गोव्यातील ख्रिश्चन राजकारण: महत्व आणि सद्यस्थिती

    दिनांक  25-Jan-2017   

 गोवा : २५ जानेवारी २०१७

 

गोव्यातील ख्रिश्चन समाज हा गोव्याबाहेरील सर्वसामान्य नागरिक, गोव्यात येणारे पर्यटक इथपासून ते सामाजिक – राजकीय अभ्यासक आदींपर्यंत सर्वांच्याच कुतूहलाचा, अभ्यासाचा, समाज-गैरसमजांचा विषय राहिलेला आहे. गोव्यातील संस्कृती – कला, वेशभूषा, खाद्यसंस्कृती, पर्यटनादि व्यवसाय ते राजकारण आदी विविध क्षेत्रांमध्ये ख्रिश्चन समाजाने आपला प्रभाव निर्माण केला आहे किंवा आपला ठसा उमटवला आहे. गोवा स्वातंत्र्यापूर्वी पोर्तुगीजांच्या ताब्यात होता, त्यांच्या काळात गोव्यात ख्रिश्चन समाज कसा निर्माण झाला वगैरे इतिहास आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. साहजिकच गोव्याच्या राजकारणावरही ख्रिश्चन समाजाचा मोठा प्रभाव पडलेला आहे.

उर्वरित भारतात ‘अल्पसंख्यांक राजकारण’ हे मुख्यत्वेकरून मुस्लीम समाजाशी जोडले गेलेले आहे तसे गोव्यात ते ख्रिश्चन समाजाशी जोडले गेलेले आहे. कारण गोव्यात हिंदूंच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या ख्रिश्चनांची आहे. २०११ च्या जनगणनेनुसार (गोव्याबाहेरून रोजगारासाठी आलेले स्थलांतरित वगळून) गोव्याच्या एकूण सुमारे १४ लाख ५८ हजार एवढ्या लोकसंख्येत सुमारे २९.८० टक्के म्हणजे साधारण ४ लाख ३० हजाराच्या आसपास एवढी लोकसंख्या ही ख्रिश्चन समुदायाची होती तर हिंदू समाजाची लोकसंख्या ही एकूण लोकसंख्येच्या सुमारे ६४.६८ टक्के म्हणजे ९ लाख ५० हजाराच्या आसपास होती. गोव्यात मुस्लीम समाजाचे प्रमाण अत्यल्प (जेमतेम ६-७ टक्क्यांच्या आसपास) आहे. त्यामुळे एवढी मोठी टक्केवारी असल्याने आणि अल्पसंख्यांक जरी म्हटले तरी १०० पैकी ३० हे प्रमाण ‘अल्पसंख्यांक’ म्हणण्याच्या बरेच पुढचे असल्याने साहजिकच गोव्याच्या सामाजिक – राजकीय पटलावर ख्रिश्चन समाजाला वगळून पुढे जाता येत नाही.

गोव्यातील हा ख्रिश्चन समाज आजपर्यंत आपल्याच विश्वात रमणारा, एका कोपऱ्यात राहणारा, ‘बाहेरच्या’ जगाशी संपर्क-संबंध ठेवण्यास फारसा उत्सुक नसलेला समाज म्हणून ओळखला गेला आहे. गोव्याची अस्मिता, गोव्याचे वेगळेपण, कोंकणी भाषा इ. विषयांमध्ये या समाजाचा मोठ्या प्रमाणावर सक्रीय सहभाग राहिला आहे. तसेच गोव्याच्या महाराष्ट्रातील सामिलीकरणाला विरोधही याच समाजातून मोठ्या हिरीरीने झाला आहे. याहीपुढे जाऊन कोकण रेल्वेच्या गोव्यातील मार्गाला विरोधही याच समाजाकडून झालेला आहे. या समाजावर अद्यापही चर्चचा व संबंधित धर्मगुरूंचा पगडा अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे. आजही चर्चमधून निघणाऱ्या आदेशांचा बऱ्याच ख्रिश्चन समुदायावर प्रभाव पडत असतो. राजकारण, निवडणुकीतील मतदान इत्यादींवरही चर्चच्या या आदेशांचा परिणाम होत असतो. त्यामुळे असा हा एकमार्गी नसला तरी काहीसा ‘आयसोलेटेड’ ख्रिश्चन समाज एक ‘व्होट बँक’ म्हणून सर्वच राजकीय पक्षांना आकर्षित आणि प्रभावित करतो. गोव्याचे प्रादेशिक राजकारण समजून घेत असताना त्याआधी आपल्याला हे सारे संदर्भ लक्षात घ्यावे लागतात.

