नारायण राणेंचा गौप्यस्फोट, म्हणाले, "बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंसाठी माझ्याकडून शब्द..."

    01-Jan-1900
Total Views |
 
Rane & Thackeray
 
मुंबई : मी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंसाठी माझ्याकडून एक शब्द घेतला होता, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी दिल्लीत इंडी आघाडीच्या सभेत भाजपवर केलेल्या टीकेला आता राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला.
 
नारायण राणे म्हणाले की, "मी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एक-दीड महिन्यानंतर बाळासाहेबांचा मला फोन आला. त्यांनी मला एक शब्द मागितला. ते म्हणाले की, उद्धवबद्दल कधी वाईट विचार करु नकोस. मी त्यांना म्हटलं की, उद्धवच नाही तर ठाकरे नावाच्या कुठल्याही माणसाकडे मी वाकड्या नजरेने पाहणार नाही. म्हणूनच उद्धव ठाकरेंची जीभ चालत आहे."
 
हे वाचलंत का? -  "उबाठा गटाच्या घराला..."; शिरसाटांचा राऊतांना टोला
 
"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात २ दिवस मंत्रालयात गेले. अन्यथा मातोश्रीवर असायचे. पण आता मात्र रामलीला मैदानावर इंडी आघाडीच्या बैठकीला जातात. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत ५ खासदार आणि १६ आमदार आहेत. येणाऱ्या निवडणूकीपर्यंत १६ मधील ५ आमदार राहतील १० राहणार नाहीत. अशी व्यक्ती रामलीला मैदानावर जाऊन देशाच्या पंतप्रधानांवर बोलतात. त्यांचा राजकीय उंची काय, बौद्धिकता काय? भाजपचे ३०३ खासदार आहेत आणि तुमचे केवळ ५ आहेत," असे ते म्हणाले.
 
"भाजपला तडीपार करणार असे ते म्हणतात. उद्धव ठाकरे स्वत:ला काय समजतात माहिती नाही. त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे असं मला वाटतं. पंतप्रधानांवर बोलण्याची लायकी आणि गुणवत्ता नसताना भाजपला तडीपार करण्याची भाषा ते करतात. भाजप हा जगात सर्वात मोठा पक्ष आहे. याबद्दल जरा माहिती घ्या. नुसता सामना वाचू नका. बंडलबाज संपादकाने लिहिलेले लेख वाचू नका, बाकीचेही वाचा," असा सल्लाही त्यांनी दिला.