गुरु तेगबहाद्दुर नगर येथे विराट हिंदू संमेलन उत्साहात; ५०० हून अधिक नागरिकांची उपस्थिती

    09-Jun-2026   
Total Views |
Hindu Community Gathering)
 
मुंबई : (Hindu Community Gathering) सिद्धीविनायक भाग अंतर्गत गुरु तेगबहाद्दुर नगर येथील प्रतीक्षा नगर वस्तीत अशोक पिसाळ मैदान येथे रविवारी विराट हिंदू संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले.समाजजागृती, संघटन आणि सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास सुमारे ५०० नागरिकांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमास स्वामी भारतानंद सरस्वती, सामाजिक कार्यकर्त्या साक्षी गायकवाड आणि अभयराजे जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधींसह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झाली. प्रतीक्षा नगर परिसरातील स्वामी समर्थ मठाच्या संस्कार वर्गातील बालकांनी, महिला आणि पुरुषांनी विविध स्तोत्रांचे सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर इयत्ता आठवीतील विद्यार्थी आराध्य औटी याने आपल्या सहकारी मित्रांसह शेतकरी आत्महत्येच्या गंभीर विषयावर आधारित उद्बोधक नाटिका सादर केली. या नाटिकेने उपस्थितांना विचार करायला भाग पाडले. तसेच अनेक लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली.
 
अभयराजे जगताप यांनी इतिहास आणि वर्तमानातील विविध घटनांचा संदर्भ देत हिंदू समाजाच्या संघटनाची आवश्यकता स्पष्ट केली. समाज एकत्रित राहिल्यास विविध सामाजिक आव्हानांना अधिक प्रभावीपणे सामोरे जाता येते, असे त्यांनी सांगितले. साक्षी गायकवाड यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत सामाजिक प्रश्नांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. समाजातील विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महिलांनी संघटित होऊन सक्रिय भूमिका घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.(Hindu Community Gathering)
 
स्वामी भारतानंद सरस्वती यांनी आपल्या मार्गदर्शनात हिंदू समाजाच्या एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले. समाजातील विखुरलेपणामुळे भूतकाळात अनेक अडचणी निर्माण झाल्या असल्याचे सांगत, भविष्यात सजग, संघटित आणि जागृत राहण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान संजीव परब यांनी 'विराट सागर समाज अपना, हम सब उसके बिंदू है' हे सांघिक गीत गायले. त्यामुळे उपस्थित नागरिकांचा कार्यक्रमातील सहभाग अधिक वाढला. बर्नाली प्रधान यांनी आपल्या प्रभावी सूत्रसंचालनाने कार्यक्रमाचे सुरेख संयोजन केले. वंदे मातरम् गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
 
या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी गेल्या महिनाभरापासून ५० ते १०० कार्यकर्त्यांनी अविरत परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाच्या सफलतेमुळे भविष्यासाठी एक मैलाचा दगड स्थापित केल्याची प्रतिक्रिया स्थानिक समाजातून आली.(Hindu Community Gathering)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक