खाद्यभ्रमंती- मसाला भेंडी

24 Nov 2016 13:14:00

मसाला भेंडी..........लज्जतदार भारतीय मसाल्यांनी ल्यालेली किंचितसर आंबट आणि अलगद तिखट भेंडी  

Masala Okra...Masala Bhendi

मी केलेल्या मसाला भेंडीची रेसिपी देत आहे..
नक्की ट्राय करा...
भेंडी आवडत नसेल तरी हि भाजी नक्की आवडेल बघा तुम्हाला..........
भेंडी या भाजीमध्ये भरपूर फायबर्स असतात जे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात...
त्यामुळे जरी तुम्हाला भेंडी आवडत नसेल तरी हि भजी अशी ट्राय करा...
दुहेरी फायद्यात असाल...
शरीराला आवश्यक घटक मिळतील आणि...
चटकदार भेंडी ही खायला मिळेल...

 
साहित्य

५०० ग्रॅम भेंडी
(भेंडी विकत घेताना शक्यतो ४ इंचापेक्षा कमी लांबीची छान ताजी, कोवळी आणि शक्यतो घट्ट भेंडी निवडावीत,
भाजीवाला ओळखीचा असेल तर (एखाद्याच भेंडीचे) टोक मोडून पाहावे, एका झटक्यात कटकन मोडणारी भेंडी उत्तम...चिवटपणे मोडता मोडली नाही तर ढुंकून ही अजिबात पाहू नका)
 
अर्धा चमचा हळद पावडर
दीड चमचा लाल तिखट (शक्य असेल तर संकेश्वरी आणि काश्मिरी मिरचीचे तिखट निम्मे निम्मे घ्यावे..रंग मस्त..चव छान)
१ चमचा मीठ
दीड चमचा दाणेदार साखर
पाच चमचे लिंबू रस
दीड चमचा धने पावडर
दीड चमचा जिरे पावडर
१ चमचा जिरं
१ चमचा काळी मोहरी
४ चमचे हिरवीगार फ्रेश बारीक कापलेली कोथिंबीर
एक चमचा कसुरी मेथी (किंचित कडवट चव छान लागते, आवडत नसल्यास वापरली नाही तरी चालेल)
२ चमचे तेल अथवा साजूक तूप (तुपावर केल्यास भन्नाट लागते)
४ चमचे धारदार सुरीने बारीक चिरलेले टोमाटो (धारदार सुरी घ्यावी म्हणजे चिरताना टोमाटोचा रस बाहेर येत नाही , हा रस पडून भाजी चिकट होऊ शकते )


कृती

१) बाजारातून आणलेली छान कोवळी छोटेखानी भेंडी मस्त स्वच्छ धुवून घ्या आणि पाण्याने भरलेल्या कुंड्यात ५ एक मिनिटे बुडवून ठेवा.

२) ५ मिनिटानंतर बाहेर काढून एक एक भेंडे व्यवस्थित कोरड्या टॉवेल ने पूर्ण कोरडे करून घ्या आणि बाजूला वेगळ्या कोरड्या भांड्यात
ठेवा.

३) भेंडीचे देठ धारदार सुरीने कापून टाका आणि प्रत्येक भेंडीचे उभे चिरून चार तुकडे करा.
(चिरताना प्रत्येक भेंडे व्यवस्थित पाहून घ्या... भेंडीमध्ये अळ्या असण्याचा संभाव असू शकतो, एखाद्या भेन्ड्यात अळी दिसलीच तरी नाराज होऊ नका, अख्खे भेंडे फेकून द्या... आणि पुढच्या भेन्डीकडे वळा... तुम्ही ताजी भेंडी आणली आहेत बाजारातून त्यामुळे अळ्या असण्याची शक्यता फारच दुर्लभ)

४) एका काचेच्या बाउलमध्ये हळद पावडर, तिखट पावडर, धने-जिरं पावडर, बारीक कापलेली कोथिंबीर, साखर, मीठ, लिंबाचा रस सगळ नीट मिक्स करून घ्या...
 
यात मसाला कोरडा वाटला तरी पाणी घालू नका... लिंबाचा रस वाढवा....
हे मिश्रण अधिक जास्त छान तयार होण्यासाठी किमान १० मिनिटे तरी झाकून ठेवून द्या.

५) जाड बुडाच्या भांड्यात तेल तापवा आणि पुरेसे तापल्यावर त्यात आधी काळी मोहरी आणि मोहरी तडतडल्यावर नंतर जिरं घाला...

६) आता यात अर्धा चमचा साखर घाला , किंचित हलवा आणि लगेच मगाशी बाजूला तयार करून ठेवलेले मसाल्यांचे मिश्रण घालून व्यवस्थित परता...
 
आता यात मगाशी चिरून बाजूला ठेवलेली कोरडी भेंडी घाला , हात ओला करून भेन्डीवर पाण्याचा किंचित (किंचित म्हणजे अगदी किंचित) हबकारा मारा , झाकण ठेवा आणि मंद अग्नीवर किमान १० एक मिनिटे न परतता तसेच ठेवून द्या...

७) आता झाकण उघडून एकदा हलवा आणि कसुरी मेथी टाकून परत ३-४ मिनिटे हलवून भाजी तयार झाली असेल तर अग्नीवरून उतरवा...

८) मस्त चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेले टोमाटो घालून मस्त प्लेटिंग करा...



सोबत पापड पण मस्त लागतो...
गरमागरम पोळीसोबत अथवा भातावर घेतलेल्या मस्त आमटी सोबत ही भाजी जबरा लागते...

भरपेट खा...आरोग्यदायी रहा...खुश व्हा...मस्त जगा


देव बरा करो.........

-मिलिंद वेर्लेकर


Powered By Sangraha 9.0