स्वातंत्र्योत्तर गोव्याच्या राजकीय इतिहासात ख्रिश्चन समाजाच्या सहभागाचा व योगदानाचा विचार केल्यास चर्चिल आलेमाव (१९९०) हे गोव्याचे पहिले ख्रिश्चन मुख्यमंत्री होत. यानंतर लुईस बार्बोसा, विल्फ्रेड डिसुझा, लुईझिन फालेरो, फ्रान्सिस्को सार्डीन्हा असे मिळून ५ मुख्यमंत्री हे ख्रिश्चन होते. अर्थात यातील अवघे तिघेजणच जेमतेम एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण करू शकले असले तरी गोव्याचा आजवरचा एकूणच अस्थिर राहिलेला राजकीय इतिहास पाहता ही गोष्ट फारशी आश्चर्यकारक वाटणार नाही. गोव्याचे सध्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मंत्रिमंडळात भारतीय जनता पक्षाचे गोव्यातील ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसुझा यांच्यासह एकूण ३ मंत्री हे ख्रिश्चन आहेत. तर गोव्याच्या आताच्या मावळत्या विधानसभेतील एकूण ४० सदस्यांपैकी १५ आमदार ख्रिश्चन होते. पैकी सर्वाधिक ६ आमदार हे भाजपचे होते. याशिवाय ख्रिश्चन मतदानाचा विचार केल्यास असे दिसून येते की, गोव्यात एकूण ९ मतदारसंघांत ख्रिश्चन मतदारांची संख्या ही हिंदूंपेक्षा जास्त आहे. (उत्तर गोवा – २, दक्षिण गोवा – ७). तर साधारण तितक्याच मतदारसंघांत हिंदूंपेक्षा जास्त नसली तरी लक्षणीय मते ख्रिश्चन समुदायाची आहेत. उत्तर गोव्यात ख्रिश्चन मतदारांचे एकूण मतदारसंख्येतील प्रमाण १९ टक्के तर दक्षिण गोव्यात हेच प्रमाण ३७ टक्के इतके आहे. म्हणजेच ४० पैकी साधारण १७-१८ मतदारसंघात ख्रिश्चन समाजाची मते ही महत्वाची ठरतात. 

ख्रिश्चन व्होट ‘बँके’च्या राजकारणात गोव्यात विशेषतः दक्षिण गोवा या जिल्ह्याचा विचार स्वतंत्रपणे करावा लागतो. वास्को आणि मडगाव या प्रमुख शहरांच्या मुरगाव, सासष्टी (साल्सेट), सांगे, केपे, काणकोण आदी तालुक्यांचा दक्षिण गोव्यात ख्रिश्चन मतदारांचे प्रमाण ३७ टक्के म्हणजे निम्म्याहून कमी जरी असले तरी दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून आजपर्यंत केवळ २ हिंदू खासदार निवडून आले आहेत व बाकीचे सर्वच्या सर्व ख्रिश्चन होते ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. पहिला खासदार १९६२ मध्ये मगोपचा निवडून आला होता तर दुसरा थेट २०१४ मध्ये आणि तेही भाजपचे नरेंद्र सावईकर ! दक्षिण गोव्यातील २० पैकी एकूण ७ विधानसभा मतदार संघात ख्रिश्चन समाजाची मतदारसंख्या ही हिंदूंपेक्षा जास्त आहे. तर १० मतदारसंघांत ती १०-१२ हजारांच्या वर म्हणजे ३० टक्क्यांहून अधिक आहे. गोव्याच्या लहान आकार व कमी लोकसंख्येमुळे येथे एका विधानसभा मतदारसंघात साधारणपणे २५-३० हजार मतदार असतात आणि ५००-१००० मते निवडणुकीचे चित्र बदलत असतात. या पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्यातील २० मतदारसंघांमध्ये ख्रिश्चन मतांचे महत्व आपल्या लक्षात येईल.

