‘मोरया’चा सिक्वेल : कान्हा

27 Aug 2016 17:03:00


तरूणाई साद घालणारे विषय घेऊन चित्रपटाची निर्मिती करण्याची अवधुत गुप्तेची आवड (व्यावसायिक की सामाजिक माहिती नाही...) आजही कायम असल्याचे पुन्हा एकदा ‘कान्हा’ या चित्रपटातून दिसून येत आहे. याआधी राजकारण (झेंडा), गणेशोत्सव (मोरया) आणि आता दहीहंडी (कान्हा) या विषयावर आधारित असणारे चित्रपट तरूणाईला नक्कीच आपलेसे वाटणारे आहेत, परंतु वर्षानुवर्ष त्याच एका साचेबद्ध पद्धतीमध्ये केलेले लिखाण आणि चित्रपटाची मांडणी दिग्दर्शन क्षेत्रातील अवधुतचे वेगळेपण कमी करण्यास कारणीभूत ठरत आहे. झेंडापासून कान्हापर्यंतच्या प्रवासात अवधुतने केवळ एकदाच ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’च्या निमित्ताने त्याचा हा ट्रॅक सोडला होता, पण तो देखील फारसा यशस्वी झाला नसल्याचेच दिसते. ‘कान्हा’देखील दोन तासाच्या प्रवासात तुम्हाला फार वेगळं असं काहीच देत नाही. कान्हा या चित्रपटाला ‘कान्हा’हे नाव न देता ‘मोरया’चा सिक्वेल म्हटलं असतं तर ते अधिक योग्य झालं असतं. आगामी काही वर्षात ‘नवरात्रौत्सवा’वर आधारीत अवधुतचा चित्रपट प्रदर्शित झाला नाही तरच आपल्याला आश्‍चर्य वाटेल, इतके या ट्रॅकचे गारूड सध्या अवधुतवर आहे!

लोकेशन तेच-मुंबई, नायकांचे निवासस्थानही तेच-जुनी एखादी चाळ, दोघं नायक तसे बेरोजगारच (म्हणजे एकाचा मांडवाचा व्यवसाय आहे, पण तो फक्त दाखविण्यासाठी), दोघांची दोनं वेगळी मंडळं पण एकाच वस्तीत, दोघांसोबत चार-चार पोरं, तुझं मंडळ भारी की माझं भारी याची स्पर्धा, दोन प्रतिस्पर्धी राजकारणी, त्यांच्याकडून नायकांचा होणारा वापर, एक अभिनेत्री, मीडिया, तरूणाईचा संघर्ष आणि थोडा मसालेदार शेवट... हे सगळं बघितलयं की आपण मोरयामध्ये... आणि आता कान्हामध्येही तेच आहे विषय फक्त बदललाय. जय बजरंग आणि जय एकता या मुंबईतील दोन मंडळांमध्ये नऊ थरांची हंडी कोण फोडणार यावरून वाद असतो. जय बजरंगचा म्होरक्या आहे मल्हार भोसले (वैभव तत्त्ववादी) आणि जय एकताचा रघु म्हात्रे (गष्मिर महाजनी).

