अयोध्येच्या मंदिरात राहूल गांधी ... ???

10 Sep 2016 19:51:00

      उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेऊन राहूल गांधी यांनी गेल्या ४-५ दिवसांपासून किसान यात्रा सुरू केली. देवरिया ते दिल्ली अशी ही यात्रा शेतकऱ्यांचे प्रश्न उचलण्यासाठी सुरू केली आहे, असं काँग्रेस सांगत जरी असली तरी प्रत्यक्षात मात्र ती भलत्याच कारणांनी गाजतीये. खाटसभांचं आयोजन झालं तर लोकांनी खाटा पळवल्या आणि घरी घेऊन गेले. अर्थात राहूल गांधींच्या सभेतून घरी घेऊन जाता येण्यासारखं तेवढंच आहे इतपत शहाणपण उत्तरप्रदेशातल्या मतदारांनाही आता आलं असावं.

    एक तर यात्रा आणि त्यातही चालत वगैरे करण्याची काँग्रेसला अजिबातच सवय नाही. तो मक्ता भाजपने घेतलेला आहे. अर्थात सलग काही दशकं सत्तेत असल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना याची कधी आवश्यकताही वाटली नाही. उलट अशा पदयात्रा कशा ठेचायच्या याचेच त्यांचे प्रशिक्षण अधिक झाले आहे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरल्याशिवाय गत्यंतर नाही हे लक्षात आल्यामुळेच अशा पदयात्रेचा पर्याय समोर आला असावा.

    बर अमेठी आणि रायबरेली मध्ये केलेल्या विकासकामांच्या जोरावर निवडणूका लढवणे शक्य नाही कारण त्यासाठी तिथं किमान काही विकासकामं व्हायला तर हवीत. पण तिथंही सगळा आनंदच असल्यामुळे या अशा पदयात्रा काढून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा हा प्रयत्न आहे. त्यातच भर पडली ती कालच्या प्रकारामुळं. राहूल गांधी काल अयोध्येला गेले. गांधी घराण्यातील गेल्या २७ वर्षातील ही पहिली व्यक्ती आहे जी अयोध्येला गेली. आणि नुसता गेलेच नाही तर तिथे चक्क मंदिरात गेले. सामान्य भारतीयांना गांधी घराण्यातील अशा व्यक्तींना मंदिरात वगैरे बघायची सवय नाहीये ना, त्यामुळे स्वाभाविकच त्यांच्या या कृतीला सर्व वर्तमानपत्रात पहिल्या पानावर प्रसिद्धी मिळाली. कारण वर्तमानपत्रांनाही काहीतरी वेगळं घडलेलं दाखवावं लागतं ना.


 

    २०१४ च्या निवडणूक निकालांनंतर काही दिवसांनी काँग्रेसनं एक आत्मचिंतनपर बैठक घेतली. त्यानंतर बाहेर येऊन काँग्रेसचे तत्कालीन उपाध्यक्ष आणि युवा नेते राहूल गांधी यांनी असं सांगितलं की काँग्रेस पक्षापासून हिंदू समाज दुरावल्यामुळेच आजचा हा पराभव झाला आहे. इतके दिवस मशिदी आणि चर्चचे उंबरे झिजवण्यात धन्यता मानणारे गांधी घराणे एकाएकी हिंदू मंदिरांकडे कसे वळले याचं कारणच बऱ्याच जणांना कळेना. बर गेले ते गेले त्यातही कपाळाला चक्क कुंकू, गंध लावून घेतलं आणि गळ्यात हारही घालून घेतला. हे म्हणजे अतीच झालं बुवा. सेक्युलर माणसांना हे शोभतं का. सेक्युलर लोकांनी कसं मिशिदीत जावं, चर्चमध्ये जावं, ईद आणि ख्रिसमसच्या शुभेच्छा द्याव्यात आणि हिंदू सणांना पर्यावरण पूरक करा वगैरे सल्ले द्यावेत. लोकांनाही त्यांच्याकडून हीच सवय असते. मात्र राहूल गांधींनी हे भलतंच धाडस केलं. इतकंच काय काँग्रेसनं आजपर्यंत देशातल्या हिंदू समाजाकरिता काय केलं असा प्रश्न आपण गुगलवर विचारला की गुगलच आपल्याला विचारते की काँग्रेस अँटी-हिंदू आहे का. म्हणजे जे सत्य गुगललाही ठावूक आहे ते सामान्य भारतीयांना कळायला २०१४ उजाडावं लागलं.