या अशा दक्षिण गोव्यातून २०१२ विधानसभा निवडणुकीत भाजपचे २० पैकी ९ आमदार निवडून आले होते. पैकी ३ हे ख्रिश्चन होते. पैकी १ आमदार हा हिंदुबहुल मतदारसंघातून निवडून आला होता. तर, ६ हिंदू आमदारांपैकी १ आमदार हा ख्रिश्चनबहुल मतदारसंघातून निवडून आला होता. दक्षिण गोव्याच्या आजवरच्या राजकीय – सामाजिक परंपरेत काहीसे वेगळे व धक्कादायक असे हे निकाल होते. मागील लेखात आपण उल्लेखल्याप्रमाणेच, ही किमया अर्थातच मनोहर पर्रीकरांचे नेतृत्व व भाजपच्या ख्रिश्चन समुदायातील संपर्क अभियानामुळे साधली गेली होती. भाजपची पारंपारिक हिंदुत्ववादी प्रतिमा आणि हे निकाल यात जमीन-अस्मानाचा फरक असल्याने साहजिकच या घटनेने देशाचे लक्ष वेधून घेतले होते.

आता गोव्याची २०१७ ची विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे पुन्हा एकदा ख्रिश्चन व्होट बँकेची चर्चा सुरु झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी ही मते आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. कॉंग्रेस पक्षाचा ख्रिश्चन समुदायात आजवर बऱ्यापैकी आधार होता. २०१२ मध्ये भाजपने ख्रिश्चन मते मिळवत कॉंग्रेसचा कणा पार मोडला. कॉंग्रेस अद्यापही त्यातून सावरलेली नाही. गोव्याच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावून पाहणारा नवखा खेळाडू अर्थात आम आदमी पक्षाने ख्रिश्चन मतांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ते इतके जास्त केले आहे की लोक ख्रिश्चन हितसंबंध जपणारा पक्ष म्हणूनही आपला ओळखू लागले आहेत ! आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार एल्विस गोम्स हेही दक्षिण गोव्यातील कुंकळी या ख्रिश्चनबहुल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. शिवाय आपने दोन्ही जिल्ह्यांत अनेक ख्रिश्चन उमेदवार देऊन ही व्होट बँक खेचण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत सविस्तर चर्चा लेखामालिकेच्या पुढील भागात होईलच. असे जरी असले तरी, भाजपने हिंदू आणि ख्रिश्चन दोन्ही समाजामध्ये आपला प्रभाव निर्माण केलेला असल्यामुळे व ५ वर्षांतील सरकारचे काम व सर्वधर्मियांसाठीच राबवलेल्या विविध विकास योजना व सवलती, शिवाय माध्यम प्रश्नात भाजप व सरकारने घेतलेली भूमिका यांमुळे या सर्वच ‘व्होट बँक्स’ सध्यातरी चांगल्याच पक्क्या झालेल्या दिसत आहेत.

भाजपच्या सध्याच्या या मजबूत स्थितीमुळे धर्माच्या आधारावर आपले आजवरचे 

राजकारण करणाऱ्या व भविष्यात करू पाहणाऱ्या गोव्यातील राजकीय पक्षाची चांगलीच अडचण झाल्याचे पाहायला मिळते आहे. या निवडणुकीत ख्रिश्चन मते सर्वच्या सर्व अगदी भाजपलाच पडतील असे जरी सांगता येत नसले तरी मोठ्या प्रमाणावर भाजपच्या विरोधात जातील अशीही परिस्थिती नसल्याचे स्पष्ट होते आहे. त्यामुळे आता बाकीचे राजकीय पक्ष शेवटच्या टप्प्यात कशी खेळी खेळतात आणि त्यावर गोव्याचा मतदार राजा काय कौल देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे..         

- निमेश वहाळकर