झोजिला बोगद्याचा अंतिम ब्रेकथ्रू पूर्ण; झोजिला बोगद्याचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण

काश्मीर-लडाख वर्षभर जोडण्याचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात

Total Views |
Srinagar-Ladakh Route
 
मुंबई : (Srinagar Ladakh Route) भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असलेल्या झोजिला बोगद्याने मंगळवार, दि.९ रोजी ऐतिहासिक टप्पा गाठला. बोगद्याच्या अंतिम ‘ब्रेकथ्रू’ यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने जम्मू-काश्मीर आणि लडाख यांच्यातील वर्षभर अखंड रस्ते संपर्काचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले आहे.
 
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लडाखमधील मिनीमार्ग येथील पूर्व प्रवेशद्वाराजवळील ठिकाणाहून रिमोटद्वारे स्फोट घडवून अंतिम ब्रेकथ्रू पूर्ण केला. यावेळी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला तसेच राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
बोगद्यातील उर्वरित २.५ मीटर अंतर यशस्वीरीत्या जोडण्यात आले असून हा टप्पा नियोजित वेळेपेक्षा तब्बल सहा महिने आधी पूर्ण करण्यात आला आहे. या प्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी झोजिला बोगदा हा लडाखसाठी जीवनवाहिनी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, “हा बोगदा समुद्रसपाटीपासून सुमारे ३,००० मीटर उंचीवर बांधण्यात आला आहे.
 
येथील कामगार, अभियंते, कंत्राटदार आणि एनएचआयडीसीएलच्या पथकाने उणे ४ अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी तापमानात काम केले. विशेष म्हणजे, या प्रकल्पात कार्यरत असलेल्या सुमारे ८० टक्के कामगारांचा समावेश स्थानिक भागातील होता. जागतिक दर्जाच्या सुरक्षा मानकांचे पालन करून हा बोगदा उभारण्यात आला आहे.
 
हेही वाचा :  महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त होणार; रेल्वेच्या ६५ पायाभूत सुविधांच्या कामांना मान्यता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
 
दरवर्षी सुमारे सहा महिने या भागातील संपर्क तुटतो. मात्र, या बोगद्यामुळे श्रीनगर, गांदरबल, सोनमर्ग, द्रास, कारगिल आणि लडाख यांच्यातील संपर्काला नवी गती मिळेल.” राष्ट्रीय महामार्ग-१ वर उभारला जाणारा हा सुमारे १४ किलोमीटर लांबीचा प्रकल्प अंदाजे ६,८०० कोटी रुपयांत पूर्ण होत आहे. एकेकाळी १२,००० कोटी रुपयांचा अंदाज असलेल्या या प्रकल्पाची अंमलबजावणी कमी खर्चात करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
 
सुमारे १३.१५ किलोमीटर लांबीचा झोजिला बोगदा आशियातील सर्वात लांब दुहेरी मार्ग रस्ता बोगदा ठरणार आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ११,५७८ फूट उंचीवर हिमालयाच्या अत्यंत आव्हानात्मक भूप्रदेशातून हा बोगदा जातो. घोड्याच्या नालाच्या आकाराचा हा एकेरी ट्यूब बोगदा ९.५ मीटर रुंद आणि ७.५७ मीटर उंच असून त्यामधून दोन मार्गिकांमध्ये वाहतूक होणार आहे.
 
आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांनुसार तयार करण्यात येणाऱ्या या बोगद्यात अत्याधुनिक वायुवीजन यंत्रणा, स्वयंचलित अग्निशमन व अग्निशोधक प्रणाली, सीसीटीव्ही देखरेख, आपत्कालीन मार्ग आणि त्वरित प्रतिसाद यंत्रणा उपलब्ध असणार आहेत. याशिवाय प्रकल्पात चार पूल, ४० कल्व्हर्ट, हिमस्खलन संरक्षण संरचना, स्नो गॅलरी आणि संपर्क रस्त्यांचाही समावेश आहे.(Srinagar Ladakh Route)
 
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.