खाद्यभ्रमंती- स्टफ्ड बनाना

08 Dec 2016 14:51:00

नेहेमीची पिकलेली पिवळी मधुर केळी आपण खूप खातो, आवडीने खातो पण कच्च्या केळयांचे अतोनात फायदे मात्र याच वेळी आपण नेहमीच दुर्लक्षतो.....

रॉ हिरव्या केळ्यांमध्ये लोडेड विटामिन्स आणि मिनरल्स सोबतच असे काही स्टार्च असतात की ज्यामुळे ब्लड शुगर आणि कोलॅस्ट्रोल ही कंट्रोल मध्ये राहते असे सिद्ध झाले आहे....

आजच्या धकाधकीच्या स्ट्रेस्ड लाइफस्टाइल मध्ये अत्यावश्यक नाहीये का मग ही भाजी मित्रांनो आणि मैत्रिणींनो ?

चला तर मग बघुया हि भन्नाट पण अतिशय सोप्पी भाजी....

 साहित्य 

कच्ची हिरवी केळी - मध्यम आकाराची ५ केळी
कोथिंबीर - एकदम छान बारीक चिरलेली साधारण ८ चमचे (जास्तच लागते या भाजीला)
धने पावडर - २ चमचे 
जिरं पावडर - १ चमचा 
हिंग - एक चमचाभर 
मीठ - २ चमचे 
साखर - ३ चमचे 
हळद - अर्धा चमचा 
लाल तिखट - ३ चमचे 
जिरं - दोन चमचे 
लिंबाचा रस - ४ चमचे 
बेसन - २ चमचे 
काळी मोहरी - एक चमचा 
तेल - तीन चमचे 

पाककृती 

१) हिरव्या केळ्यांचे नीट धुवून, साल तसेच ठेवून (साल काढू नका, सालच्या आत केळे छान शिजते...नंतर खाताना आपण हे साल काढून टाकू शकतो) प्रत्येकी तीन तुकडे करून घ्या आणि प्रत्येक तुकड्याला एकच उभा छेद इतपतच द्या कि केळ्याचे दोन तुकडे होणार नाहीत...(हे उभे छेद देताना सुरी साधारण हलवून नीट जागा करून घ्या म्हणजे नंतर स्टफिंग छान भारता येईल आत)

२) एका प्लेट मध्ये आता एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर घ्या आणि त्यात धने आणि जिरं पावडर, लाल तिखट, मीठ, हळद, अर्धा चमचाभर हिंग, बेसन, लिंबाचा रस, एक चमचा तेल आणि साखर नीट छान मिक्स करून घ्या. 
हे स्टफिंग आता असेच झाकून साधारण ५ मिनिटे तयार होण्यासाठी ठेवून द्या.


३) आता उभ्या चिरलेल्या केळ्यांच्या तुकड्यांमध्ये हे स्टफिंग एकदम नजाकतीने भरा...
जेणेकरून केळ्यांचे दोन तुकडे होणार नाहीत.


४) उरलेया स्टफिंग मध्ये आता एक चमचा भर अथवा आवश्यक असेल तितके कोमट पाणी घालून (जास्त नको) भरलेले केळ्यांचे तुकडे या पाण्यात साधारणपणे १५ मिनिटे पसरून ठेवा जेणेकरून हे पातळ स्टफिंग केळ्यांना सर्वबाजूंनी लागेल आणि केळीचे तुकडे मस्त हलके मसालेदार तयार होतील.

५) आता एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये दोन चमचा तेल तापवून घ्या आणि तेल तापल्यावर मोहोरी घाला, जिरं घाला आणि हे दोन्ही एका मागून एक तडतडले कि आता उरलेला हिंग घाला. 

६ ) आता आपण स्टफिंग भरून तयार केलेले केळ्यांचे तुकडे या भांड्यात मिश्रण खालच्या बाजूला येईल असे ठेवून द्या. हे असे ठेवल्यावर भांडयात असलेले तेल साधारण सगळ्या तुकड्यांना लागेल अश्या बेताने भांडे मागेपुढे आणि आवश्यकता वाटल्यास वरखाली हलवा...
 
केळ्याच्या तुकड्यांना आता स्पर्शू नका...
केळी तुटण्याचा अथवा स्टफिंग बाहेर निघण्याचा धोका असतो.
किंचित वाफ बाहेर जाऊ शकेल अश्या बेताने एखादे झाकण या भांड्यावर ठेवून साधारण १० मिनटे मध्यम अग्नीवर शिजू द्या.

७) दहा मिनिटांनी झाकण काढून केळ्यांचे तुकडे परत भांडे मागेपुढे आणि वरखाली हलवून पुन्हा पाच एक मिनिटे विस्तवावर ठेवून द्या...झाकण अलगद ठेवा...

आता वेळ आली आहे प्लेटिंग ची...




आम्ही तर हि डिश पारंपारीक केळीच्या पानांवर खाल्ली...

बघा...तुम्हाला काय आवडत ते 

भाजी पानात वाढून घेतल्यानंतर अलगद हातानी केळीच्या तुकड्यांची साले काढून टाका...

आणि गरमागरम पोळीसोबत मस्त जेवण सुरु करा...

अरे थांबा थांबा यार....

आचमन केलेत का ?

जेवणापूर्वी २ घोट पाणी पिऊन घ्या...

हात जोडून देवाचे स्मरण करा...भोजन मंत्र म्हणा आणि..

आता करा सुरुवात...


रेसिपी कशी वाटली नक्की सांगा...

आणि  ही डिश केल्यानंतर नक्की कळवा....
 

भरपेट खा...आरोग्यदायी रहा..खूष व्हा...मस्त जगा

 


देव बरा करो.........

 
-मिलिंद वेर्लेकर 

Powered By Sangraha 9.0