूणच राजकीय परिस्थिती आणि ‘स्वकर्तृत्व’ यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारा पक्ष असल्यामुळे आपच्या गोवा प्रवेशाचीही जोरदार चर्चा झाली आहे. मध्यंतरी तर ती इतकी झाली की ती चर्चा राजदीप सरदेसाई मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून उभे राहण्यापर्यंतही पोहोचली ! कालांतराने आपच्या इतर गोष्टींप्रमाणेच याही गोष्टीतील फोलपणा स्पष्ट झाला. तर, गोव्यात आपने प्रवेश केला असला तरी, गोव्याच्या विधानसभेत प्रवेश करणे तितकेसे सोपे नाही. आपनेही ख्रिश्चन मतांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आपनेही १४ ठिकाणी ख्रिश्चन उमेदवार दिले आहेत. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणूनही एल्विस गोम्स या ख्रिश्चन चेहऱ्याची निवड केली आहे.

आपने मोठ्या सभा इ. न घेता घरोघर प्रचारावर भर दिलेला आहे. मात्र घरोघर प्रचार प्रभावी होण्यासाठी लागणारे आवश्यक पक्षसंघटन आपकडे शून्य आहे. प्रचार, व्यवस्थापन, इतर कामे, आदींसाठी आपने दिल्ली, मुंबई, गुजरात, हरयाणातून माणसे आणली आहेत ज्यांपैकी जवळपास सर्वांनाच कोकणी वा मराठी यांचा गंधही नाही. नवखा चेहरा, शून्य पक्षसंघटन, आपल्याबद्दल चारचौघात सांगावे असे (चांगले) काहीही नसणे आदींमुळे आपची गाडी किती आकड्यावर थांबणार हा प्रश्नच नसून गाडी विधानसभेत प्रवेश करणार का हा खरा प्रश्न आहे. आप २-३ जागांच्या वर जाणार नसल्याचेच मत व्यक्त केले जात आहे. राहता राहिला मुद्दा आपने दुसऱ्यांची मते खाण्याचा. भाजपने आपली हिंदू व ख्रिश्चन दोन्ही घटकांतील मते पक्की बांधून ठेवलेली असल्याने व आप अर्थातच विरोधी पक्षाच्या भूमिकेत असल्याने मतविभाजन झाल्यास ते कॉंग्रेसच्या मतांचे होण्याची शक्यताच अधिक असून त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला मिळणार आहे.

या अशा परिस्थितीत प्रमुख विरोधी पक्षच इतके डळमळीत असल्याने भाजपसाठी काम आणखी सोपे झाले आहे. ‘विरोधी मते’ म्हणून जो काही बेभरवशी, कधीही कुठेही फिरू शकणाऱ्या मतांचा जो वाटा मिळणार होता त्यातही कॉंग्रेस आणि आप असे दोनदोन वाटेकरी निर्माण झाले आहेत. त्यामुळे दोघांच्याही कदाचित मिळू शकणाऱ्या यशावर परिणाम होणार आहे. राहता राहिला प्रश्न मगोप व आघाडीचा तर, मगोप उद्या सत्तेसाठी कोणत्याही पक्षाच्या, विचारधारेच्या, नेत्याच्या दावणीला जाऊ शकतो. शिवाय त्यांच्याकडे गमावण्यासारखे असे स्वतःचे काहीच नाही. त्यामुळे नुकसान आहे ते पाचेक जागा लढवणाऱ्या प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंचाचे. तसेही गोवा सुरक्षा मंचाने मगोपसोबत जाऊन आपले नुकसान आधीच करून घेतलेले आहे. अर्थात तो एक स्वतंत्र विषय असून यावर सविस्तर चर्चा लेखमालिकेच्या पुढील भागांत होईलच. तूर्तास, ५ वर्षे सलगपणे व सक्षमपणे सत्ता राबवणाऱ्या भाजपची साथ सोडून या अशा कमकुवत व दुभंगलेल्या विरोधी पक्षांचा पर्याय स्वीकारून गोमंतकाला पुन्हा एकदा अस्थिरतेच्या दरीत ढकलण्याचा जुगार जाणते गोयंकार स्वीकारण्याची शक्यता जवळपास संपत आली असल्याचेच स्पष्ट होत आहे..

-    निमेश वहाळकर

(थेट गोव्यातून..)