जगभरातील माध्यमात डाव्या मानसिकतेचे लोक बहुसंख्य आहेत हे उघड सत्य आहे. डावा कम्युनिस्ट विचार हा जगभरातील लोकांपर्यंत पोहोचावा ह्यासाठी ही माध्यमे प्रयत्नशील असतात. डावा विचार हा मुळातच भेदांवर आधारित असल्यामुळे जिथे जिथे लोकांमध्ये जितका संघर्ष जास्त, तितका हा विचार लोकांनी जास्त स्वीकारला. पण जिथे लोक 'देश हाच देव' हा विचार करून देशभक्तीने भरून सर्व भेद विसरून एकत्र येतात तेथे डावा विचार अयशस्वी ठरतो. मग अशा वेळेस जे लोक देशभक्तीचा विचार लोकांपर्यंत पोहोचवतात त्यांना हरप्रकारे बदनाम करून लोकांपासून त्यांची नाळ तोडण्याचे कार्य मिडियातले लोक पद्धतशीरपणे करत असतात.
ज्या घटनेतून देशभरातील जनतेला आपण एक आहोत असे अभिमानाने वाटते, तिथे ही माध्यमातली मंडळी व्यवस्थितपणे विघ्न निर्माण करून एकीची भावना मारून टाकतात. ह्याचे ताजे उदाहरण म्हणजे पी व्ही सिंधूने ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदक मिळवल्यावर उभा देश आनंदात असताना ह्याच माध्यमांनी अचानक शोध लावला की लोक पी व्ही सिंधूची जात गुगल वर शोधत आहेत. आणि ह्या शोधाला अर्थातच काहीही ठोस आधार नव्हता.
भारतीय सैन्याने अतिरेक्यांना पाकव्याप्त काश्मिरात घुसून मारल्यावर पूर्ण देश अभिमानाने ही घटना चर्चित असताना ह्याच माध्यमांनी 'पुरावा काय' चे टुमणे लावून सरकारचे आणि जनतेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. शेकडो निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला कारण ठरलेल्या याकूब मेमनच्या फाशीवरून सुद्धा ह्याच माध्यमांनी लोकांच्या मनात आपले सरकार आणि आपण काहीतरी चुकीचे करत आहोत ही भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर ही माध्यमे अशाच प्रकारचा अजेंडा राबवत आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांच्याविषयीचे नकारात्मक वार्तांकन बारकाईने पाहिल्यावर हे लक्षात येते. कारण हेच की ट्रम्प हे 'देशभक्ती' आणि 'नेशन फर्स्ट' च्या आधारे धोरणे ठरवणार आहेत. ट्रम्प यांच्यात काही दुर्गुण असतीलही पण लोकांनी ज्यांना पूर्ण बहुमत देऊन निवडून दिले त्याचा आदर करण्यापेक्षा माध्यमांनी लोकांचेच कसे चुकले हे जगाला ओरडून सांगायला सुरुवात केली. भारतात नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी हीच माध्यमे लोकांच्या मनात त्यांच्या विषयी भयगंड निर्माण करण्यात आघाडीवर होती.

जेव्हापासून इलेकट्रॉनिक माध्यमांचा बाजार भारतात सुरु झाला तेव्हापासून ठराविक विचारांचा प्रसार करणे सुरु झाले. नव्हे त्या उद्देशानेच अनेक वाहिन्यांना परवाने दिले गेले. भारताबाहेरील अनेक संस्था संघटनांनी विशिष्ट उद्धेश डोळ्यासमोर ठेऊन ह्या वाहिन्यांना अर्थपुरवठा सुरु केला. तेव्हापासूनच भारतीयांच्या परंपरा, भाषा यांना दुय्यम लेखून जे जे पाश्चात्य ते ते चांगले असा पद्धतशीर प्रचार सुरु झाला. मला आठवतंय एका वाहिनीवर निवेदकाने म्हटले होते कि हिंदीतुन बोलणे म्हणजे अशिक्षित आणि इंग्रजीतून बोलणे म्हणजे शिकलेला.