मुंबईमधील दहीहंडीचे वास्तव दाखवण्याचा दिग्दर्शकाने प्रयत्न केला आहे. चित्रपटाचे निर्माते असणार्‍या प्रताप सरनाईक यांनी हे सर्व अगदी जवळून अनुभवले असल्याने दंडीहंडी उत्सवाच्या अनुषंगाने काय-काय गोष्टी घडत असतात याचे चांगले संदर्भ यामध्ये देण्यात आले आहेत. परंतु कथा लेखनामध्येच दम नसल्याने मांडणीमधील दोष प्रकर्षाने दिसून येतातच. रसिकांना गुंतवून ठेवणे, उत्सुकता निर्माण करणे, संवादमध्ये नाविन्य असणे अशा कोणत्याच गोष्टी ‘कान्हा’मधून दिसून येत नाहीत. चित्रपटाची वेगळ्या पद्धतीने केलेली सुरूवात थोडीशी उत्सुकता निर्माण करते खरी (या सिनमध्येही ‘अ‍ॅम्ब्युलन्स’ इतक्या संथ वेगाने जाताना का दाखवली आहे, ते दिग्दर्शकालाच ठाऊक) पण कालांतराने चित्रपट नेहमीच्याच गुप्ते स्टाईने पुढे पुढे जात राहतो आणि शेवटही त्याच स्टाईलने होतो. न्यायालयाने 20 फूटांच्यावरील दहीहंडींना परवानगी नाकारली आहे. हा मुद्दा सध्या अधिक चर्चेत आहे. त्याला अनेक आयामही आहेत. परंतु ‘कान्हा’मध्ये या गोष्टीचा अधिक खोलवर जाऊन अभ्यास झाल्याचे दिसून येत नाही. चित्रपट अतिशय वरवरच्या गोष्टींचे दर्शन आपल्याला घडवतो.

अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास वैभवने चांगला अभिनय केलाय पण तरीदेखील अशा रावडी भूमिका संतोष जुवेकरनेच कराव्यात असं मला वाटतं. वैभव रोमॅन्टिक, कॉमेडी किंवा ‘चिमाजी अप्पा’सारख्याच भूमिका साकाराव्यात. गष्मिरचा लूक त्याची बॉडी या व्यक्तिरेखेसाठी अतिशय योग्य आहे केवळ अभिनयात त्याला आणखी तालीम करण्याची गरज आहे. ‘स्वप्नांच्या पलिकडले’ फेम गौरी नलावडे अजून ‘मालिकांच्या पलिकडे’ गेली नसल्याचे दिसून येते. चित्रपटातील सशक्त अभिनयासाठी तिला आणखी भरपूर वाव आहे. अभिनयाच्यादृष्टीने प्रसाद ओक आणि किरण करमरकर यांनीच चित्रपट उचलून धरलाय असं म्हटल्यास वावग ठरणार नाही. छोट्या कान्हानेही त्याच्या आवाजातून आणि अभिनयातून वेगळी छाप सोडली आहे.

वैशाली सामंत, अवधुत गुप्ते, सुरेश वाडकर, कैलाश खेर, आदर्श शिंदे, रोहित राऊत यांसारखे नावाजलेले गायक असूनही लक्षात राहीलं असं एकही गाण हा चित्रपट आपल्याला देऊ शकत नाही. चित्रपटात अनेक ठिकाणी नको त्या ठिकाणाहून चित्रिकरण करण्याचं डोक सिनेमॅटोग्राफर राहूल जाधवनी लढवलय की अवधुतनी माहित नाही, पण ते अनाठायी असल्याचं जाणवतं. विशेषत: पोलिस चौकीतला इन्स्पेक्टरच्या पायाखालून चित्रित करण्यात आलेला सिन तर नकोसा होतो. एका सिनमध्ये वैभवच्या चाळीतल्या घरावरती आकाशकंदिल आणि छोटे लाईटस् लावल्याचे दाखविले आहे. त्याचे प्रयोजन काही लक्षात आले नाही. आपल्यात शक्यतो दिवाळीत असे कंदिल किंवा लाईटिंग करतात. तसेच वैभवच्या वडिलांचा मृत्युचा सिनतर अतिशय हास्यास्पद वाटतो. एवढा आडदांड माणूस दहीहंडी फोडायला वर चढल्यावर खाली पडणारच ना? असो, आले अवधुतच्या मना तेथे कोणाचे चालेना... पण तुम्ही तरी तुमच्याबाबतचा निर्णय स्वत: घेऊ शकता ना, मग आता तुम्हीच ठरवा ‘कान्हा’ चित्रपटगृहात जाऊन बघायचा की नाही!
----

Powered By Sangraha 9.0