 


      बर राहूल गांधी अयोध्येत गेले ते ही कुठे तर हनुमान गढी मंदिरात. अर्थात ते हनुमान मंदिरात गेले हे योग्यच आहे. भारतीय पद्धतीप्रमाणे त्यांचा जाहीर विवाह व्हायचा असल्यामुळे शास्त्रानुसार ते हनुमान मंदिरात जाऊच शकतात. पण गोष्ट तेवढ्यानेच संपत नाही, तिथून अवघ्या फर्लांगभर अंतरावर असलेल्या रामललाच्या मंदिरात जायचं मात्र त्यांनी टाळलं. ज्या रामामुळे भाजपला सत्ता मिळाली तो राम दिसतो कसा हे तरी त्यांनी पाहायला हवं होतं. मात्र तसं न करता ते तिथेच महंत ग्यानदास नावाच्या साधूंना भेटले आणि पुढे निघाले. हे ग्यानदास विश्व हिंदू परिषदेचे विरोधक म्हणून सर्वत्र ख्यातनाम आहेत. त्यामुळे त्यांना भेटणे स्वाभाविक आहे. पण तरीही गांधी घराण्याच्या नजिकच्या इतिहासावर नजर टाकल्यावर ही भेटही ऐतिहासिकच म्हणायला हवी. कारण यांच्या मातोश्री सोनियाजी २०१४ च्या निवडणूकीच्या आधी दिल्लीच्या जामा मशिदीचे इमाम बुखारी यांना भेटल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर केवळ अडीच वर्षात एवढा बदल होणं म्हणजे जरा अपचनीयच आहे ना. अर्थात नंतर ते तिथल्या एका दर्ग्यात गेले आणि त्यांनी आपली कृती बॅलन्सही केली ही गोष्ट निराळी, पण तरीही.


 

     सहज गंमत म्हणून गुगलवर काँग्रेस इज प्रो ... असं लिहून बघा, गुगल स्वतःहून मुस्लिम असा पहिला पर्याय देतं. गुगल काही स्वतःहून मत बनवत नाही. त्या पक्षाच्या, नेत्याच्या विषयी लोकांनी विविध ठिकाणी जे मत व्यक्त केलं असतं, माध्यमांमधून जे लिहिलं जातं त्याचंच प्रतिबिंब गुगल सर्च मध्ये उमटतं. त्यामुळे भारतीय जनमानसातील गांधी घराण्याची आणि पर्यायाने काँग्रेसची हिंदूविरोधी झालेली प्रतिमा मंदिरगमनानं पुसली जाणं अवघड आहे. अर्थात काँग्रेसलाही आणि राहूल गांधींनाही कपाळावरचं गंध पुसून डोक्यावर टोपी घालायला क्षणाचाही विलंब लागत नाही. बर 'सौ बार मश्जिद मे जाकर अब राहूल चले मंदिर को ... ' असं म्हणणंही योग्य होणार नाही. नाहीतर असं म्हणणाऱ्यांवरच पुन्हा प्रतिगामी, मागास, जातीयवादी असा शिक्का मारायला मिंधी माध्यमं हजर होणार. त्यामुळे आत्तातरी एवढंच म्हणता येईल की १४ टक्के लोकांच्या एकगठ्ठा मतदानासाठी त्यांचं लांगूलचालन करणाऱ्यांचे डोळे ८० टक्के एकगठ्ठा झाल्यामुळे पांढरे झाले, आणि मग आता यांना मंदिरं आठवायला लागली आहेत.

     हरकत नाही. कालाय तस्मै नमः| अशीच परिस्थिती राहिली तर काही वर्षांनी राहूल गांधी पाकिस्तानातील अल्पसंख्य हिंदूंच्या वेदनेविषयी बोलल्यास आश्चर्य वाटायला नको.  जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात सामान्य भारतीय माणूस एकदा राम म्हणतो. २०१४ च्या निकालांनतर आपला पक्ष हळूहळू संपायच्या मार्गावर असल्याचं ओळखूनच बहुदा राहूल यांना आज निदान राम नाही तर रामाचा दास तरी किमान आठवला. हे ही नसे थोडके.

     गंमतीचा भाग म्हणजे अनेक दहशतवाद्यांचे प्रेरणास्थान असल्याचा आरोप असलेला झकीर नाईक याने राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टला २०११ मध्ये ५० लाख रुपयांची मदत केल्याची बातमी आजच विशिष्ट दैनिकाने आपली एक्सक्ल्युझिव्ह स्टोरी म्हणून लावावी हा योगायोगच आहे का प्रशांत किशोर या काँग्रेसच्या उत्तर प्रदेशातील निवडणूकीच्या रणनितीकाराच्या रणनितीचा भाग आहे हे वाचकांनीच ठरवावे.


 

Powered By Sangraha 9.0