ज्या जागरूक नागरिकांचे माध्यमांवर बारीक लक्ष आहे त्यांनी सोशल मेडियाच्या आधारे माध्यमांचा बेजबाबदारपणा आणि दुतोंडी व्यवहार लोकांसमोर मांडायला सुरुवात केल्यापासून ह्या माध्यमांची विश्वासार्हता खालावू लागली. परंतु एखाद्या व्यक्तीविषयी किंवा संघटने विषयी मुद्धाम चुकीची बातमी पसरवून देणे हे अजूनही सुरूच आहे. परंतु गेली वीस-पंचवीस वर्षे हा प्रकार चालू आहे हे माहिती असताना निस्वार्थी वृत्तीने काम करणाऱ्या देशभक्त संघटनांनी काळजी घ्यायला हवी असे वाटते.
भारतात सर्व भेदाभेद विसरायला लावून देशभक्तीच्या मुद्द्यावर लोकांना एकत्र आणणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यात रा. स्व. संघ ही सगळ्यात मोठी आणि जुनी संघटना. त्यामुळे संघाच्या नेत्यांनी माध्यमांना कशाप्रकारे हाताळावे हे शिकण्याची नितांत आवश्यकता जाणवते. संघाच्या कोणत्याही नेत्याने वक्तव्य केले की त्याचा विपर्यास केला जातो. हे असे नेहमी का घडते? कारण, माझ्या मते माध्यमांच्या कुठल्या प्रश्नाला कसे उत्तर द्यावे ह्याची काळजी अजूनही पाहिजे तितकी घेतली जात नाही. बिहार निवडणुकांच्या वेळेस असेच घडले. मोहनजींच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आणि बिहार निवडणुकांमधे भाजपला फटका बसण्याचे ते एक कारण ठरले. आतासुद्धा उत्तरप्रदेश निवडणुकांच्या आधी मनमोहनजी वैद्य यांनी ज्या प्रश्नाला उत्तर दिले त्याचा संदर्भ न देता सरसकट दुष्प्रचार सुरु केला. पण मुलाखत पाहतांना एक लक्षात येते की संघ नेत्यांनी प्रश्नाचा संदर्भ उत्तरात एकदाही आणला नाही. त्यांनी असल्या प्रसन्न उत्तर देतांना पुन्हा पुन्हा कशाच्या संदर्भात हे उत्तर आहे हे स्पष्ट केले पाहिजे. संघ नेत्यांनी प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मुलाखत कर्त्याला माध्यमांची खिल्ली उडवत हेही म्हटले पाहिजे की "तुम्ही कृपया माझे उत्तर जसेच्या तसे दाखवा / छापा. कारण याआधी माध्यमांनी दुष्प्रचार केला आहे. परंतु आम्हाला असा विश्वास आहे की तुम्ही जसेच्या तसे उत्तर बरोबर प्रसारित कराल". ह्या प्रकारे माध्यमांना हाताळण्याचे काम गेली ३ वर्षे भाजप प्रवक्त्यांनी केल्यामुळे भाजप विषयी दुष्प्रचार करण्याचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे. त्यामुळे माध्यमांना भाजपच्या अगदी खालच्या फळीतील कार्यकर्त्यांना काहीतरी प्रश्न विचारून मग त्यातून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करून आपले समाधान करून घ्यावे लागते.
बदलत्या जगाबरोबर माध्यमांची बदललेली स्ट्रॅटेजी संघाच्या नेत्यांनी सुद्धा शिकण्याची गरज आहे. कारण या जगात आपले विचार आणि कार्य जगापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांचे कष्ट आहेतच, त्याबरोबर वैचारिक विरोधकांशी सामना करताना बौद्धिक पातळीवर माध्यमांमधूनच वाद घालावे लागणार आहेत.
-भूषण मेंडकी